(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Hollywood Actor Johnny Wactor : धक्कादायक! प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्याला गोळ्या घालून संपवलं; सिनेइंडस्ट्रीवर शोककळा
Hollywood Actor Johnny Wactor Dies : : लॉस एजंलिसमध्ये चोरांनी केलेल्या हल्ल्यात जॉनीला प्राण गमवावे लागले आहे. जखमी झालेल्या जॉनीला रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
Hollywood Actor Johnny Wactor Dies : हॉलिवूड अभिनेता जॉनी वॅक्टर (Actor Johnny Wactor Dies) यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. लॉस एजंलिसमध्ये चोरांनी केलेल्या हल्ल्यात जॉनीला प्राण गमवावे लागले आहे. जखमी झालेल्या जॉनीला रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. जॉनी वॅक्टर हा अवघ्या 37 वर्षांचा होता. या घटनेनंतर हॉलिवूडमध्ये शोककळा पसरली असून कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
काही आंतरराष्ट्रीय माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, जॉनी वॅक्टर याची 25 मे रोजी हत्या करण्यात आली. जॉनीची आई स्कारलेट यांनी एका वृत्तसंस्थेला सांगितले की, शनिवारी सकाळी 3 वाजण्याच्या सुमारास जॉनीवर प्राणघातक हल्ला करण्यात आला. चोरांकडून त्याच्या कारमधून काही वस्तू चोरायच्या होत्या. जॉनीने चोरांचा कोणताही प्रतिकार केला नाही. तरीदेखील त्याची हत्या करण्यात आली असल्याचे त्याच्या आईने सांगितले.
View this post on Instagram
जॉनीचा हॉलिवूडमधील व्यवहार पाहणारा डेव्हिड शॉलने त्याच्या मृत्यूच्या वृत्ताला दुजोरा दिला. 'पीपल मॅगझिन'शी बोलताना डेव्हिडने जॉनी हा एक भला माणूस असल्याचे सांगितले. तो खूप प्रतिभावान होता. त्याला ओळखणाऱ्या प्रत्येकासाठी तो एक अद्भुत व्यक्ती होता. त्याने कठोर परिश्रम केले आणि कधीही हार मानली नाही. व्यावसायिक जीवनातही त्याने आपले सर्वोत्तम योगदान देण्याचा प्रयत्न केला. जॉनीच्या मृत्यूच्या बातमीने सर्वांनाच धक्का बसला असल्याचे शॉलने सांगितले.
अभिनेत्रीने व्यक्त केले दु:ख
जॉनी हा 'जनरल हॉस्पिटल'मधील ब्रँडो कॉर्बिनच्या भूमिकेसाठी प्रसिद्ध आहे. 200 हून अधिक एपिसोड असलेल्या या सीरिजमध्ये जॉनीने ड्रग ॲडिक्ट साशाच्या पतीची भूमिका साकारली होती. जॉनीच्या मृत्यूच्या बातमीने सह-अभिनेत्री सोफिया मॅटसनला धक्का बसला आहे. सोशल मीडियावर फोटो शेअर करून त्यांना श्रद्धांजली वाहिली.
View this post on Instagram
तिने म्हटले की, माझं हृदय या घटनेने तुटलं आहे. जॉनी हा सर्वोत्तम होता.अतिशय सच्चा माणूस आणि काळजी घेणारा व्यक्ती होता. अतिशय मेहनती आणि विनम्र असणाऱ्या जॉनीने आपल्या चहुबाजूला आनंदच वाटला असल्याचे तिने म्हटले.
या शोमध्ये झळकला होता जॉनी...
जनरल हॉस्पिटल शिवाय जॉनीने एनसीआयएस, द ओए, वेस्टवर्ल्ड, द पॅसेंजर, स्टेशन 19, बार्बी रिहॅब, सायबेरिया, एजेंट एक्स, वँटास्टिक, अॅनिमल किंगडम, हॉलिवूड गर्ल, ट्रेनिंग डे आदी सीरीज, शोमध्ये जॉनीने काम केले.