एक्स्प्लोर
Advertisement
Pagalpanti Movie Review | पागल? छे.. बिनडोकपंती!
यातले कलाकार जे काही धंदे करताहेत ते पाहून हा सिनेमा साधारण मस्तीसारख्या सिनेमाच्या कॅटेगरीत जायला लागतो. म्हणजे हा सिनेमा मॅडकॉमेडी आहे असं जरी धरून चाललं तरी या सिनेमात जो वेडपटपणा दाखवला आहे ते केवळ आपली हतबलता जास्तीतजास्त असहाय करून सोडतो.
सध्या बाजारात काय चाललंय ते बघायचं आणि तसेच सिनेमे बनवायचे हा जुना सरधोपट मामला आहे. म्हणजे, आपल्याकडं दुनियादारी चालल्यानंतर मैत्रीचे गोडवे गाणारे डझनभर सिनेमाच्या स्क्रिप्टस बाजारात फिरत होत्या. त्यांनतर सैराट हिट झाल्यावर तशाच आशयाच्या गोष्टी घेऊन अनेक निर्माते सिनेमे बनवू लागले होते. जे चालतंय.. जे लोकांना आवडतंय ते लोकांना द्या असा यामागचा हेतू असतो. यातून रिस्क फॅक्टर कमी होतो. अर्थात ही उदाहरणं मराठी सिनेमाची असली तरी हिंदीतही हे चालतं आलं आहे. पोलीस हिरो होऊन गुंडांना नाचवतो अशा गोष्टी चालू लागल्यावर तसेच सिनेमे बनू लागतात. तीन-चार वेडे मित्र एकत्र येतात आणि धमाल उडवतात अशा मॅड कॉमेडीची चव प्रेक्षकांना आवडते आहे हे लक्षात आल्यानंतर तसेच सिनेमे बनवण्याकडे कल असतो. हा झाला विषयांचा भाग. पण ओरिजनल संकल्पना.. किंवा मूळ गोष्ट.. त्याचं टेकिंग.. हेही तितकंच महत्वाचं असतं. म्हणूनच सिनेमे बनले भरपूर तरी चालता फार कमी. अनीस बाझमी दिग्दर्शित पागलपंती हा अशाच एका भ्रष्ट कॉपीचा बळी ठरला आहे. आपला प्रेक्षक म्हणजे निदान महाराष्ट्रातला मराठी प्रेक्षक व्यवस्थित हुशार आहे. सिनेमाच्या पोस्टरवरून, ट्रेलरवरून त्याला साधारण अंदाज येतो. पागलपंती आपले सगळे अंदाज चुकवत अपेक्षेपेक्षा जास्त बिनडोकपणाची नवी उंची गाठत जातो.
गोलमाल, धमाल, वेलकम, हाऊसफुल या प्रकारच्या सिनेमांची सरमिसळ करून पागलपंती हा सिनेमा बनला आहे. सिनेमाचा ट्रेलर पाहिल्यानंतर गोलमाल आणि हाऊसफुलची आठवण येतेच. पण यातले कलाकार जे काही धंदे करताहेत ते पाहून हा सिनेमा साधारण मस्तीसारख्या सिनेमाच्या कॅटेगरीत जायला लागतो. म्हणजे हा सिनेमा मॅडकॉमेडी आहे असं जरी धरून चाललं तरी या सिनेमात जो वेडपटपणा दाखवला आहे ते केवळ आपली हतबलता जास्तीतजास्त असहाय करून सोडतो.
खरंतर अनीस बाझमी हे अनुभवी दिग्दर्शक. हलचल, प्यार तो होना ही था, रेडी, वेलकम, वेलकम बॅक असे सिनेमे त्यांनी दिले. आता पागलपंतीमधून त्यांना फुलॉन वेडेपणा करायचा आहे हे उघड आहे. पण वेडेपणा आणि बिनडोकपणा यात फरक असतो हे त्यांच्या लक्षात आलेलं नाही. आर्शद वारसी, अनिल कपूर, सौरभ शुक्ला, जॉन अब्राहम, क्रिती खरबंदा, इलियाना डिक्रुझ, पुलकित सम्राट अशी सगळी फळी या सिनेमात असल्यामुळे संवादातून जे काही फुटकळ विनोद निर्माण व्हायला हवेत ते निर्माण होतात. आपण अगदीच मख्खासारखे बसून राहात नाही. पण जे विनोद हा सिनेमा निर्माण करतो ते विनोद अत्यंत पाचकळ असतात. पर्याय नाही ते दगडापेक्षा वीट मऊ या म्हणीप्रमाणे या सिनेमात आपण हसत सुटतो.
तीन मित्रांची ही गोष्ट. जंकी, चंदू आणि राजकिशोर यांची. यातल्या राजकिशोरची साडेसाती सुरू आहे. त्याने काहीही केलं तरी त्याचं बॅडलक आड येतं. त्याने बॅंकेची नोकरी धरली तर पहिल्याच दिवशी नीरज मोदीनामक एकाने बॅंकेचे हजारोकोटी रुपयाचं कर्ज घेऊन परदेशात पलायन केलं आहे. तर असा हा राज आपल्या मित्रांकडे आला आहे. या दोन मित्रांसह तो सतत नवनव्या संकटात अडकत जातो. त्याची ही गोष्ट. मग त्यांना सुंदर मुलीही मिळतात. त्यांनाही ते फसवतात आणि त्यांची गाठ पडते वायफाय आणि राजासाहेब या डॉनशी. मग ते एकमेकांना ठगवत कसे पुढे जातात आणि अडकतात याची ही गोष्ट.
त्याला ना गोष्ट.. ना गमतीदार कथानक. श्रीमंत लोकेशन्स.. भरपूर पैसा खर्च करून वापरेल्या गाड्या.. सुंदर ललना आणि सगळा पसारा यात आहे. यातून एक लक्षात येतं, की अनिल कपूर असो वा सौरभ शुक्ला.. आर्शद वारसी असो की जॉन अब्राहम या सगळ्या मंडळींनी केवळ पैसे मिळतायत म्हणून ही स्क्रीप्ट स्वीकारली आहे. जॉनने परमाणू, मद्रास कॅफे आदी सिनेमात चांगलं काम केलं आहे. पण अशा मॅडकॉमेडीत त्याला नाचवणं म्हणजे म्हशीला गाडीला जुंपल्यासारखं आहे. अत्यंत मख्ख चेहऱ्याने आणि तितकंच बलदंड शरीर दाखवत सिनेमाभर बागडत राहतो. तुलनेनं आर्शद आणि पुलकित सुसह्य वाटतात. यात टुल्ली आणि बुल्ली नावाचे डॉनही आहेत. यात केवळ आणि केवळ बघायला गंमत वाटते ती अनिल कपूरला. इतक्या वर्षांनीही तो जॉन आणि आर्शदपेक्षा तरून दिसतो. सौरभ शुक्ला यांची संवादफेकही काबिलेतारीफ. यात निवडलेले प्रसंग.. त्यातलं संवाद.. सगळं येडंगबाळं आहे. शिवाय हा सिनेमा भयंकर लांबलेला आहे. याची लांबी आहे तब्बल 165 मिनिटं.
गाणी म्हणाल तर तितकं फार ग्रेट कुठलंच नाही. कर्माचं हर करम..यात वापरलं गेलं आहे. मॅड कॉमेडीचे धडे गोलमाल, हाऊसफुल यांनी घालून दिले आहेतच. अशात हा सिनेमा फारच मागे पडतो. पागलपंती हा पागलपणाचा कळस नसून बिनडोकपणाचा कळस आहे असं म्हणावं लागेल.
म्हणून या सिनेमाला मिळतोय दीड स्टार.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement