(Source: ECI/ABP News/ABP Majha)
लॉकडाऊन काळात सलमान खानचा मदतीचा हात; फिल्म इंडस्ट्रीतील 25 हजार मजुरांच्या बँक खात्यात जमा करणार रक्कम
सलमान खानने 25 हजार कामगारांच्या बँक खात्यात 1500 रुपये प्रत्येकी असे एकूण 3.75 कोटी रुपये देऊन मदत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईज (FWICE) चे सरचिटणीस अशोक दुबे यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
मुंबई : पहिल्या लॉकडाऊनच्या काळात बॉलिवूड अभिनेता सलमान खानने फिल्म इंडस्ट्रीशी संबंधित हजारो मजुरांना आर्थिक मदत केली होती. कोरोनाच्या दुसर्या आणि धोकादायक लाटेच्या पार्श्वभूमीवर सलमानने पुन्हा एकदा फिल्म इंडस्ट्रीतील मजुरांना 25 हजार रुपयांची मदत करण्याची घोषणा केली आहे.
सलमान खानने 25 हजार कामगारांच्या बँक खात्यात 1500 रुपये प्रत्येकी असे एकूण 3.75 कोटी रुपये देऊन मदत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईज (FWICE) चे सरचिटणीस अशोक दुबे यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. मागील वर्षी आम्ही फेडरेशनच्या वतीने सलमान खानला 26 हजार गरजू कामगारांची आधार कार्ड, पॅनकार्ड आणि बँकेचा तपशील पाठविला होता. त्याच्याकडे आधीपासून असलेल्या या नावांपैकी सलमान खानने एकूण 25 हजार लोकांना आर्थिक मदत देण्याची घोषणा केली आहे. यांत लाईटमॅन, स्पॉटबॉय, मेक-अप आर्टिस्ट, स्टंटमॅन, ज्युनियर आर्टिस्ट यांचा समावेश आहे.
पहिल्या लॉकडाऊनच्या काळात सलमानच्या 'बिइंग ह्यूमन फाउंडेशन' या संस्थेकडून जवळपास 2 लाख गरजवंतांना अन्नधान्य पुरवठा करण्यात आला होता. याशिवाय हजारो मजुरांना सलमान खाननं आर्थिक मदतही देऊ केली होती. फिल्म इंडस्ट्रीशी संबंधित 23 हजार लोकांना प्रत्येकी तीन हजार रुपयांची आर्थिक मदत केली होती. यानंतर सलमाननं दोन वेळा 1500-1500 रुपयांची आर्थिक मदत केली. अशाप्रकारे सलमानने गेल्या वर्षी इंडस्ट्रीशी संबंधित गरजू लोकांना 15 कोटींची आर्थिक मदत केली होती.
सलमान खानचा बहुप्रतीक्षित चित्रपट 'राधे' येत्या 13 मे ला रिलीज होणार आहे. करोना आणि लॉकडाऊनमुळे हा चित्रपट ओटीटी आणि थिएटर दोन्ही ठिकाणी रिलीज होणार आहे. झी एंटरटेनमेन्ट आणि सलमान खान फिल्मनं घोषणा केली आहे की, 'राधे' चित्रपटातून होणारी सर्व कमाई करोनाग्रस्तांच्या मदतीसाठी वापरली जाणार आहे.
लॉकडाऊन काळात सलमान अशी घेतोय पोलीस आणि फ्रंटलाईन वर्कर्सची काळजी
कोरोनाच्या पहिल्या लाटेमध्ये अभिनेता सलमान खान यानं अनेक गरजवंतांना मदतीला हात दिला. बिइंग ह्युमन या त्याच्या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून त्यानं अनेक भुकेलेल्यांना मदतही देऊ केली. आता हाच भाईजान सलमान यंदाच्या वर्षी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत पोलीस आणि फ्रंटलाईन वर्कर्सच्या मदतीला धावला असून, लॉकडाऊन काळातही कार्यरत असणाऱ्या कोविड योद्ध्यांसाठी सलमान पुन्हा एकदा मदतीला धावला आहे.
'Being Haangryy' या नावानं सलमानच्या स्वयंसेवी संस्खेचा एक फूड ट्रक सध्या कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी अहोरात्र मेहनत घेणाऱ्या फ्रंटलाईन वर्कर्सना खाण्याचे पदार्थ, चहा, पिण्याचं पाणी पुरवण्याची सेवा देत आहे. मुंबईत वांद्रे ते जुहू आणि वांद्रे ते वरळी या भागात सध्याच्या घडीला ही सेवा पुरवली जात आहे.
मुंबईत सध्याच्या घडीला जोपर्यंत लॉकडाऊन लागू असेल तोपर्यंत पोलीस आणि फ्रंटलाईन वर्कर्सना काहीशी उसंत देत त्यांच्यापर्यंत ही सेवा अविरतपणे पुरवली जाईल असं संस्थेतर्फे सांगण्यात येत आहे.
फ्रंटलाईन वर्कर्सना दिल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थांची चव चाखत सलमान खानने घेतला मदतकार्याचा आढावा