(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Vaishali Mhade : मी संगीत निवडलं नाही, तर संगीताने मला निवडलं आहे : वैशाली माडे
Vaishali Mhade : लोकप्रिय गायिका वैशाली माडे सध्या 'सारेगमप लिटिल चॅम्प्स'मुळे चर्चेत आहे.
Vaishali Mhade : लोकप्रिय गायिका वैशाली माडे (Vaishali Mhade) सध्या 'सारेगमप लिटिल चॅम्प्स'मुळे (Saregamapa Little Champs) चर्चेत आहे. 'सारेगमप' या लोकप्रिय कार्यक्रमाची वैशाली स्पर्धक होती. आता 'सारेगपम लिटिल चॅम्प्स' या कार्यक्रमाचं परीक्षण करताना ती दिसणार आहे. दरम्यान "मी संगीत निवडलं नाही, तर संगीताने मला निवडलं आहे", असं वक्तव्य वैशाली माडेने केलं आहे.
'सारेगमप' (Saregamapa) या कार्यक्रमाबद्दल बोलताना वैशाली माडे म्हणाली,"सारेगमप लिटिल चॅम्प्स' या कार्यक्रमाने महाराष्ट्राला पंचरत्न मिळवून दिली आहेत. या मंचाने आजवर अनेक गायक घडवले. एक स्पर्धक म्हणून सुरू झालेला या मंचावरचा प्रवास आता परिक्षकापर्यंत येऊन पोहोचला आहे. याचा खूप आनंद आहे".
वैशाली माडे पुढे म्हणाली,"सारेगमप लिटिल चॅम्प्स'च्या या नव्या पर्वातील छोट्या स्पर्धकांना मी चांगलं मार्गदर्शन करणार आहे. आता जरी मी परीक्षकाच्या भूमिकेत असले तरी याआधी मी एक स्पर्धक होते हे कधीच विसरणार नाही".
View this post on Instagram
वैशाली माडेचा प्रवास... (Vaishali Mhade Singing Journey)
संगीताच्या प्रवासाबद्दल बोलताना वैशाली माडे म्हणाली,"मी संगीत निवडलं नाही, तर संगीताने मला निवडलं आहे. माझ्या गाण्याने मला नवी ओळख दिली आहे. संगीत हे माझ्यासाठी सर्वस्व आहे. वडिलांकडून निश्चितच गाण्याचा वारसा मिळाला आहे. पण जिद्द, मेहनत अशा अनेक गोष्टींचा सामना करत आज मी इथपर्यंत पोहोचले आहे. त्यामुळे आतापर्यंत माझा संघर्ष हीच माझी जगण्याची प्रेरणा राहिली आहे".
वैशाली माडे म्हणाली,"एक कलाकार म्हणून माझ्यावर प्रभाव टाकणारे सर्वात मोठे समर्थक किंवा मार्गदर्शक म्हणजे माझे गुरुजी सुरेश वाडकर. आता 'सारेगमप लिटिल चॅम्प्स'च्या नव्या पर्वात ते गुरुजींच्या भूमिकेत दिसणार आहेत. माझ्या संगीताला त्यांनी वळण दिलं आहे. माझ्या संगीताच्या प्रवासात त्यांनी मला दृष्टी देण्याचं काम केलं आहे".
'सारेगपम लिटिल चॅम्प्स' प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज!
'सारेगपम लिटिल चॅम्प्स' (Saregamapa Little Champs) हा बहुचर्चित कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहे. 9 ऑगस्टपासून या कार्यक्रमाचं नवं पर्व प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सलील कुलकर्णी आणि वैशाली माडे या कार्यक्रमाचे परिक्षक असणार आहेत. प्रेक्षक आता या कार्यक्रमाची आतुरतेने वाट पाहत आहेत.
संबंधित बातम्या