(Source: ECI/ABP News/ABP Majha)
बायकोसोबत करवा चौथ साजरी केल्यामुळे मराठी अभिनेता ट्रोल, सडेतोड उत्तर देत म्हणाला, 'वैयक्तिक आयुष्यावर कमेंट...'
Marathi Actor : बायकोसोबत करवा चौथ साजरी केल्यामुळे मराठी अभिनेत्याला ट्रोलिंगला सामोरं जावं लागलं आहे.
Marathi Actor : सोशल मीडियावर (Social Media) कलाकार नेहमीच त्यांच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्याविषयी व्यक्त होत असतात. पण या सोशल मीडियामुळे हल्ली कलाकारांना बऱ्याच प्रमाणात ट्रोलिंगलाही सामोरं जावं लागतं. कलाकारांच्या वैयक्तिक आयुष्यावर होणाऱ्या ट्रोलिंगवर सेलिब्रेटी अनेकदा व्यक्तही होतात. नुकतच एका मराठी अभिनेत्याला त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे. त्यावर अभिनेत्याने सडेतोड उत्तरंही दिलंय.
सुख म्हणजे नक्की काय असतं फेम अभिनेता कपिल होनराव याची पोस्ट सध्या चर्चेत आलेली आहे. कपिलची पत्नी ही उत्तर भारतीय आहे. त्यामुळे तिने करवा चौथचा सण साजरा केला. कपिलने हे फोटो त्याच्या सोशल मीडियावर शेअर केले होते. त्यावर त्याला बरंच ट्रोल करण्यात आलं. त्यावरच कपिलने त्याच्या सोशल मीडियावर पोस्ट करत ट्रोलर्सना उत्तर दिलं आहे.
कपिलची पोस्ट नेमकी काय?
कपिलने त्याच्या सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटलं की, “आजकाल लोकांना काय झालंय…तुम्ही मराठी कलाकार असे झालात तसे झालात अशा कमेंट करतात. हे मराठीमध्ये करत नाही ते करत नाही…अशा कमेंट्स करण्याआधी सत्य परिस्थिती जाणून घ्या. वीट आलाय यार या लोकांचा… माझी बायको नॉर्थ साइडची आहे. हिंदी भाषिक आहे. करवा चौथ हा तिचा सण आहे. जशी ती माझ्याबरोबर सगळे मराठी सण साजरे करते, अगदी तशाचप्रकारे मी सुद्धा हा सण तिच्यासाठी साजरा करतो. माझी महान मराठी परंपरा, मराठी संस्कृती हे नाही करायचं असं कधीच बोलू शकत नाही. त्यामुळे वैयक्तिक आयुष्यावर कमेंट करताना जरातरी विचार करा.”
कपिल हा सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेमुळे घरांघरांत पोहचला. या मालिकेत त्याने शालिनीचा नवरा मल्हार ही भूमिका साकारली होती. कपिलने मराठी नाटकांमध्येही भूमिका साकारल्या आहेत.
View this post on Instagram