(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Aryan Khan Case : ड्रग केसमध्ये Shah Rukh Khan ला टार्गेट केलं जातंय का? आरोपांवर समीर वानखेडे म्हणाले...
Aryan Khan Case : शाहरुख खान (Shah Rukh Khan) चा मुलगा (Aryan Khan) ची अटक आणि त्याच्यावरील गुन्हा यावर NCB च्या समीर वानखेडेंनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे.
Aryan Khan Case : मुंबईतील क्रूझ पार्टीत शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला अटक झाल्यानंतर या घटनेनं आता वेगळं वळण घेतलं आहे. सोशल मीडियावरदेखील या घटनेबद्दल अनेक वादविवाद होताना दिसत आहेत. काही लोकांनी NCB वर शाहरुख खानवर निशाणा साधल्याचा आरोप केला आहे. एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडेंनी यांनी या प्रकरणावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे.
कोणालाही टार्गेट करत नाही: समीर वानखेडे
एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे म्हणाले, "आम्ही कोणालाच टार्गेट करत नाही आहोत. आमच्याकडे त्याच्या विरुद्ध एकही पुरावा नाही. मागील 10 महिन्यात आम्ही 300 पेक्षा अधिक लोकांवर अटक केली आहे. त्यातील चार-पाच नावाजलेले व्यक्ती आहेत. त्यामुळे आम्ही कुणावर निशाणा साधतोय असे तुम्ही बोलू शकत नाही. मागील एका वर्षात अटक केलेल्या व्यक्तींमध्ये प्रामुख्याने कट्टर नक्षलवादी लोकांचा समावेश आहे."
समीर वानखेडे पुढे म्हणाले, "एखादा लोकप्रिय व्यक्ती जेव्हा कायदा मोडतो तेव्हाच एनसीबीकडे सर्वांचं लक्ष जातं. वर्षभर एनसीबी ड्रग्स घेणाऱ्या तसेच ड्रग्ज पुरविणाऱ्या लोकांना अटक करत असते. एनसीबी हे आपलं कर्तव्य नेहमीच करत असते. एनसीबी आता ज्या इव्हेंट ऑर्गनायजर्स कंपन्या अशा प्रकारच्या पार्ट्यांचे आयोजन करतात त्या कंपन्यांची चौकशी करत आहेत."
आर्यन खानची सुटका झाली नाही
शनिवारी एनसीबीने मुंबईतून गोव्यात जाणाऱ्या क्रुझवर छापा टाकला होता. त्यात अनेकांना रंगेहाथ ड्रग्ज घेताना पकडण्यात आलं होतं. त्या पार्टीत बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानच्या मुलगा आर्यन खानदेखील सामिल होता. त्यामुळे आर्यन खानला अटक करण्यात आली. काल त्याला कोर्टात हजर करण्यात आलं असून 7 ऑक्टोबरपर्यंत एनसीबी कोठडीत राहावे लागणार आहे.
काय आहे प्रकरण?
मुंबईत क्रूझवर चाललेल्या ड्रग्ज पार्टीतून अटक केलेल्या अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याच्यासह अरबाज सेठ मर्चंट आणि मुनमुन धामेचा यांना 7 ऑक्टोबरपर्यंत NCB कोठडी सुनावण्यात आली. मुंबई किनाऱ्यावरील एका क्रूझवर एका पार्टीमध्ये केलेल्या छाप्याप्रकरणी त्यांना अटक करण्यात आली.
एनसीबीने शनिवारी रात्री क्रूझवर छापा टाकला आणि तेथून आठ जणांना ताब्यात घेतले. सर्व लोकांची सुमारे 16 तास सखोल चौकशी करण्यात आली आणि त्यातील तिघांना अटक करण्यात आली आहे. आरोपींच्या चौकशीदरम्यान, एनसीबीला माहिती मिळाली की त्यांना ज्याने ड्रग्ज दिले तो बेलापूर, नवी मुंबई येथे राहत होता. गुप्त माहितीच्या आधारे एनसीबीच्या पथकाने प्रादेशिक संचालक समीर वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी संध्याकाळी गोव्याला जाणाऱ्या कॉर्डेलिया क्रूझ जहाजावर छापा टाकला आणि पार्टी करणाऱ्या काही प्रवाशांकडून ड्रग्ज जप्त केली.