(Source: ECI/ABP News/ABP Majha)
लॉकडाऊन नाटकवाल्यांच्या पथ्यावरच! प्रेक्षकसंख्या रोडावली; बुकिंग निम्म्याहून खाली
पहिल्या लॉकडाऊननंतर ज्या नाटकांनी लाखांत बुकिंग घ्यायला सुरूवात केली त्याची तिकीट विक्री 60 हजारावर आली होती. इतर नाटकांचा आकडा तर त्याहून खाली होता. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने इंडस्ट्रीचा हा स्ट्रगल वाढवला. यापुढे प्रयोग कसे करायचे या विचारात असतानाच एप्रिलमधला लॉकडाऊन जाहीर झाला.
मुंबई : सगळी गाडी रुळावर येतेय असं म्हणेपर्यंत पुन्हा लॉकडाऊन जाहीर झाला. आता हा संपूर्ण एप्रिल महिन्याचे सगळे वीकेंड घरात बसून काढावे लागणार आहेत. अर्थात इतर दिवशी किमान आवश्यक गोष्टी चालू असणार आहेत. आता इतर व्यवसायिकांनीही आपल्याला व्यवसाय करायला परवानगी मिळावी यासाठी विविध स्तरावर मागण्या करताना दिसतायत. असं असलं तरी वीकेंडला लॉकडाऊन आल्यामुळे काही व्यवसायांवर मात्र गदा आली आहे. त्यापैकीच एक महत्वाचा व्यवसाय आहे तो म्हणजे नाट्यसृष्टीचा. एरवी आठवड्याच्या शेवटी चालणारी नाटकं बंद झाली आहेत. पण एकूण बुकिंगची आकडेवारी पाहता हा लॉकडाऊन लागला तो नाट्यनिर्मात्यांच्या पथ्यावरच पडला आहे असं म्हणण्यासारखी स्थिती निर्माण झाली होती.
पहिला लॉकडाऊन संपल्यानंतर नाटकांना सुरूवात झाली ती 12 डिसेंबर 2020 पासून. प्रशांत दामले, भरत जाधव, ज्ञानेश महाराव यांच्या नाटकांनी नाट्यव्यवसायाची नांदी झाली. या नाटकांना खूपच चांगला प्रतिसाद मिळाला. थिएटरच्या 50 टक्के उपस्थितीनुसार प्लॅन लावले गेले. कोरोनाबाबतची सगळी काळजी घेतली गेली. निम्मी उपस्थिती असल्यामुळे हे बुकिंगचे प्लॅन आले ते 1 लाख 80 हजारांच्या घरात. तरीही कलाकार, नाट्यनिर्माते आपलं सर्वस्व पणाला लावून प्रयोग करत होते. एका लग्नाची पुढची गोष्ट, तू म्हणशील तसं, सही रे सही, व्हॅक्युम क्लिनर ही नाटकं चालू झाली. या नाटकांतून प्रशांत दामले, कविता लाड, भरत जाधव, अशोक सराफ, निर्मिती सावंत, संकर्षण कऱ्हाडे आदी मंडळी रंगभूमीवर उतरली. या नाटकांचं चांगलं स्वागत झालं. नाट्यप्रयोग फायद्यात नसले तरी अगदी तोटा होत नव्हता. पण या दुसऱ्या लाटेची कुणकुण जशी लागली तशी प्रेक्षकसंंख्या रोडावू लागली. तरीही प्रेक्षकांना खेचण्यासाठी निर्माते वेगवेगळे प्रयोग करू लागले. तिकीट दर आणखी कमी झाले. प्रयोग व्हावेत हीच त्यामागची निर्मळ इच्छा होती.
मार्चच्या पंधरवड्यानंतर मात्र बुकिंगला ओहोटी लागली. कोरोनाची दुसरी लाट प्रबळ होऊ लागली. अशात काही नवी नाटकंही आली. स्त्री, धनंजय माने इथंच राहतात सारखी नवी नाटकंही आली. सुरूवात चांगली झाली. पण मार्चच्या शेवटच्या आठवड्यात हे बुकिंग आणखी कमी झालं. याचा जोरदार फटका बसला तो 4 एप्रिलला. या दिवशी एका लग्नाची पुढची गोष्ट (दीनानाथ नाट्यगृह, विलेपार्ले), व्हॅक्युम क्लीनर (काशिनाथ घाणेकर, ठाणे), सही रे सही (पनवेल) या वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या तीनही प्रयोगांना प्रत्येकी 58 हजारच बुकिंग झाल्याचा चमत्कार घडला. खरंतर प्रशांत दामले, अशोक सराफ, भरत जाधव हे तीनही चेहरे मराठी नाट्यसृष्टीचे प्रमुख प्रतिनिधी मानले जातात. या तिघांच्या प्रयोगांना जर 60 हजाराच्या आत बुकिंग होत असेल तर इतरांनी थांबलेलं बरं अशीच मानसिकता व्यवस्थापक आणि निर्मात्यांची होऊ लागली होती. अशात राज्य सरकारने लॉकडाऊन जाहीर केला.
सांगताही येत नाही सहनही होत नाही
प्रशांत दामले आमचा आयडॉल आहे. प्रशांत, भरत, अशोकमामा या तिघांनाही 4 एप्रिलच्या दुपारी 58 हजार बुकिंग झालं. त्यांना जर कमी बुकिंग असेल, तर आपण बाकीच्यांनी थांबलेलं बरं असंच वाटू लागलं होतं. सुरूवातीलाही या सर्व गाजलेल्या नाटकांना साधारण एक लाख ते सव्वा लाख बुकिंग होत होतं. अ परफेक्ट मर्डरलाही सुरूवात एक लाखाच्या बुकिंगने झाली.पण नंतर ही नौका घसरत गेली. अशा स्थितीत इंडस्ट्रीने जर स्वत:हून प्रयोग थांबवले असते तर मेसेज चुकीचा गेला असता. सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही अशी अवस्था होती. त्यामुळे लॉकडाऊन लागून प्रयोग थांबले ते एका अर्थाने बरं झालं. आता जोवर लसीचे दोन दोन डोस होत नाहीत, तोवर लोक बाहेर पडणार नाही. 30 एप्रिलला लॉकडाऊन उठवल्यावर अंदाज घेतला जाईल. लोक नाटकाला येत होते, पण या दुसऱ्या लाटेने हे बुकिंग कमी केलं. आता 400 रुपये नाटकाला देणंही लोकांना परवडायला हवं. नाटकाला लोक येतील. पण थोडा वेळ जावा लागेल.
- गोट्या सावंत, ज्येष्ठ नाट्यव्यवस्थापक
पहिल्या लॉकडाऊननंतर चालू झालेल्या नाटकांचा सरासरी गल्ला
एका लग्नाची पुढची गोष्ट - सव्वा ते दीड लाख
सही रे सही - एक ते सव्वा लाख
व्हॅक्युम क्लीनर - एक ते सव्वा लाख
धनंजय माने इथेच राहतात - ३० ते ५० हजार
तू म्हणशील तसं - ४५ ते ५५ हजार
इशारो इशारो मे - ३० ते ३५ हजार
स्त्री - १३ ते १७ हजार
आमने-सामने - ५० ते ६० हजार.