(Source: ECI/ABP News/ABP Majha)
TOP 10 Entertainment News : दिवसभरातील दहा महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या
Entertainment News : दिवसभरातील दहा महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्यांचा घेतलेला आढावा.
TOP 10 Entertainment News : दिवसभरातील दहा महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या -
न्यूड फोटोशूट प्रकरणी अभिनेता रणवीर सिंह पोलिसांसमोर हजर
बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंहचे न्यूड फोटोशूट प्रकरण चांगलेच गाजले होते. या प्रकरणाची मोठी चर्चा रंगली होती. या प्रकरणी अभिनेत्याविरोधात तक्रार नोंदवण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनी अभिनेत्याला चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले होते. मात्र, रणवीरने दोन आठवड्यांची मुदत मागितली होती. अखेर आज (29 ऑगस्ट) रणवीर सिंह पोलिसांसमोर हजर झाला आहे. चेंबूर पोलिसांनी रणवीर सिंह याचा जबाब नोंदवला आहे.
केतकी चितळेचं फेसबुकवर कमबॅक
अभिनेत्री केतकी चितळे आपल्या वादग्रस्त आणि बेधडक वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असते. गेल्या काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या विरोधात आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट केल्यामुळे केतकीला तुरुंगवास भोगावा लागला होता. तसेच तिला तिच्या फेसबुक अकाऊंटचा वापर करण्यालाही मनाई करण्यात आली होती. पण आता तिला तिचं फेसबुक अकाऊंट परत मिळाले आहे.
'ज्ञानेश्वर माउली' मालिकेत उत्कर्ष शिंदे साकारणार संत चोखामेळा
'ज्ञानेश्वर माउली' या मालिकेने प्रेक्षकांना संतांची परंपरा उलगडवत भक्तिरसात तल्लीन केलं आहे. माउली आणि त्यांची भावंडं यांचे चमत्कार, रेड्यामुखी वेद, श्रीसार्थ ज्ञानेश्वरी, विश्वरूप दर्शन, पसायदान अशा अनेक गोष्टी प्रेक्षकांना विशेष भावल्या आहेत. आता या मालिकेत उत्कर्ष शिंदे संत चोखामेळांच्या भूमिकेत दिसून येणार आहे.
अमिताभ बच्चन यांचा आज क्वॉरंटाईनचा शेवटचा दिवस
बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचा आज क्वॉरंटाईनचा शेवटचा दिवस आहे. तसेच त्यांच्या प्रकृतीतदेखील सुधारणा होत आहे. अमिताभ यांनी दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाल्याची माहिती चाहत्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली होती.
'बिग बॉस मराठी'च्या चौथ्या सीझनचा प्रोमो आऊट
'बिग बॉस मराठी'च्या चौथा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चाहते या कार्यक्रमाची आतुरतेनं वाट पाहत आहेत. नुकताच या कार्यक्रमाचा नवा प्रोमो आऊट झालाय. या प्रोमोमध्ये महेश मांजरेकर राग शांत करण्याच्या 101 उपायांविषयी बोलत आहेत.
'शिवप्रताप–गरुडझेप’ सिनेमातील 'जय भवानी जय शिवराय' गीत प्रेक्षकांच्या भेटीला
स्वराज्याच्या चळवळीला गती देणारा ‘लोकोत्सव’ म्हणून गणेशोत्सव साजरा केला जातो. लोकमान्य टिळकांनी स्वराज्याचा मंत्र दिला. आता त्या स्वराज्याचे सुराज्य करण्याचे आपले कर्तव्य आहे. आणि त्यासाठी प्रत्येकाच्या मनात सुराज्याचे स्फुल्लिंग चेतविण्यासाठी आणि गणेशोत्सवाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी शिवप्रताप–गरुडझेप या आगामी भव्य मराठी चित्रपटातील शिवशक्तीमय गीत 'जय भवानी जय शिवराय' ! प्रदर्शित करण्यात आले आहे.
सोनाली फोगाट यांच्या मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआयकडे?
भाजप नेत्या आणि सोशल मीडिया स्टार सोनाली फोगाट हत्याप्रकरणाचा तापास सध्या गोवा पोलीस करत आहेत. या प्रकरणातील तिन्ही आरोपींना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात होती. आता सोनाली फोगाट हत्याप्रकरणाची संपूर्ण माहिती असणारे कागदपत्र अंजुना पोलिस स्टेशनचे पीआय प्रशल देसाई यांनी तयार केले आहे. जर या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्यात आला तर गोवा पोलीस या प्रकरणाच्या तपासाचा प्रत्येक तपशील सीबीआयकडे सोपवतील. या कागदपत्रामध्ये तपासादरम्यान सापडलेले पुरावे, साक्षीदारांचे जबाब, फॉरेन्सिक तपासणीचा अहवाल या गोष्टींची नोंद करण्यात आली आहे.
बॉक्स ऑफिसवर ‘लायगर’ची अवस्था बिकट
दिग्दर्शक पुरी जगन्नाथ यांचा 'लायगर' हा चित्रपट 25 ऑगस्ट रोजी अनेक भाषांमध्ये प्रदर्शित झाला. मात्र तरीही हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर संघर्ष करत आहे. पहिल्या दिवशी चित्रपटाने चांगला व्यवसाय केला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याची कमाई 50 टक्क्यांनी कमी झाली. तिसऱ्या दिवशी कमाईचे आकडे 60 टक्क्यांपर्यंत खाली आले आणि आता चौथ्या दिवशी त्याची स्थिती आणखी बिकट झाली आहे.
शिल्पा शेट्टीचा मुलगा वयाच्या 10 व्या वर्षीच झाला बिझनेसमन
शिल्पा शेट्टीचा मुलगा वियान वयाच्या अवघ्या दहाव्या वर्षीच बिझनेसमन झाला आहे. सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर करत शिल्पाने यासंदर्भात माहिती दिलीए. दहा वर्षीय वियान कुंद्राने त्याचं युनिक बिझनेस वेंचर सुरू केलंय. शिल्पाने वियानचा एक खास व्हिडीओ शेअर करत त्याच्या नव्या स्टार्टअपची माहिती चाहत्यांना दिली आहे.
कॉफी विथ करणमध्ये क्रिती सेनन करणार गौप्यस्फोट
हीरोपंती या सिनेमाच्या माध्यमातून क्रिती आणि टायगर यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. दोघे आता गणपत या सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीस येणारेत. क्रिती आणि टायगरची ऑन स्क्रीन केमिस्ट्री प्रेक्षकांनी पाहिली आहे. आता त्यांची ऑफ स्क्रिन केमिस्ट्री कॉफी विथ करणच्या आगमी एपिसोडमध्ये प्रेक्षक पाहू शकतात. नुकताच या एपिसोडचा प्रोमो सोशल मीडियावर आऊट झाला आहे.