Chhatrapati Shivaji Maharaj :'नको मूर्ती ती लौकिक,नको स्मारक भौतिक...', राजकोट किल्ल्यावरील घटनेवर मराठी दिग्दर्शकाचे भावनिक शब्द
Chhatrapati Shivaji Maharaj : दिग्पाल लांजेकर यांनी राजकोट किल्ल्यावरील घटनेवर व्यक्त होत त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्यावर आधारित सिनेमांचं अष्टक काढून दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर (Digpal Lanjekar) यांनी प्रेक्षकांसमोर महारांजाचा इतिहास सादर केला. फर्जंद, फत्तेशिकस्त, पावनखिंड, सुभेदार,शेर शिवराज या सिनेमांमधून त्यांनी छत्रपतींचा इतिहास सांगितला. पण काही दिवसांपूर्वी मालवणमधील राजकोट किल्ल्यावर घडलेल्या घटनेमुळे राज्यात संतापाची लाट उसळली. काही महिन्यांपूर्वीच उद्घाटन झालेला शिवाजी महाराजांचा 35 फुटी पूर्णाकृती पुतळा कोसळला.
दरम्यान या घटनेनंतर महाराष्ट्रातील जनतेमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण झाला. पण राजकीय वर्तुळातून मात्र आरोप-प्रत्यारोपांचं राजकारण सुरु झाल्याचं पाहायला मिळालं. या सगळ्या प्रकरणावर सामान्य जनतेपासून ते कलाविश्वातील अनेकपर्यंत सोशल मीडियाच्या माध्यमातून संताप व्यक्तही करण्यात आला. पण या सगळ्यात दिग्पाल लांजेकरांच्या शब्दांनी परिस्थितीचं गांभीर्य पुन्हा एकदा लक्षात आणून दिलं.
दिग्पाल लांजेकर यांची कविता
गलबलला दर्या,
त्याचे अश्रू कुणा दिसेना
बाप कोसळता माझा,
वेदना उरी ती मावेना
चूक कुणाची कुणाची,
सारे भांडती भांडती
पण भाव स्वराज्याचा,
बघा सारेच सांडती
रे माझ्या बापा शिवराया
तुमच्यासाठी उरे काया
नको मूर्ती ती लौकिक
नको स्मारक भौतिक
देवा शक्ती द्या लेकरा
तव कवतिक सांगाया
तव पराक्रमाचा तो
दीप लागू दे तेवाया
श्वास माझा हो संपू दे
तुमची स्मृती ती कोराया
मनामनाच्या अंतरी
तुमची मूर्ती साकाराया
View this post on Instagram
Shivaji Maharaj Sindhudurg Statue Collapsed : नेमकं काय घडलं?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 4 डिसेंबर 2023 रोजी नौदल दिनी राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या या 35 पुतळी फुट्याचे लोकार्पण करण्यात आले होते. मात्र, अवघ्या आठ महिन्यांत हा पुतळा कोसळल्याने त्याची बांधणी निकृष्ट असल्याचा आरोप होत आहे. या पुतळ्याला काही दिवसांपूर्वी गंज लागला होता. ही बाब लक्षात येताच सार्वजनिक बांधकाम खात्याने पत्र लिहून ही गोष्ट नौदलाला कळवली होती. मात्र, त्यानंतर नौदलाकडून योग्य ती कार्यवाही झाली नाही आणि शिवाजी महाराजांचा हा पुतळा मुळापासून कोसळण्याचा दुर्दैवी प्रकार घडला. यावरुन विरोधकांनी राज्य सरकार आणि केंद्र सरकारविरोधात टीकेची राळ उठवली आहे.
राज्य सरकारच्या दाव्यानुसार, राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या या पुतळ्याची देखरेख आणि निगा करण्याची जबाबदारी नौदलाची होती. यासाठी नौदलाने मेसर्स आर्टीस्ट्री नावाच्या कंपनीला कंत्राट दिले होते. जयदीप आपटे हे कंपनीचे प्रोप्रायटर आहेत. तर केतन पाटील स्ट्रक्चरल कन्सल्टंट म्हणून काम पाहत होते. या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.