कुछ बडा होने को मंगता है!
लॉकडाऊन वाढल्यामुळे हिंदी-मराठी सिनेसृष्टीची अवस्था बिकट झाली आहे. जूनपासून सुरू होणारा पावसाळा आणि माणसांच्या मनात असणारी कोरोनाची भीती यावर मात करायची असेल तर कुछ बडा होने को मंगता है... असं इंडस्ट्रीला वाटतं.
मुंबई : सध्या लॉकडाऊनमुळे प्रत्येकजण घरी बसला आहे. आत्ताचा लॉकडाऊन वाढला खरा. पण कोरोनावर मात करण्यासाठी तो गरजेचाही आहे. वुहानमध्ये जवळपास 76 दिवसांनी लॉकडाऊन उठला आणि पुन्हा एकदा शहर गजबजलं. तिथले मॉल्स, दुकानं पुन्हा सुरू झाली. तशी थिएटर्सही उघडली गेली. पण गंमत अशी की एरवी हाऊसफुल्ल असणाऱ्या या थिएटर्समध्ये उपस्थिती होती ती हाताच्या बोटावर मोजता येईल इतकी. कारण, कोरोनाचा धोका टळला असला तरी कोरोनाचं भय अजून तिथल्या लोकांच्या मनातून गेलेलं नाही. अशीच अवस्था आपल्या सिनेसृष्टीचीही होणार आहे.
या कोरोनाने आपल्याकडचा सुट्टीचा हंगाम खाल्ला. एप्रिल आणि मे या दोन महिन्यात लॉकडाऊन झाल्यामुळे आता या काळात प्रदर्शित होणारे हिंदी-मराठी असे जवळपास 40 चित्रपट प्रदर्शित होता होता राहिले आहेत. यात आवर्जून उल्लेख करायला हवा तो सूर्यवंशी, 83, गुलाबो-सिताबो, कुली नंबर 1 हे हिंदी आणि पांघरूण, मी वसंतराव देशपांडे, दे धक्का, बस्ता अशा मराठी सिनेमांचा समावेश होता. हे दोन महिने गेल्यामुळे आता पुढचे सहाच महिने वर्ष संपायला उरले आहेत. साधारणपणे सहा महिन्यांत 26 शुक्रवार येतात. या 26 शुक्रवारी आता सिनेमांची मारामारी पाहायला मिळेल. अर्थात 1 जूनपासून भारतातली थिएटर्स सुरू झाली तर ही अवस्था असेल. सार्वजनिक ठिकाणचं लॉकडाऊन वाढलं तर अवस्था आणखी बिकट असेल.
याबाबत बोलताना मराठीतले अनुभवी निर्माते समीर दीक्षित म्हणाले, परिस्थिती कठीण असणार आहे. अनेक सिनेमे अनिश्चित काळासाठी पुढे गेले आहेत. हा लॉकडाऊन संपल्यानंतर हिंदीतल्या मोठ्या, चर्चेतल्या सिनेमांनी प्रदर्शित होणं आवश्यक आहे. तरच पुन्हा गर्दी होईल. ही गर्दी झाली तर पुन्हा एकदा हा धंदा सुरू होईल. अर्थात, भारतात लॉकडाऊनमुळे अनेक लोक घरी बसून आहे. त्यांनाही नव्यानं काहीतरी बघायची इच्छा आहे. बडे सिनेमे आले तर लोकांनाही बरं वाटेल.'
मिळालेल्या माहितीनुसार 83, सूर्यवंशी या सिनेमांचं काम अजून व्हायचं आहे. सूर्यवंशी सिनेमाचं सहा दिवसांचं काम अपूर्ण आहे. जून पर्यंत लॉकडाऊन गेला तर पुढे पाऊस सुरू होतो. मग हा सिनेमा थेट 15 ऑगस्टपर्यंत जाईल, असंही मत एका वितरकाने व्यक्त केलं. इंडस्ट्रीत काम करणाऱ्या वेगवेगळ्या लोकांशी बोलल्यावर त्यांच्या बोलण्याचा सूरही असाच आहे, की लॉकडाऊन उठवल्यानंतर सिनेमाघरांत मोठी कलाकृती यायला हवी. अगदी त्यांच्याच भाषेत सांगाचयं, तर कुछ बडा होने को मंगता है. ऐसा हुआ तोही पब्लिक आएगी.
आगामी काळ एकूणच मनोरंजन सृष्टीसाठी कठीण काळ असणार आहे. कोरोनाचं संकट टळून नाटकाची, सिनेमाची थिएटर्स सुरू व्हायला किमान सप्टेंबर उजाडेल असंही बोललं जातं, अर्थात हा दावा आहे. जून ते सप्टेंबर पाऊस असल्यामुळे पावसाचा काळ गृहित धरला जात नाही. म्हणूनच हे वर्ष मनोरंजन सृष्टीसाठी सबुरीने घ्यायचंच असणार आहे.
संबंधित बातम्या :