एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
'त्या' रात्री नेमकं काय घडलं होतं, बोनी कपूर यांचं पहिल्यांदा स्पष्टीकरण
ट्रे़ड अॅनालिस्ट कोमल नाहटा यांनी आपल्या ब्लॉगमध्ये बोनी कपूर यांच्याशी श्रीदेवीच्या मृत्यूनंतर झालेल्या मुलाखतीतील सारांश शेअर केला आहे. त्या रात्री नेमकं काय झालं, याचा खुलासा त्यांनी केला आहे.
मुंबई : 24 वर्षांपूर्वी बोनी कपूर यांनी श्रीदेवीला एक सरप्राईज दिलं होतं, या सरप्राईझने दोघांचंही आयुष्य बदलून गेलं. यावेळी, पुन्हा एकदा एका सरप्राईजने बोनी कपूर आणि श्रीदेवी यांचं आयुष्य कायमचं बदललं. फरक इतकाच, की हे सरप्राईज एका वादळाच्या रुपाने आलं ज्यामुळे श्रीदेवी बोनी कपूर यांच्यापासून कायमची दूर गेली.
ट्रे़ड अॅनालिस्ट कोमल नाहटा यांनी आपल्या ब्लॉगमध्ये श्रीदेवीच्या मृत्यूनंतर बोनी कपूर यांच्याशी झालेल्या चर्चेतील सारांश शेअर केला आहे.
बोनी कपूर 24 वर्षांपूर्वी श्रीदेवीला सरप्राईज देण्यासाठी अचानक बंगळुरुला गेले होते. त्यावेळी श्रीदेवी आणि अनिल कपूर तिथे ‘मिस्टर बेचारा’ या सिनेमाचं शूटिंग करत होते. त्या रात्री श्रीदेवी आणि बोनी कपूर यांनी फोनवर रात्रभर गप्पा मारल्या. बोनी कपूर फोन ठेवायला तयारच नव्हते. त्यांच्या मनात आलं आणि विमानाने ते थेट बंगळुरुला गेले, जिथे श्रीदेवी थांबलेली होती. त्यावेळी कुणाला कल्पनाही नव्हती, की ते श्रीदेवीला भेटण्यासाठी आले आहेत. सर्वांना असंच वाटलं, की ते आपला भाऊ अनिल कपूरला भेटायला आले आहेत, असं कोमल नाहटाने ब्लॉगमध्ये लिहिलं आहे.
आता 24 वर्षांनंतर बोनी कपूर श्रीदेवीला पुन्हा एकदा असंच सरप्राईज देणार होते आणि ते मुंबईहून परत दुबईला श्रीदेवीला भेटण्यासाठी गेले होते. ''श्रीदेवी दुबईत आपली मुलगी जान्हवीसाठी काही खरेदी करणार होती आणि त्यामुळेच भाचा मोहित मारवाहच्या लग्नानंतरही ती तिथेच थांबली होती. श्रीदेवीने आपल्या फोनमध्ये खरेदीची सगळी यादी ठेवली होती. बोनी कपूर यांना 22 फेब्रुवारीला लखनौ येथील एका मीटिंगसाठी यायचं होतं म्हणून ते मुंबईला पुढे आले. दरम्यान, श्रीदेवी दुबईत एकटी असल्यामुळे जान्हवीलाही चिंता होती, कारण, श्रीदेवीला एकटं राहण्याची सवय नव्हती. लग्नात एंजॉय केल्यामुळे श्रीदेवी थकलेली होती. त्यामुळेच श्रीदेवीने 22 आणि 23 तारखेला आराम केला आणि भारतात परतण्याचं तिकीटही बदललं,'' असं बोनी कपूर सांगतात.
बोनी कपूर पुढे सांगतात, ''24 फेब्रुवारीला सकाळी मी श्रीदेवीशी बोललो होतो, तेव्हा ती म्हणाली होती , "पापा" ( श्रीदेवी बोनी कपूर यांना पापा नावाने हाक मारायची ) मी तुम्हाला खूप मिस करत आहे. तेव्हा मी सुद्धा म्हणालो की मलाही तुझी खूप आठवण येते. मात्र तेव्हा मी तिला सांगितलं नव्हतं की मी आज संध्याकाळी तुला भेटायला येणार आहे. जान्हवीनेही मला सांगितलं होतं, की आईला एकटं राहण्याचा खूप त्रास होतोय. कारण, तिला एकटं राहण्याची सवय नाही. एकटेपणात ती स्वतः जवळच्या महत्वाच्या वस्तूही कुठेतरी हरवून बसते. असं पहिल्यांदाच झालं होतं की परदेशात दोन तीन दिवस श्रीदेवी एकटी राहिली होती.''
त्या रात्री नेमकं काय झालं?
बोनी कपूर यांनी कोमल नाहटा यांना दुबईतील ‘त्या’ रात्रीची संपूर्ण हकीगत सांगितली. दुपारी साधारण 3.30 वाजता बोनी कपूर दुबईला जाण्यासाठी रवाना झाले. श्रीदेवीने फोन केला होता, त्यावेळी ते मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टवर लाऊन्ज एरियात बसले होते. बोनी कपूर हे श्रीदेवीला सरप्राईज देण्याच्या विचारात होते. त्यामुळे श्रीदेवीच्या त्यावेळी आलेल्या फोनवर बोनी कपूर यांनी खोटं खोटं सांगितलं. ते म्हणाले, “जान (श्रीदेवी), मी काही वेळ बिझी असेन आणि कदाचित माझा फोनही ऑफ होऊ शकतो. त्यामुळे काळजी करु नकोस.” यावेळी, आपण फ्री झाल्यावर आठवणीने फोन करु, असंही बोनी कपूर यांनी श्रीदेवीला कळवलं.
संध्याकाळी साधारण 6.20 वाजता (दुबईच्या वेळेनुसार) बोनी कपूर दुबईत पोहोचले. त्यानंतर ते हॉटेलमध्ये गेले आणि चेक इन केलं. श्रीदेवी ज्या रुममध्ये थांबली होती, त्या रुमची डुप्लिकेट चावी घेतली आणि हॉटेल स्टाफला सांगितलं की, बॅग वगैरे थोड्या वेळाने घेऊन या. बोनी कपूर दुबईत येण्याचा श्रीदेवीला अंदाज होताच, असं स्वत: श्रीदेवीनेच बोनी कपूर यांना सांगितलं.
बोनी कपूर आणि श्रीदेवीने सुमारे अर्धा तास गप्पा मारल्या. त्यानंतर बोनी कपूरने श्रीदेवीला शॉपिंगचा प्लॅन पुढे ढकलण्यास सांगितलं आणि डिनरसाठी जाण्याबाबत विचारलं. शिवाय, श्रीदेवीला तयार होण्यासही सांगितलं. बोनी कपूर यांनी सांगितलं की, “मी लिव्हिंग रुममध्ये आलो आणि श्रीदेवी आंघोळीसाठी निघून गेली.” त्यानंतर बोनी कपूर यांनी टीव्ही पाहण्यास सुरुवात केली. काही चॅनेल बदलल्यानंतर भारत वि. दक्षिण आफ्रिका मॅच पाहत होते. यानंतर पाकिस्तान सुपरलीगच्या हायलाईट्स पाहिल्या. मात्र बोनी कपूरना लक्षात आले की, आज शनिवार असल्याने रेस्ट्राँमध्ये गर्दी असेल. त्यामुळे लवकर जायला हवं.
त्यावेळी साधारण रात्रीचे 8 वाजले असतील. बराच वेळ झाला होता, त्यामुळे बोनी कपूर यांनी लिव्हिंग रूममधून दोन वेळा मोठ्याने श्रीदेवीला आवाज दिला. टीव्हीचा आवाजही कमी केला, मात्र कोणतंही उत्तर आलं नाही. त्यानंतर ते बेड रूममध्ये गेले, तिथे त्यांना पाण्याचा आवाज येत होता. त्या नंतरही बोनी यांनी "जान... जान..." अशा हाका मारल्या मात्र कोणतंही उत्तर आलं नाही, हे विचित्र होतं.
बोनी यांनी बाथरूमचा दरवाजा उघडला, जो मुळात आतून बंद केलेला नव्हता. बाथटब पूर्णपणे पाण्याने भरला होता आणि त्यामध्ये श्रीदेवी पूर्णपणे बुडाली होती. बोनी यांनी जे पाहिलं ते सत्य आहे हे मानण्यासाठी ते तयार नव्हते. त्यांचा आपल्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता...
तशा अवस्थेत श्रीदेवीला पाहून बोनी कपूर यांच्यावर जी परिस्थिती ओढावली असेल, त्याची कुणी कल्पनाही करु शकत नाही. श्रीदेवी समोर पाण्यात बुडालेल्या अवस्थेत होती. बोनी कपूर यांचं सर्वस्व हरवलं होतं. दोन तासांपूर्वीच बोनी कपूर पत्नीला सरप्राईज देण्यासाठी आले होते, ते एका वाईट स्वप्नामध्ये बदललं होतं. श्रीदेवी.. जी डिनरसाठी तयार होत होती, काळाने असा घाला घातला की ही तयारी अंतिम संस्कारांमध्ये बदलली...
पाहा व्हिडीओ :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
निवडणूक
क्रिकेट
Advertisement