Kerala International Film Festival : 27 वा केरळ आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हल उत्साहात संपन्न; 'या' चित्रपटांना मिळाला पुरस्कार
Kerala International Film Festival 2022 : यंदाच्या केरळ आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलची थीम होती फ्लो म्हणजेच प्रवाही असणं.
Kerala International Film Festival 2022 : 27 वा केरळ आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हल नुकताच पार पडला. इराणची दिग्दर्शिका महनाझ मोहम्मदी तिच्या देशात सुरु असलेल्या हिजाब विरोधी आंदोलनाविरोधात केलेला यल्गार आणि हंगेरीयन दिग्दर्शक बेला थार यांचा मास्टरक्लास यांनी केरळा फेस्टिव्हल गाजवला.
यंदाच्या केरळ आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलची थीम होती फ्लो म्हणजेच प्रवाही असणं. सिनेमाचे असंख्य प्रवाह या फेस्टिव्हलमध्ये पाहायला मिळाले. जगभरातल्या सामाजिक, राजकिय, आणि सांस्कृतिक प्रश्नांची उहापोह करणारे 300 हून अधिक सिनेमा पाहण्याची संधी सिने-रसिकांना मिळाली. एकट्या केरळात जवळपास 70 हून अधिक छोट्यामोठ्या फिल्म सोसायटी आहेत. हे फिल्म सोसायटींचं जाळं तिथं सिनेमाचा माहौल तयार करतं. मल्याळम फिल्म इंडस्ट्री वेगवेगळ्या विषयांची प्रयोगशील आणि प्रभावी मांडणी यासाठी प्रसिध्द आहे. आपली भाषा, आपली संस्कृती, तिथलं साहित्य यावर जास्तच अभिमान बाळगणारा केरळी माणूस सिनेमाच्या बाबतीत जास्तच हळवा आहे. फिल्म सोसायटीचं नेटवर्क अगदी लहान वयात इथल्या तरुणांना जागतिक सिनेमांची चटक लावतात. 13000 हून जास्त सिनेरसिकांनी केलेली नोंदणी आणि प्रत्येक सिनेमागृहाबाहेर केलेली शिस्तबध्द गर्दी केरळ फिल्म फेस्टिव्हलच्या यशाची पोचपावती देऊन जातं.
केरळ चलचित्र अकादमीतर्फे केरळ सरकार या फिल्म फेस्टिव्हलचं आयोजन करतं. जगभरातले फिल्म रसिक या फेस्टिव्हला हजेरी लावतात. तरुण दिग्दर्शकांमध्ये हा फेस्टिव्हल जास्त प्रसिद्ध आहे. मल्याळम भाषेत सिनेमानिर्मिती करणाऱ्या तरुणांना संधी मिळावी म्हणून इथं मल्याळम सिनेमा टुडे ही खास सिनेमांची स्पर्धा आयोजित करण्यात येते. त्यात अमल प्रासी दिग्दर्शित लेफ्टओवर या अगदी 12 हजार रुपयांत कॉलेजच्या मुलांनी बनवलेला सिनेमा असो किंवा इंदू व्हीसी दिग्दर्शित 19 (1) (अ) सारखा कमर्शियल सिनेमा असो. सर्वच या स्पर्धेत एकमेकांसमोर येतात. सिनेमाचा उत्सव साजरा करतात ही या फेस्टिव्हलची खासियत आहे.
सिनेमाच्या उद्घाटनाला इराणच्या दिग्दर्शिका महनाझ मोहम्मदी यांचा विशेष 'स्पिरीट ऑफ सिनेमा' हा पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला. महनाझ मोहम्मदी इराणमध्ये महिलांच्या हक्कांसाठी लढतायत. सध्या हिजाब प्रकरणावरुन इराणमध्ये आगडोंब उठलाय. या परिस्थितीत महनाझ मोहम्मदी यांना भारतात जाण्याची परवानगी देण्यात आली नाही. मग त्यांनी आपल्या केसांची एक बट कापून पाठवून दिली. ही बट केरळा चलचित्र अकादमीचे रणजित शंकर यांच्या हातात सपूर्द करण्यात आली. महनाझचा पुरस्कार ग्रिकच्या दिग्दर्शिका अथिना रशेल त्सांगरी यांनी तो स्विकारला. महनाझने पाठवलेला संदेश त्यांनी वाचून दाखवला. “मी माझ्या केसांची बट पाठवत आहे. हे माझं दु:ख आहे, ते बाजूला सारुन मी पुढे जात आहे. चला एकत्र म्हणून स्त्री… जीवन… स्वातंत्र्य.“
गोव्यात ज्युरी हेड इस्त्राईल दिग्दर्शक नादव लैपिदनं काश्मिर फाईल्स या सिनेमाला प्रोपंगांडा आणि बिभत्स सिनेमा संबोधण्याचा मुद्दा केरळात ही गाजला. फेडरेशन ऑफ फिल्म सोसायटी ऑफ इंडियानं आर्टीस्टिक फ्रिडम एंड इंटीग्रिटी ऑफ ज्युरी हे विशेष चर्चासत्र आयोजित केलं होतं. या चर्चासत्रात प्रो. एन मनु चक्रवर्ती यांनी मांडलेला मुद्दा फार महत्त्वाचा ठरला. कलात्मक स्वातंत्र्य महत्त्वाचं आहे. पण चित्रं, संगीत आणि सिनेमा या सर्व गोष्टींची चिकित्सा होणं फार गरजेचं आहे. जेव्हा कलासंस्कृती संपते तेव्हा समाज ही संपतो. या पार्श्वभूमीवर नादव याचं वक्तव्य महत्त्वाचं आणि विचार करण्याजोगं आहे.
आंतरराष्ट्रीय फिल्म स्पर्धेचे ज्युरी उरुग्वे-स्पॅनिश दिग्दर्शक अल्वारो ब्रेचनर यांनी सिनेमा, कला आणि आजचा काळ या विषयावर बोलताना सिनेमाचं देशाच्या जडणघडणीचं महत्त्व समजावून सांगितलं. तो म्हणाला माझं बालपण हुकुमशाहीत गेलं. सर्वत्र दहशतीचं वातावरण असायचं. अशात सिनेमानं जगण्याचं सामर्थ्य दिलं. दृष्टीकोन दिला आणि सर्वकाही ठीक होईल असा भरोसा ही दिला. हुकूमशाही कलेला थांबवू शकत नाही. ती प्रवाही राहते. 20 वर्षांपूर्वी उरुग्वेमध्ये सिनेमा करण्याचा कुणी विचार ही करु शकत नव्हता. माझी फिल्म रोजच्या जगण्याबद्दल त्याच्या संघर्षांबद्दल होते. जगणं किती ही कठीण असलं तरी आपण त्यांच्या गोष्टी सांगितल्या पाहिजेत.
हंगेरीयन दिग्दर्शक बेला थार यांचा जीवनगौरव पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला. द ग्रीन हॉर्स (2011), डॅम्नेशन (1987) सतनटॅन्गो (1994) सारख्या सिनेमांसाठी बेला थार यांचं नाव आहे. सोशल सिनेमा असं त्यांच्या चित्रपटांचा उल्लेख केला जातो. पुरस्कार स्विकारताना त्यांनी केलेल्या भाषणात त्यांनी सिनेमा ही जगाला जोडणारी भाषा आहे. तुमचं आणि माझं भोवताल वेगळं आहे. संस्कृती ही वेगळी आहे. जगाच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत आपल्याला एकाच भाषेनं जोडले गेलोत. ती म्हणजे मोशन पिश्चर.
सध्या सतत बातम्यांमधले असलेले तीन देश श्रीलंका, इराण आणि युक्रेन मधले दिग्दर्शक-कलाकार केरळ फिल्म फेस्टिव्हलमध्ये सहभागी झाले होते. इराणचा दिग्दर्शक हादी गझानफारी, श्रीलंकन दिग्दर्शक अरुणा जयवर्धन आणि युक्रेनची अभिनेत्री ओक्साना चेरक्शना यांनी आपापल्या देशात सुरु असलेल्या घडामोडींबद्दल सांगितलं. ओक्साना म्हणाली की, युक्रेनमधलं युद्ध हे फक्त तिथंल युध्द नाही, पण सर्व जगाच्या सुरक्षेच्या दृष्टीनं ते फार मोठा मुद्दा आहे. आम्ही यक्रेनमध्ये युद्धाला क्रायसीस म्हणजे संकट म्हणत नाही. हे युद्ध गेल्या आठ वर्षांपूर्वीच सुरु झालंय. आमचा सिनेमा क्लोनडीके (2022) युध्दानं सर्वसामान्याचं आयुष्य कसं बदललं. आमच्या बाबतीत नक्की काय घडलं आणि या हिंसाचाराचा सामना कसा केला हे सांगत. युक्रेनमध्ये आत नक्की काय चाललंय. हे दाखवतं.
जागतिक सिनेमाच्या गर्दीत मल्याळम सिनेमांनी हा फिल्म फेस्टिव्हल जास्त गाजवला. सुपरस्टार ममुटीची मुख्य भूमिका असलेल्या लाईक ड्रिम इन आफरनून आणि दिग्दर्शक महेश नारायणचा डिक्लेरेशन या दोन सिनेमांनी प्रचंड गर्द खेचली. ममुटीच्या सिनेमासाठीची रांग काही किलोमीटर गेली होती. हा सिनेमा अजून थिएटरमध्ये प्रदर्शित व्हायचाय. त्यामुळे त्याआधीच तो पाहण्यासाठी ही तुडुंब सर्दी झाली होती. या सिनेमालाच फेस्टिव्हलमध्ये ऑडीयन्स चॉईस पुरस्कार मिळाला.
2022/12/23/efcfb9ee46f06db202d61cc94a84af2a1671807138149358_original.jpeg" width="794" height="595" />
महत्वाच्या बातम्या :
Pune PIFF : पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव पुढे ढकलला; काय आहे कारण? पुढची तारीख कधी?