(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sushant Singh Rajput Birth Anniversary : सुशांत सिंह राजपूत आजही चाहत्यांच्या मनात जिवंत; 'असा' होता अभिनेत्याचा सिनेप्रवास
Sushant Singh Rajput Birth Anniversary : सुशांत सिंह राजपूतचा आज जन्मदिन आहे. अभिनेता आज हयात नसला तरी चाहत्यांच्या मनात आजही तो जिवंत आहे.
Sushant Singh Rajput : दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) आज आपला 37 वा वाढदिवस साजरा करत आहे. अभिनेता हयात नसला तरी त्याच्या कलाकृतींच्या माध्यमातून तो आजही चाहत्यांच्या मनात जिवंत आहे. सुशांतचा मृत्यू प्रकरणावरुन मोठा गदारोळ उडाला. पण आजही त्याच्या मृत्यूचं गूढ कायम आहे.
'असा' होता सुशांत सिंह राजपूतचा सिनेप्रवास
छोटा पडदा गाजवल्यानंतर सुशांत रुपेरी पडद्याकडे वळाला. त्याचे अनेक सिनेमे सुपरहिट झाले आहेत. 'काई पो चे' या सिनेमाच्या माध्यमातून सुशांतने सिनेसृष्टीत पदार्पण केलं. त्याच्या पहिल्या सिनेमापासून ते शेवटच्या सिनेमापर्यंत एक गोष्ट कायम राहिली ती म्हणजे 'मृत्यू'. 'काय पो छे', 'एमएस धोनी : द अनटोल्ड स्टोरी', 'डिटेक्टिव ब्योमकेश बख्शी', 'सोनचिरैया', 'केदारनाथ', 'बेचारा दिल' अशा अनेक सिनेमांत सुशांत महत्त्वाच्या भूमिकेत होता.
मृत्यूने सुरुवात...मृत्यूनेच शेवट
सुशांतचा फिल्मी प्रवास ज्या पद्धतीने सुरू झाला त्याच पद्धतीने त्याचा शेवट झाला. 'काई पो चे' या सिनेमाच्या माध्यमातून सुशांतने सिनेसृष्टीत पदार्पण केलं. या सिनेमाच्या त्याचा मृत्यू झाल्याचे दाखवण्यात आले होते. तसेच त्याच्या मृत्यूनंतर त्याचा शेवटचा 'दिल बेचारा' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला. या सिनेमात त्याने 'इमेन्यूअल राजकुमार ज्युनियर'ची भूमिका साकारली होती. या सिनेमाच्या शेवटीही सुशांतचा मृत्यू झाल्याचे दाखवण्यात आले होते. त्यामुळे चाहत्यांना अश्रू अनावर झाले.
'पवित्र रिश्ता'च्या माध्यमातून घराघरांत पोहोचलेला सुशांत सिंह राजपूत
सुशांत सिंह राजपूत पृथ्वी थिएटरमध्ये काम करत होता. रंगभूमीवर काम करत असताना त्याने बालाजी टेलीफिल्म्समध्ये ऑडिशन द्यायला सुरुवात केली. त्यावेळी 'किस देश में है मेरा दिल' या मालिकेच्या माध्यमातून त्याला पहिला ब्रेक मिळाला. या मालिकेत त्याने प्रीत जुनेजाची भूमिका साकारली होती. त्यानंतर बालाजीच्याच 'पवित्र रिश्ता' या मालिकेचा तो भाग झाला. या मालिकेत त्याने मानव देशमुखची भूमिका वठवली होती. या मालिकेच्या माध्यमातून तो घराघरांत पोहोचला.
'काय पो छे' ते 'बेचारा दिल'
काय पो छे : चेतन भगतच्या 'द 3 मिस्टेक्स ऑफ माय लाईफ' या पुस्तकावर आधारित 'काय पो छे' हा सिनेमा आहे. या सिनेमात सुशांतने ईशान भट्टची भूमिका साकारली होती. या सिनेमाच्या माध्यमातून सुशांतने सिनेसृष्टीत पदार्पण केलं.
एमएस धोनी : द अनटोल्ड स्टोरी
'एमएस धोनी : द अनटोल्ड स्टोरी' हा सिनेमा 2016 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. भारतीय क्रिकेट महेंद्रसिंह धोनीच्या आयुष्यावर आधारित हा सिनेमा होता. या सिनेमात सुशांतने धोनीची भूमिका वठवली होती.
केदारनाथ
केदारनाथ या रोमँटिक, नाट्यमय सिनेमात सुशांतने मंसूर नामक पात्र साकारले होते. केदारनाथ हा सिनेमा चांगलाच गाजला होता. या सिनेमात सुशांत सारा अली खानसोबत स्क्रीन शेअर करताना दिसून आला.
बेचारा दिल
बेचारा दिल हा सुशांतचा शेवटचा सिनेमा ठरला. या सिनेमात सुशांत संजना सांघीसोबत स्क्रीन शेअर करत करताना दिसून आला. सुशांतच्या मृत्यूनंतर हा सिनेमा प्रदर्शित झाला होता.
संबंधित बातम्या