Pathaan : शाहरुखच्या 'पठाण'वर पाकिस्तानात बंदी; बेकायदेशीर पद्धतीने सिनेमाचं स्क्रिनिंग होत असल्याने सेन्सॉर बोर्डाचा निर्णय
Pathaan : पाकिस्तानमध्ये अनेक ठिकाणी शाहरुख खानचा 'पठाण' सिनेमा बेकायदेशीरपणे दाखवला जात होता.
Pathaan Illegal Screening In Pakistan : बॉलिवूड बादशाह अर्थात शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) जगभरात मोठा चाहतावर्ग आहे. त्याचे चाहते त्याच्या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत असतात. शाहरुखचा 'पठाण' (Pathaan) हा सिनेमा सध्या जगभरातील बॉक्स ऑफिसवर अधिराज्य गाजवत आहे. भारतासह परदेशात या सिनेमाचे खास शो आयोजित करण्यात येत आहेत. आता पाकिस्तानमध्ये (Pakistan) शाहरुखचा 'पठाण' हा सिनेमा बेकायदेशीरपद्धतीने दाखवला जात असल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे पाकिस्तानी कलाकारांवर भारतात बंदी घातल्यानंतर पाकिस्तानातही भारतीय सिनेमांच्या स्क्रिनिंगवर बंदी घालण्यात आली आहे.
नेमकं प्रकरण काय?
मीडिया रिपोर्टनुसार, 'पठाण' हा सिनेमा कराचीतील डिफेन्स हाऊसिंग अथॉरिटीमध्ये बेकायदेशीरपणे (Pathaan Illegal Screening In Pakistan) पद्धतीने दाखवण्यात येत होता. फायरवर्क इव्हेंट्स या कंपनीनेदेखील पाकिस्तानात अनेक ठिकाणी 'पठाण'चे स्क्रिनिंग आयोजित केले होते. पाकिस्तानमध्ये 900 रुपयांमध्ये या सिनेमाचे तिकीट विकले जात आहेत. आता याप्रकरणी सिंध बोर्ड ऑफ फिल्म्स सेन्सरने (SBFC) कारवाई केल्याने पाकिस्तानात या सिनेमाचे शो बंद करण्यात आले आहेत.
सिंध बोर्ड ऑफ फिल्म्स सेंसरच्या (SBFC) अहवालात म्हटले आहे की,"जोपर्यंत एखाद्या सिनेमाला सार्वजनिक प्रदर्शनासाठी बोर्डाकडून मान्यता मिळत नाही. तोपर्यंत कोणताही व्यक्ती सिनेमाच्या सार्वजनिक किंवा खाजगी प्रदर्शनासाठी सिनेमॅट्रोग्राफद्वारे निर्मिती करू शकत नाही. बोर्डाने मान्यता न दिलेले सिनेमे प्रदर्शित करणाऱ्यांना तीन वर्षांपर्यंतचा तुरुंगवास आणि पाकिस्तानी 1,00,000 रुपये (भारतीय चलनानुसार तीन लाख रुपये) दंड भरावा लागू शकतो".
As per some revelations, it is stated that latest Bollywood release #Pathaan is illegally being screened at DHA Karachi at PKR 900.
— Lollywood Pictures 🇵🇰 (@LollyPictures) February 2, 2023
Since 2019 there is complete ban on #BollywoodFilms release in Pakistan. #ShahrukhKhan #BollywoodMovies #LollywoodPictures #DeepikaPadukone pic.twitter.com/gOhSkw68JH
बेकायदेशीर पद्धतीने सिनेमा दाखवून चित्रपटगृहे हाऊसफुल्ल दाखवण्यात येत होती
सिंध बोर्ड ऑफ फिल्म सेन्सॉरने फायरवर्क इव्हेंट्सला 'पठाण'चे शो बंद करण्यास सांगितले आहे. बेकायदेशीर पद्धतीने 'पठाण'चे स्क्रिनिंग करुन सिनेमागृह हाऊसफुल्ल होत असल्याचे दाखवण्यात येत होते. त्यामुळेच सिंध बोर्ड ऑफ फिल्म सेन्सॉरने या सिनेमाच्या शोवर बंदी घातली आहे.
'पठाण' (Pathaan) हा सिनेमा सध्या धुमाकूळ घालत आहे. या सिनेमात शाहरुख खान (Shah Rukh Khan) मुख्य भूमिकेत असून दीपिका पादुकोण (Deepika Padukone), डिंपल कपाडिया (Dimple Kapadia), जॉन अब्राहम (John Abraham) आणि आशुतोष राणा (Ashutosh Rana) हे कलाकारदेखील महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. सिद्धार्थ आनंदने (Siddharth Anand) या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे.
संबंधित बातम्या