The Kerala Story : कुठे मोफत शो तर कुठे महिलांसाठी विशेष स्क्रीनिंग; भाजप नेत्यांचा 'द केरळ स्टोरी'ला पाठिंबा!
The Kerala Story : महाराष्ट्रात भाजप नेत्यांकडून 'द केरळ स्टोरी'चे मोफत शो आणि महिलांसाठी विशेष स्क्रीनिंग आयोजित करण्यात येत आहे.
The Kerala Story Maharashtra Special Show : 'द केरळ स्टोरी' (The Kerala Story) हा सिनेमा रिलीजआधीपासूनच चर्चेत आहे. 'द कश्मीर फाइल्स'प्रमाणे (The Kashmir Files) 'द केरळ स्टोरी'लादेखील मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे. तर दुसरीकडे या सिनेमाचे नेत्यांकडून खास शो आयोजित केले जात आहेत. देशभरात या सिनेमाला संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. महाराष्ट्रात भाजप नेत्यांकडून 'द केरळ स्टोरी'चे मोफत शो आणि महिलांसाठी विशेष स्क्रीनिंग आयोजित करण्यात येत आहे.
भाजप प्रवक्ते शिवराय कुलकर्णी यांच्याकडून 'द केरळ स्टोरी'चा मोफत शो
'द केरळ स्टोरी' या सिनेमात दाखवलेले लव्ह जिहाद सारखे प्रकार अमरावती जिल्ह्यातही उघडकीस आले होते. त्या पार्श्वभूमीवर अमरावती (Amravati) शहरातील महिला आणि तरुण मुलींनी हा सिनेमा पाहावा, असं आवाहन भाजपकडून करण्यात आले असून त्याकरिता भाजप प्रवक्ते शिवराय कुलकर्णी यांच्याकडून 'द केरळ स्टोरी' या सिनेमाचा एक मोफत शो दाखवला गेला.
धाराशिवमध्ये 'द केरळ स्टोरी'चं महिलांसाठी विशेष स्क्रीनिंग
देशभरात वादळी चर्चा होत असलेल्या 'द केरळ स्टोरी' सिनेमाचं धाराशिवमध्ये खास महिलांसाठी विशेष स्क्रीनिंग आयोजित करण्यात आलं होतं. या विशेष स्क्रीनिंगला महिला व युवतींची तुफान गर्दी झालेली दिसून आली. सिनेमाच्या कथानकाबाबत देशभरातील राजकीय नेत्यांकडून उलट-सुलट प्रतिक्रिया ऐकायला मिळत असताना सिनेमा पाहून थिएटरबाहेर पडलेल्या महिलांनी मात्र सकारात्मक प्रतिक्रिया दिल्या.
'द केरळ स्टोरी' हा सिनेमा 5 मे 2023 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे. या सिनेमाचं कथानक हिंदू, ख्रिश्चन धर्मातील महिला व तरुण मुलींचे धर्मांतरण करुन त्यांच्यावर अत्याचार झाल्याच्या सत्य घटनेवर आधारित असल्याचा चित्रपट निर्मात्यांचा दावा आहे. वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या या सिनेमाचा कमाईवर मात्र सकारात्मक परिणाम दिसून आला आहे. तर काही ठिकाणी सिनेमाला स्क्रीन मिळत नसल्याची परिस्थिती आहे.
रविवारी धाराशिव येथील रामराज्य प्रतिष्ठानच्या वतीने महिलांसाठी 'द केरळ स्टोरी' या सिनेमाच्या दोन शोचे मोफत आयोजन श्री टॉकीजमध्ये केले होते. दोन्ही शोजला महिला व तरुण मुलींची तुफान गर्दी पाहायला मिळाली. सिनेमा पाहून थिएटरबाहेर पडलेल्या महिला व युवतींनी सिनेमाविषयी सकारात्मक प्रतिक्रिया देऊन प्रत्येक महिला व मुलीने हा सिनेमा पाहायला हवा, असे मत व्यक्त केले.
'या' कारणाने मोफत शोचे आयोजन
महिला भगिनींबाबत दुर्घटना घडू नये, देशात लव्ह जिहाद आणि धर्मांतरणासारख्या घटना घडत आहेत. त्याची जाणीव महिलांना होऊन यापुढील काळात अशा घटना घडू नयेत. त्यांच्यामध्ये यासंदर्भात जागृती व्हावी, या हेतूने धाराशिव येथील महिलांसाठी 'द केरळ स्टोरी' या सिनेमाचे दोन शो आयोजित केले होते. या मोफत शोला महिलांचा चांगलाच प्रतिसाद मिळाला.
महाराष्ट्रातील नेत्यांनी 'द केरळ स्टोरी'चे मोफत शो आयोजित केल्याने केदार शिंदे संतापले आहेत. त्यांनी ट्वीट करत आपला संताप व्यक्त केला आहे. त्यांनी लिहिलं आहे,"दुर्दैव...महाराष्ट्रात 'द केरळ स्टोरी' या सिनेमाचे खास शो आपले महाराष्ट्रातले नेते आयोजित करून लोकांना मोफत दाखवत आहेत. या महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने 'महाराष्ट्र शाहीर' प्रदर्शित झालाय. हे या नेत्यांना ठाऊक असेल का? शाहीर साबळे कोण? हे तरी माहिती असेल का?".
संबंधित बातम्या