अजय देवगण, दीपिका पादुकोण, रणवीर सिंह, करिना कपूर सर्वांवर एकटा कार्तिक आर्यन पडला भारी; रुहबाबानं बॉक्स ऑफिसचं चक्रव्यूह भेदलं
Singham Again vs Bhool Bhulaiyaa 3: रोहित शेट्टीनं सिंघम अगेनद्वारे बॉक्स ऑफिसवर एक चक्रव्यूह निर्माण केलेलं. यावेळी सिंघम अगेनची लढाई थेट भूल भुलैया 3 सोबत होती. पण, कार्तिक आर्यन अभिनीत भूल भुलैया 3 हा चित्रपट सिंघम अगेनचं चक्रव्यूह भेदण्यात यशस्वी ठरला आहे.
Singham Again vs Bhool Bhulaiyaa 3: महाभरतासारख्या (Mahabharat) महाकाव्याबाबत आपल्या सर्वांनाच माहीत आहे. जसं, महाभारतात अभिमन्यूसाठी चक्रव्ह्यूह रचलं गेलं होतं. तसंच, काहीसं चित्र बॉक्स ऑफिसवरही पाहायला मिळत आहे. महाभारतात, अभिमन्यूला चक्रव्यूहात सात योद्ध्यांनी घेरलं आणि कपट करत मारलं. असंच काहीसं बॉक्स ऑफिसवर (Box Office) रंगलं होतं. दिवाळीच्या (Diwali) पार्श्वभूमीवर बॉक्स ऑफिसवर दोन बिग बजेट ब्लॉकबस्टर सिनेमे रिलीज करण्यात आले.
रोहित शेट्टी आणि अजय देवगण यांच्या सिंघम अगेननं तगड्या स्टारकास्टसह बॉक्स ऑफिसवर दणक्यात एन्ट्री घेतली. तर, त्यासोबतच कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) अभिनीत भूल भुल्लैया 3 (Bhool Bhulaiyaa 3) प्रेक्षकांच्या भेटीसाठी आला. रोहित शेट्टीनं कार्तिक आर्यनच्या 'भूल भुलैया 3'साठी चक्रव्यूह तयार करण्यात कोणतीही कसर सोडली नव्हती. 'भूल भुलैया 3'ला रोखण्यासाठी रोहितनं बॉलिवूडच्या मोठमोठ्या सेलिब्रिटींना पाचारण केलं आणि सिंघम अगेनमध्ये त्यांचे कॅमिओ घेतले. पण, काही फायदा झाला नाही. रुह बाबानं आपल्या जादूनं अख्खं बॉक्स ऑफिस आपल्या ताब्यात घेतलं, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. सिंघम अगेनची घौडदौड सुरूच आहे, पण तरीसुद्धा कार्तिकचा 'भूल भुलैया 3' वेगानं पुढे सरकत आहे, असं समोर आलेले आकडे सांगतात.
सिंघम अगेनमध्ये अजय देवगण, अक्षय कुमार, दीपिका पदुकोण, करीना कपूर खान, अर्जुन कपूर, टायगर श्रॉफ, रणवीर सिंग, जॅकी श्रॉफ आणि सलमान खान अशी तगडी स्टारकास्ट आहे. तर, 'भूल भुलैया 3'मध्ये कार्तिक आर्यन, विद्या बालन, माधुरी दीक्षित, तृप्ती डिमरी अशी तगडी स्टार कास्ट आहे.
भूल भुलैया 3 चा गल्ला किती?
भूल भुलैया 3 बद्दल बोलायचं झालं तर, 1 नोव्हेंबरला दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेला हा चित्रपट कार्तिकच्या करिअरमधील सर्वात मोठा ओपनर ठरला आहे. विशेष म्हणजे, रोहित शेट्टी दिग्दर्शित आणि अजय देवगण स्टारर सिंघम अगेन सोबत संघर्ष असूनही, कार्तिक आर्यनच्या हॉरर कॉमेडीनं 35.5 कोटी रुपयांच्या कमाईसह भारतात आपलं खातं उघडलं आणि दुसऱ्या दिवशी या चित्रपटानं 37 कोटी रुपयांचा व्यवसाय केला. SACNILC च्या सुरुवातीच्या ट्रेंड रिपोर्टनुसार, 'भूल भुलैया 3' ने रिलीजच्या तिसऱ्या दिवशी म्हणजेच, पहिल्या रविवारी 33.5 कोटी रुपये कमावले आणि यासोबतच चित्रपटानं तीन दिवसांत 106 कोटी रुपयांची कमाई केली.
बॉक्स ऑफिसवर कार्तिक आर्यन विरुद्ध 9 सुपरस्टार
मीडिया रिपोर्ट्सनुसार, सिंघम आगेनचं बजेट 340 कोटी रुपये आहे. तर चित्रपटानं तीन दिवसांत केवळ 120 कोटींची कमाई केली आहे. तर कार्तिक आर्यनच्या भूल भुलैया 3 चं बजेट जवळपास 150 कोटी रुपये आहे. या चित्रपटानं तीन दिवसांत अंदाजे 106 कोटींची कमाई केली आहे. त्यामुळे जर बॉक्स ऑफिस कलेक्शन आणि बजेट पाहिलं तर कार्तिकचा भूल भुलैया 3 सिंघम अगेनपेक्षा सरस ठरल्याचं बोललं जात आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
कार्तिक आर्यनची नवी गर्लफ्रेंड कोण? 'भूल भुलैया 3'च्या अभिनेत्याचा खुलासा, नावंही सांगितलं...