Happy Birthday Vindu Dara Singh : ‘हनुमाना’ची भूमिकाही विंदू दारा सिंहचं करिअर वाचवू शकली नाही! जाणून घ्या अभिनेत्याबद्दलच्या खास गोष्टी...
Vindu Dara Singh Birthday : विंदू दारा सिंह यांनी जवळपास 20 वर्षे फिल्म इंडस्ट्रीत काम केले. याशिवाय त्यांचे नाव अनेक वादांशीही जोडले गेले होते.
Vindu Dara Singh Birthday : बॉलिवूड अभिनेते विंदू दारा सिंह (Vindu Dara Singh ) आज (6 मे) त्यांचा 58वा वाढदिवस साजरा करत आहे. विंदू दारा सिंह चित्रपटांमधून आपली खास ओळख निर्माण करू शकले नसतील, पण वादांमुळे नेहमीच चर्चेत राहिले आहेत. विंदू दारा सिंग यांनी त्यांचे वडील दारा सिंग यांच्याप्रमाणे प्रथम टीव्ही मालिकांमध्ये आणि नंतर चित्रपटांमध्ये काम केले. परंतु, त्यांना त्यांच्या वडिलांप्रमाणे प्रसिद्धी मिळवता आली नाही.
विंदू दारा सिंह यांनी जवळपास 20 वर्षे फिल्म इंडस्ट्रीत काम केले. याशिवाय त्यांचे नाव अनेक वादांशीही जोडले गेले होते. विंदू दारा सिंह यांनी 1994 मध्ये 'करण' या चित्रपटाद्वारे चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. यानंतर त्यांनी 1996 मध्ये ‘रब दिया रखा’ या पंजाबी चित्रपटात काम केले. त्यानंतर ते अनेक पंजाबी चित्रपटांमध्ये झळकले. त्यांनी सलमान खानसोबत 'गर्व', 'मैने प्यार क्यूं किया', 'पार्टनर' या चित्रपटांमध्ये काम केले आहे.
मालिकेत साकारली ‘हनुमाना’ची भूमिका
विंदूच्या चित्रपटांच्या यादीत 'किससे प्यार करूं', 'कम्बख्त इश्क', 'मारुती', 'मुझसे शादी करोगी' आणि 'हाऊसफुल' या चित्रपटांचाही समावेश आहे. चित्रपटांव्यतिरिक्त विंदू यांनी टीव्हीमध्येही काम केले. वडील दारा सिंह यांच्या प्रमाणेच त्यांनीही ‘हनुमाना’ची भूमिका साकारली होती. 'जय वीर हनुमान' या मालिकेत विंदू दारा सिंह यांनी हनुमानाची भूमिका साकारली होती. मात्र, यातून त्यांना फारसे यश मिळाले नाही.
आयपीएल स्पॉट फिक्सिंगमध्ये अडकले नाव
2009मध्ये विंदू यांनी 'बिग बॉस सीझन 3' जिंकला. 'बिग बॉस सीझन 3' जिंकल्यानंतर, अभिनेत्याचे करिअर पुन्हा रुळावर येईल, असे वाटले होते. मात्र, असे काहीही झाले नाही. 2013 मध्ये विंदू दारा सिंहचे नाव आयपीएल स्पॉट फिक्सिंगमध्ये आले होते. विंदू यांना पोलिसांनी अटक केली होती. मात्र, त्यावेळी स्थानिक न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला होता.
वैयक्तिक आयुष्यही चर्चेत!
विंदू दारा सिंह यांनी दोन विवाह केले आहेत. पहिले लग्न अभिनेत्री तब्बूची बहीण फराह नाज हाश्मीसोबत झाले होते. फराह मुस्लिम कुटुंबातली होती आणि विंदू हिंदू कुटुंबातले होते. त्यामुळे त्यांच्या लग्नात अनेक अडचणी आल्या. अशा परिस्थितीत 1996 मध्ये दोघांनी घरच्यांच्या इच्छेविरुद्ध जाऊन लग्न केले. फराह आणि विंदू यांना एक मुलगाही झाला. पण, विंदूंचे पहिले लग्न फार काळ टिकले नाही आणि दोघांचा घटस्फोट झाला. यानंतर विंदू दारा सिंह यांनी मॉडेल डीनो उमरोवासोबत लग्न केले. विंदू आणि डीनो यांना एक मुलगी आहे.
हेही वाचा :
Palak Tiwari : ‘सडपातळ’ म्हणत ट्रोल करणाऱ्यांना श्वेता तिवारीच्या लेकीचं बेधडक उत्तर, पलक म्हणाली...
PHOTO : तेजस्वी प्रकाशचा किलर ‘वॉर्डन’ लूक, लवकरच ‘लॉक अप’मध्ये एन्ट्री घेणार!