(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Grammy Awards 2024 : ग्रॅमी पुरस्कार सोहळ्यात आव्वाज भारताचा; फ्युजन बँड शक्ती आणि राकेश चौरसिया यांचा सन्मान
Grammy Awards 2024 : ग्रॅमी पुरस्कार 2024 मध्ये भारतीय संगीतकारांनी आपली मोहोर उमटवली आहे. भारतीय फ्युजन बँड शक्ति ला बेस्ट ग्लोबल म्युझिक अल्बम पुरस्काराने गौरवण्यात आले आहे
Grammy Awards 2024 : जगातील मानाचा समजल्या जाणाऱ्या ग्रॅमी संगीत पुरस्कार (Grammy Awards 2024 ) सोहळ्यात भारतीय संगीतकारांनी आपली मोहोर उमटवली आहे. भारतीय फ्युजन बँड 'शक्ती'ला बेस्ट ग्लोबल म्युझिक अल्बम पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. या म्युझिक बँडमध्ये शंकर महादेवन (Shankar Mahadevan), जॉन मॅक्लॉफलिन, झाकीर हुसैन (Zakir Hussain), व्ही. सेल्वागणेश (V. Selvaganesh) आणि गणेश राजगोपालन आदी कलाकारांचा समावेश आहे. या बँडशिवाय, बासुरी वादक राकेश चौरसिया यांनीदेखील ग्रॅमी पुरस्कार पटकावला आहे. आज, 5 फेब्रुवारी रोजी अमेरिकेतील लॉस एंजेलिसमध्ये पुरस्कार सोहळा पार पडला.
भारतीय फ्युजन बँड 'शक्ती'चा पुरस्कार
'शक्ती'बँडला त्यांचा अल्बम 'दिस मोमेंट'साठी 66 व्या ग्रॅमी अवॉर्ड्समध्ये 'बेस्ट ग्लोबल म्युझिक अल्बम' श्रेणीत विजेते म्हणून घोषित करण्यात आले. बँडने 45 वर्षांनंतर आपला पहिला अल्बम रिलीज केला आणि या अल्बमने थेट ग्रॅमी पुरस्कार पटकावण्याची किमया साधली. ब्रिटीश गिटार वादक जॉन मॅक्लॉफलिनने भारतीय व्हायोलिन वादक एल. शंकर, तबलावादक झाकीर हुसेन आणि टी.एच. 'विक्कू' विनायकरामसोबत 'शक्ती' या फ्युजन बँडची सुरुवात केली. पण 1977 नंतर हा बँड फारसा सक्रिय नव्हता.
1997 मध्ये जॉन मॅक्लॉफलिनने त्याच संकल्पनेवर पुन्हा 'रिमेम्बर शक्ती' नावाचा बँड तयार केला आणि त्यात व्ही. सेल्वागणेश (टी.एच. 'विक्कू' विनायकरामचा मुलगा), मेंडोलिन वादक यू. श्रीनिवास आणि शंकर महादेवन यांचा समावेश होता. 2020 मध्ये, बँड पुन्हा एकत्र आला आणि 'शक्ती' म्हणून त्यांनी 46 वर्षांनंतर त्यांचा पहिला अल्बम 'दिस मोमेंट' रिलीज केला.
SHAKTI wins a #GRAMMYs #GRAMMYs2024 !!! Through this album 4 brilliant Indian musicians win Grammys!! Just amazing. India is shining in every direction. Shankar Mahadevan, Selvaganesh Vinayakram, Ganesh Rajagopalan, Ustad Zakhir Hussain. Ustad Zakhir Hussain won a second Grammy… pic.twitter.com/dJDUT6vRso
— Ricky Kej (@rickykej) February 4, 2024
झाकीर हुसैन यांचा तिसरा ग्रॅमी पुरस्कार
भारताचे प्रसिद्ध तबला वादक झाकीर हुसैन यांनी तिसऱ्यांदा ग्रॅमी पुरस्कार पटकावला. याआधी त्यांना 'प्लेनेट ड्रम्स'साठी टी.एच. विक्कू विनायकराम यांच्यासह ग्रॅमी पुरस्कार मिळवला होता. 2008 मध्ये 'ग्लोबल ड्रम प्रोजेक्ट'साठी ग्रॅमी पुरस्कार मिळाला आहे. शक्ती साठी झाकीर यांना ग्रॅमी मिळाला. हा त्यांचा तिसरा ग्रॅमी पुरस्कार ठरला आहे.
भारताचे प्रसिद्ध सितार वादक आणि संगीतकार, दिवंगत पंडित रविशंकर यांना 1968 मध्ये ग्रॅमी पुरस्कार मिळाला. ग्रॅमी पुरस्कार मिळावणारे ते पहिले भारतीय संगीतकार वादक ठरले. पंडित रविशंकर यांच्यासह वेस्टर्न म्युझिक कंडक्टर झुबिन मेहता यांनी देखील भारतासाठी 5 वेळा ग्रॅमी पुरस्कार जिंकले आहेत.