Marathi Movies Mahesh Kothare Ashok Saraf : महेश कोठारेंची एक चूक आणि अशोक सराफांसोबत आला दुरावा; काय आहे तो किस्सा?
Marathi Movies Mahesh Kothare Ashok Saraf : 'धूमधडाका' चित्रपटाला मोठं यश मिळाल्यानंतर महेश कोठारे आणि अशोक सराफ यांच्यात दुरावा आला. या दुराव्यासाठी आपणंच जबाबदार असल्याची कबुली महेश कोठारे यांनी दिली.
Marathi Movies Mahesh Kothare Ashok Saraf : मराठी चित्रपटसृष्टी स्थित्यंतराच्या काळातून जात असताना अशोक सराफ (Ashok Saraf), लक्ष्मीकांत बेर्डे ( Laxmikant Berde), महेश कोठारे (Mahesh Kothare) आणि सचिन पिळगावकर (Sachin Pilgaonkar) यांनी मराठी सिने रसिकांचे धमाल मनोरंजन केले. धूमधडाका चित्रपटाला मोठं यश मिळाल्यानंतर महेश कोठारे आणि अशोक सराफ यांच्यात दुरावा आला. या दुराव्यासाठी आपणंच जबाबदार असल्याची कबुली महेश कोठारे यांनी दिली. ती चूक झाली नसती तर दुरावा आला नसता अशी प्रांजळ कबुली देखील महेश कोठारे यांनी दिली.
निर्माते-दिग्दर्शक-अभिनेते महेश कोठारे यांनी नुकतीच 'लोकमत फिल्मी'ला मुलाखत दिली. त्यावेळी त्यांनी अशोक सराफ यांच्यासोबतचा किस्सा सांगितला. महेश कोठारे यांनी सांगितले की, धूमधडाका या चित्रपटाला चांगले यश मिळाले होते. त्यामुळे या पुढील प्रोजेक्टमध्ये महेश कोठारे, अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे हे त्रिकुट असले पाहिजे असे वाटत होते. मी एका स्क्रिप्टवर काम करत होतो. अण्णासाहेब देऊळगावकर यांच्यासोबत चित्रपटाच्या स्क्रिन प्लेवर काम करत होतो. त्यावेळी असं लक्षात आले की या भूमिकेत अशोक सराफ योग्य दिसणार नाही. त्याला मी न्याय देऊ शकत नाही असे लक्षात आले असल्याचे महेश कोठारे यांनी सांगितले.
अन् दुरावा आला...
महेश कोठारे यांनी सांगितले की, अशोक सराफला नुसत घ्यायचं म्हणून बोलतोय पण मला असंच घ्यायचे नव्हते. त्यामुळे मी त्या चित्रपटात अशोकला टाळले. माझा निर्णय, त्या मागील कारण हे अशोकला कळवायला हवा होता. मात्र, मी तो न कळवताच काम सुरू केले, ही माझी चूकच झाली असल्याचे महेश कोठारे यांनी सांगितले.
'धूमधडाका'ला तुफान यश
हिंदी चित्रपटाचा रिमेक असलेला 'धूमधडाका' चित्रपट हा 1985 मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली होती. या चित्रपटाची कथा अण्णासाहेब देऊळगावकर यांनी लिहिली होती. या चित्रपटाशिवाय महेश कोठारे आणि अशोक सराफ 1983 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'गुपचूप गुपचूप' या चित्रपटात कुलदीप पवार यांच्यासह झळकले होते.
महेश कोठारे, सचिन पिळगावकर आणि अशोक सराफ हे त्रिकुट 2010 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'आयडियाची कल्पना' या चित्रपटात झळकले होते. चित्रपटाचे दिग्दर्शन सचिन पिळगावकर यांनी केले होते.