(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Ketaki Chitale : शरद पवारांविषयी आक्षेपार्ह पोस्ट; केतकी चितळेविरोधात गुन्हा दाखल
Ketaki Chitale Facebook Post : अभिनेत्री केतकी चितळेनं शरद पवार यांच्याबद्दलची एक आक्षेपार्ह पोस्ट शेअर केली आहे. यानंतर केतकीविरोधात कळव्यात गुन्हा देखील दाखल झाला आहे.
Ketaki Chitale Facebook Post : मराठी अभिनेत्री केतकी चितळे पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. तिनं तिच्या फेसबुक अकाउंटवरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दलची एक आक्षेपार्ह पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टनंतर ती ट्रोल होत असून तिच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. केतकी विरोधात कळव्यात गुन्हा देखील दाखल झाला आहे. केतकीविरुद्ध कळवा पोलिस ठाण्यात कलम 500, 505(2), 501 आणि 153 A अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राष्ट्रवादीचे पदाधिकारी स्वप्निल नेटके यांनी हा गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान केतकीला अटक होण्याची देखील शक्यता आहे.
सोशल मीडियावर खूपच अॅक्टिव्ह असते. सोशल मीडियावर बेधडकपणे केलेल्या वक्तव्यांमुळे केतकी अनेकदा अडचणीत सापडली आहे. त्यामुळे नेटकरी तिला ट्रोलदेखील करत असतात. केतकीने आता तिच्या फेसबुक अकाउंटवरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दलची एक आक्षेपार्ह पोस्ट शेअर केली. नेटके यांनी केलेल्या तक्रारीत म्हटलं आहे की, केतकी चितळेनं ही पोस्ट केल्यामुळं पक्षातील नेते, कार्यकर्ते आणि लोकांमध्ये तीव्र नाराजी आहे. त्यामुळं कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. केतकीनं ही पोस्ट करुन दोन राजकीय पक्षांमध्ये द्वेषाची भावना, तेढ निर्माण करण्याचे कृत्य केलं आहे. शरद पवार यांना उद्देशून बदनामीकारक, मानहानीकारक पोस्ट केतकीनं केली असल्याची तक्रार नेटे यांनी कळवा पोलिस ठाण्यात केली आहे.
अॅडव्होकेट नितीन भावे नावाच्या व्यक्तीने लिहिलेली पोस्ट केतकी चितळेने शेअर केली. नुकतंच शरद पवारांनी जवाहर राठोड यांची कविता सादर केली होती. त्यानंतर त्यावरुन भाजपकडून टीका झाली होती. याच कवितेच्या अनुषंगाने केतकीनं ही पोस्ट केली आहे.
आता शरद पवार यांच्याबद्दलची एक आक्षेपार्ह पोस्ट शेअर केल्यामुळे केतकीच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. यासंदर्भात राष्ट्रवादीच्या सांस्कृतिक विभागाचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील म्हणाले, केतकी प्रसिद्धीसाठी जन्मदात्यांच्या नावाच्या जागी पवार साहेबांचे नाव वापरून प्रसिद्धी मिळवण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहे.
'तुझं माझं ब्रेकअप' या मालिकेच्या माध्यमातून केतकी घराघरांत पोहोचली होती. त्यानंतर वादग्रस्त वक्तव्यांमुळे ती नेहमीच चर्चेत राहिली आहे. गेल्या काही वर्षापासून केतकीला अपस्मार हा आजार आहे. या आजारावर केतकी वेगवेगळ्या मेडिकल ट्रीटमेंट घेत आहे. त्यासंदर्भातील फोटो आणि व्हिडीओ ती सोशल मीडियावर शेअर करत असते.
संबंधित बातम्या