(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Kiran Mane Post : उज्ज्वल निकम यांना लोकसभेत नव्हे जेलमध्ये पाठवायला हवं, मुश्रीफ यांचा संदर्भ, किरण मानेंची नवी पोस्ट
Kiran Mane Post : उज्ज्वल निकम यांना उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केल्यानंतर किरण माने यांची एक पोस्ट चांगलीच चर्चेत आली आहे.
Kiran Mane Post : उज्ज्वल निकम (Ujjwal Nikam) यांना भाजपकडून उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. विद्यमान खासदार पूनम महाजन यांचं तिकीट कापून उज्ज्व निकम यांना उमेदवारी देण्याचा मोठा निर्णय भाजपकडून घेण्यात आलाय. पण यावर आता अभिनेते आणि ठाकरे गटाचे नेते किरण माने (Kiran Mane) यांची एक पोस्ट सध्या चर्चेत आली आहे. या पोस्टला त्यांनी माजी पोलीस महारनिरीक्षक एस.एम मुश्रीफ यांचा संदर्भ दिला आहे.
अनेक दिवसांपासून राजकारणापासून दूर राहण्याची वक्तव्य करणाऱ्या उज्ज्वल निकम यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आलीये. तसेच दुसरीकडे उज्ज्वल निकम यांच्या विरोधात काँग्रेसकडून वर्षा गायकवाड यांना मैदानात उतरवण्यात आलंय. गेल्या अनेक वर्षांपासून त्या मुंबईत काम करत आहेत. त्यामुळे त्यांचा जनसंपर्क मोठा आहे. विशेष म्हणेज महाविकास आघाडीचा घटकपक्ष असलेल्या शिवसेना (ठाकरे गट) या पक्षानेदेखील वर्षा गायकडवाड यांच्यासाठी प्रचार करण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे उज्ज्वल निकम यांना हे आव्हान तसं मोठंच असणार असल्याचं म्हटलं जातंय. पण याचदरम्यान किरण माने यांच्या पोस्टने देखील बरीच खळबळ माजवली आहे.
किरण माने यांची पोस्ट नेमकी काय?
किरण माने यांनी फेसबुक पोस्ट करत या सगळ्यावर भाष्य केलं आहे. यामध्ये त्यांनी म्हटलं की, 'उज्ज्वल निकम यांना खरंतर लोकसभेत न पाठविता जेल मध्ये पाठवायला हवं." असं माजी पोलीस महानिरीक्षक एस.एम. मुश्रीफ म्हणाले ! का म्हणाले असतील? पोलीस महानिरीक्षक हे साधं पद नाही भावांनो. या पदावरचा माणूस जे बोलतो ते हलक्यात घेण्यासारखं नसतं. एस.एम. मुश्रीफ यांनी रिटायरमेन्ट नंतर कुठल्या पक्षाची लाचारी करत आमदारकी खासदारकीची भिक नाही मागीतली. त्यांनी एक पुस्तक लिहीलं... 'करकरेंना का व कोणी मारले?'
पुढे त्यांनी म्हटलं की, 'त्या पुस्तकात त्यांनी काही सिक्रेटस् ओपन केली आहेत. मुश्रीफसाहेब म्हणतात, : "पाकिस्तानच्या लष्करे तोयबाच्या अतिरेक्यांची बोट मुंबईवर हल्ला करण्यासाठी निघाली आहे, याची डिटेल माहिती अमेरीकन गुप्तचर यंत्रणेकडून भारताच्या गुप्तचर यंत्रणेला 19 नोव्हेंबर 2008 रोजीच मिळाली होती. त्या बोटीचे अक्षांश व रेखांशही समजले होते. पुढील कारवाईसाठी ही माहिती मुंबई पोलीस, महाराष्ट्र शासन व पश्चिमी नौदल विभाग यांना कळवण्याची जबाबदारी गुप्तचर यंत्रणेचे तत्कालीन सहसंचालक प्रभाकर अलोक यांची होती. पण त्यांनी ती जाणीवपूर्वक कळविली नाही आणि हा हल्ला होऊ दिला.'
'उज्ज्वल निकमांनी अत्यंत महत्त्वाचा मुद्दा कोर्टासमोर आणला नाही'
दरम्यान मुंबईवर झालेल्या अतिरेकी हल्ल्यामध्ये अनेक महत्त्वाचे मुद्दे उज्ज्वल निकम यांनी कोर्टासमोर आणले नाहीत, असं देखील किरण माने यांनी या पोस्टमध्ये संदर्भ देऊन म्हटल आहे. 'प्रभाकर अलोक यांच्या मनात नक्की काहीतरी कपट होतं. यात शेकडो निरपराध लोकांचे बळी गेले... तितकेच लोक जन्मभरासाठी अपंग झाले. त्यासाठी प्रभाकर अलोक हे संपूर्णपणे जबाबदार आहेत. पण विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी हा अत्यंत महत्वाचा मुद्दा कोर्टाच्या निदर्शनास आणला नाही, कारण त्यांना प्रभाकर अलोक यांना वाचवायचे होते... का??? तर उज्जवल निकम यांना माहीत होते की प्रभाकर अलोक हे आर्.एस्.एस्. च्या आतल्या गोटातले आहेत !'
'पुढे ते सांगतात, "हेमंत करकरेंच्या शरीरात मिळालेल्या गोळ्या या अजमल कसाब किंवा अबू इस्माईल यांच्या रायफलमधून उडविलेल्या नव्हत्या असे कोर्टाच्या सुनावणीमध्ये सिध्द झाले होते (मुंबई सेशन्स कोर्ट निकालपत्र पान नं. ९२०). त्याशिवाय करकरेंच्या पोस्ट मार्टेममध्ये स्पष्ट झाले होते की, त्यांच्या मानेपासून खाली पोटात रिव्हाॅलव्हरने पाच गोळ्या मारल्या होत्या. त्यामुळे रिव्हाॅलव्हरने गोळ्या मारणारा हा आरोपी कोण हे शोधून काढणे आवश्यक होते. पण उज्ज्वल निकम यांनी हा आरोपी शोधून काढण्यासाठी अधिक तपास करण्याचा आग्रह धरला नाही... कारण त्यांना माहीत होते की, मुंबई पोलीस दलातील सहाय्यक पोलीस निरीक्षक दर्जाच्या संजय गोविलकर या अधिकाऱ्याने हे कृत्य केले आहे...आणि गोविलकर हा आर.एस.एस.शी संबंधीत आहे."आता ही ट्रोल्स पिलावळ मुश्रीफ यांनाही म्हणेल की "उज्जवल निकमांवर आरोप करायची तुझी लायकी आहे का?" या भक्तपिलावळीला फक्त भुंकायला सोडलंय हो. 'छ्छू' म्हटलं की सुटायचं. पण माझ्या भावांनो, आपल्या धडावर आपलंच डोकं आहे ना? विचार करा. बास एवढंच', अशी पोस्ट किरण माने यांनी केली आहे.