Sonali Phogat Murder Case: सोनाली फोगाट प्रकरणात सीसीटीव्ही फुटेज गायब करणारा व्यक्ती पोलिसांच्या ताब्यात, हत्येचं कोडं उलगडणार?
Sonali Phogat Murder Case: भाजप नेत्या आणि टिकटॉक स्टार सोनाली फोगाट (Sonali Phogat) हत्येप्रकरणी हरियाणा पोलिसांनी कॉम्पुटर ऑपरेटर शिवमला ताब्यात घेतले आहे.
Sonali Phogat Murder Case: भाजप नेत्या आणि टिकटॉक स्टार सोनाली फोगाट (Sonali Phogat) हत्येप्रकरणी हरियाणा पोलिसांनी कॉम्पुटर ऑपरेटर शिवमला ताब्यात घेतले आहे. सध्या त्याची चौकशी सुरू आहे. सोनालीच्या कुटुंबीयांनी शिवमवर फार्म हाऊसमधील कार्यालयातून लॅपटॉप, डीव्हीआर, कार्यालयातील मोबाईल फोन, 12 सीसीटीव्ही कॅमेरे आणि इतर कागदपत्रे चोरून नेल्याचा आरोप केला होता. आता पोलिसांनी शिवमला ताब्यात घेतल्याने त्याच्याकडून या प्रकरणाचे सीसीटीव्ही फुटेज मिळण्याची दाट शक्यता आहे. यातूनच या हत्या प्रकरणाचा उलगडा होऊ शकतो.
गेल्या आठवडाभरापासून पोलिसांनी शिवमच्या शोधात हरियाणा आणि दिल्लीत वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकले होते. आता शिवमला ताब्यात घेण्यात आले असून, पोलीस त्याची कसून चौकशी करत आहेत. तर, सोनाली फोगाट यांचा भाऊ आज हिसारच्या पोलीस ठाण्यात पोहोचला आहे, तेथून तो पोलिसांसह सोनालीच्या (Sonali Phogat) फार्म हाऊसवर जाणार आहे. पोलिसांचे पथक या फार्म हाऊसचा तपास करणार आहे.
शिवम पोलिसांच्या ताब्यात
सोनाली फोगाट यांचा पीए सुधीर सांगवान (Sudhir Sangwan) याने शिवम नावाच्या व्यक्तीला सोनाली फोगाट यांच्या फार्म हाऊसच्या कार्यालयात या हत्येच्या अवघ्या आठवडाभर आधी कॉम्पुटर ऑपरेटर म्हणून कामावर ठेवले होते. गोव्यातून सोनाली फोगाट यांच्या मृत्यूची बातमी हिसारला पोहोचताच शिवम फार्म हाऊसमधून सीसीटीव्हीचा डीव्हीआर, लॅपटॉप आणि सर्व आवश्यक कागदपत्रे घेऊन गायब झाला होता. सोनाली फोगाट यांच्या कुटुंबीयांनी शिवमवर संशय व्यक्त केला होता.
कुटुंबीयांकडून सीबीआय चौकशीची मागणी
सोनाली फोगाट यांची एकूण संपत्ती 100 कोटींची आहे. सोनालीच्या नातेवाईकांचे म्हणणे आहे की, सोनालीचे फार्म हाऊस आणि रिसॉर्ट 6 एकरवर बांधले आहे. सोनाली (Sonali Phogat) यांच्या हत्येनंतर त्यांच्या पीएचा या संपत्तीवर डोळा असल्याचे म्हटले जात आहे. सोनाली फोगाटच्या कुटुंबीयांनी या संपूर्ण प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली आहे. हरियाणाचे गृहमंत्री अनिल विज यांनीही सीबीआय तपासाबाबत पत्र लिहिले आहे. मात्र, गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी सध्या सीबीआय तपासास नकार दिला आहे.
'सोनाली फोगाट यांच्या हत्याप्रकणात आतापर्यंत पाच लोकांना ताब्यात घेण्यात आलं आहे. हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांकडून सीबीआय तपासणीची मागणी करण्यात आली आहे. गरज पडली तर सीबीआयकडे ही केस सोपवण्यात येईल', असे गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी म्हटले आहे.
सोनाली हत्येप्रकरणानंतर गोवा पोलीस अॅक्शन मोडवर
सोनाली फोगाट यांच्या हत्येनंतर गोवा पोलिसांनी ड्रग्ज सिंडिकेटविरोधात कारवाई सुरू केली आहे. गोवा पोलिसांनी कलंगुट आणि हरफडे सागरी परिसरात छापे टाकून 19 लाखांचे ड्रग्ज जप्त केले आहेत. यामध्ये उत्तर प्रदेशातील रहिवासी आणि दक्षिण आफ्रिकेतील ड्रग पेडलरला अटक करण्यात आली आहे.
वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या: