Lagaan 20 Years : 20 हजारांवरही 'लगान'मध्ये काम करण्यासाठी तयार होता अभिनेता; प्रत्यक्षात मिळालं 2 लाखांचं मानधन
Lagaan 20 Years : आशुतोष गोवारिकर यांच्या दिग्दर्शनात साकारलेल्या या चित्रपटात अनेक कलाकारांनी उल्लेखनीय भूमिका साकारल्या होत्या
20 Years of Lagaan : यंदाच्या वर्षी अभिनेता आमिर खान (Amir Khan) आणि इतरही अनेक कलाकारांच्या अभिनयानं नटलेल्या 'लगान' या चित्रपटाला प्रदर्शित होऊन तब्बल 20 वर्षे पूर्ण होत आहेत. आशुतोष गोवारिकर यांच्या दिग्दर्शनात साकारलेल्या या चित्रपटात अनेक कलाकारांनी उल्लेखनीय भूमिका साकारल्या होत्या. या चित्रपटाची मध्यवर्ती भूमिका जितकी गाजली, तितकीच लोकप्रियता खलनायकी भूमिकेलाही मिळाली. हीच खलनायकी भूमिका साकारणाऱ्या कलाकारांपैकी एक नाव म्हणजे अभिनेता यशपाल शर्मा.
'लाखा'ची भूमिका साकारणाऱ्या यशपाल शर्मा यानं या चित्रपटात अगदी कमी मानधनातही काम करण्याची तयारी दाखवली होती. काही दिवसांपूर्वी खुद्द यशपालनंच याबाबतचा खुलासा केला. 'इंडियन एक्स्प्रेस'शी संवाद साधताना यशपालनं सांगितलं की, ऑडिशन्सनंतर चित्रपटासाठी आपली निवड करण्यात आली. पुढे आमिर खान याची त्यावेळची पत्नी रिना दत्ता यांची भेट घेण्यात सांगण्यास आलं. चित्रपटाची निर्मिती त्यांची असून, मानधनासाठी चर्चा करण्यासाठी ही भेट घ्यायची होती.
'मी विचार केला होता की मोठी निर्मिती संस्था आहे, तर मी 1 लाख रुपयांचं मानधन मागेन. पण, त्यांनी नकार दिला आणि कोणा दुसऱ्याचीच निवड केली तर..., मी माझ्याच डोक्यात ही किंमत 80 हजारांवर आणली. शेवटी मी 50 हजारांवर चित्रपट स्वीकारेन असं ठरवलं. पण, सोबतच माझ्याकडे काम नव्हतं. त्यामुळे मी हा चित्रपट 20 हजार रुपयांच्या मानधनावरही केला असता. शेवटी मी ज्यावेळी रिना दत्तांना भेटलो तेव्हा त्यांनी सांगितलं की आर्थिक मर्यादा असून, आम्ही प्रत्येक कलाकाराला 1.5 लाख रुपयांचं मानधन देत आहोत. मी फक्त मला 2 लाख रुपये हवे होते असं पुटपुटलो आणि त्यासाठी त्या तयारही झाल्या. मला धक्काच बसला, आनंदही झाला. मला अपेक्षेहून दुपटीनं जास्त मानधन मिळालं होतं', असा अनुभव यशपालनं सांगितला.
Sooryavanshi Release Date : ...तरच 'सूर्यवंशी' 13 ऑगस्टला येणार!
आमिरच्या निर्मिती संस्थेकडून फोन आला तेव्हा कोणीतरी आपली थट्टा करत आहे, असंच त्याला वाटत होतं. कारण, तोपर्यंत 'लगान'साठी कलाकारांची निवड झाली होती. मी बहुधा फोन येणारा शेवटचा व्यक्ती होतो, असंही त्यानं सांगितलं.
भारतीय चित्रपटाच्या इतिहासामध्ये 'लगान' या चित्रपटाला त्याच्या सादरीकरणामुळे आणि त्याच्या कथानकामुळं कायमच मानाचं स्थान मिळालं आहे. प्रत्येक वयोगटात या चित्रपटाची विशेष लोकप्रियता. फक्त प्रेक्षकांच्या मनावरच नव्हे, तर अनेक पुरस्कारांवरही या चित्रपटानं आपली छापल सोडली होती. ऑस्करची शर्यतही गाठणारा हा चित्रपट कायमच खास असेल असं म्हणणं अतिशयोक्ती ठरणार नाही.