Manjiri Oak : '...घरातला स्टीलचा डब्बाही कुणीतरी दिलेलाच असणार...', 'धर्मवीर' सिनेमानंतर झालेल्या ट्रोलिंगवर मंजिरी ओकचं स्पष्ट भाष्य
Manjiri Oak : प्रसाद ओकच्या धर्मवीर सिनेमानंतर जे ट्रोलिंग झालं त्यावर मंजिरी ओकने भाष्य केलं आहे.
Manjiri Oak : अभिनेता प्रसाद ओक (Prasad Oak) हा 'धर्मवीर' (Dharmaveer) सिनेमामुळे बराच चर्चेत आला. शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे (Anand Dighe) यांची भूमिका प्रसादने या सिनेमात साकारली आहे. तसेच या सिनेमादरम्यान झालेल्या राजकीय भेटीगाठींमुळेही प्रसादच्या वैयक्तिक आयुष्याबाबत बरीच टीप्पणी करण्यात आली. जेव्हा प्रसादने मुंबईतही त्याच्या हक्काचं घर घेतलं त्यावेळी देखील त्याचा राजकीय संबंध जोडण्यात आला.
सध्या धर्मवीर -2 सिनेमाच्या निमित्तानेही प्रसादविषयी बरीच चर्चा सुरु आहे. याचनिमित्ताने अनेक मुलाखतींमध्ये प्रसादने होणाऱ्या ट्रोलिंगवर स्पष्ट भाष्य केलंय. रक्ताचं पाणी करुन ते घर उभारलं असल्याची प्रतिक्रिया प्रसादने दिली होती.त्यानंतर आता त्याची बायको मंजिरी ओकनेही यावर स्पष्ट भाष्य केलंय. लोकमत फिल्मीला नुकत्याच दिलेल्या मुलाखतीमध्ये मंजिरी यावर व्यक्त केली आहे..,
मंजिरीने काय म्हटलं?
आज खूप स्ट्रगल करुन एक आलिशान घर तुमच्या वाट्याला आलं आहे.. त्याच्यावरही चुकीच्या पद्धतीने टीप्पणी केली जातेय..आज तू मंजिरी ओक म्हणून या सगळ्याकडे कशी पाहतेस?यावर उत्तर देताना मंजिरीने म्हटलं की, 'धर्मवीर जेव्हा रिलीज झाला तेव्हा माझ्या मोठ्या मुलाने मला सांगितलं की, आता तुझ्या घरात सायकल जरी घेतलीस तरी ती आपल्याला कुणीतरी दिलेलीच असणार आहे. तुझ्या घरात स्टीलचा डब्बा जरी घेतलास तरी तो कुणीतरी दिलेलाच असणार आहे, या गोष्टींची आधीच तयारी ठेव.. माझा मोठा मुलगा फार समंजस आहे.. आताही त्याने जेव्हा प्रसादला नवी कार दिली तेव्हा मी त्याला विचारलं की, पोस्ट करायचं का? तू हो म्हणालास तर करुया नाहीतर नाही करायचं... त्याने विचार करायला वेळ घेतला.. त्यानंतर तो म्हणाला की,ठीक आहे चल पोस्ट करुया.. आपण पोस्ट नाही केली तरी लोकं बोलणार आहेत... नाही केली तरी लोकं बोलणार आहेत.. मग आपल्या आनंदात प्रामाणिकपणे किमान 10 लोकं तरी सहभागी होतील.. त्यांच्यासोबत तो आनंद शेअर करुया..'
पुढे त्याने म्हटलं की, 'त्या पोस्टवर एक कमेंट अशी होती की,काय करतो तुमचा मुलगा तिकडे...त्याची आयटीआर टाका इकडे... म्हटलं बरं मी आयटीआर जरी टाकलं तरी तुम्ही म्हणाल की,हे काय तुम्ही बनवून घेतलंय.. म्हणजे तुम्ही थांबणार नाही आहात... मला, प्रसादला जे ओळखत नाहीत, ते काय बोलतात याचा फरक पडतच नाही... पण जेव्हा आमच्या कानावर काही नावांसकट अशा गोष्टी येतात,तेव्हा त्याचा त्रास होतो. कारण अत्यंत अभिमानाने तो दिवस साध्य केलाय आम्ही. आज त्या घराचे हफ्ते भरण्याचा संघर्ष आजही सुरुच आहे... रोज उठून तो संघर्ष सुरु आहे..'