Sairat : नागराज मंजुळेंचा 'सैराट' आठ वर्षांचा झाला जी! रिंकूने शेअर केले आर्ची-परश्याचे तुम्ही कधीही न पाहिलेले फोटो
Sairat Movie : नागराज मंजुळे (Nagraj Manjule) दिग्दर्शित 'सैराट' या चित्रपटाला आठ वर्षे पूर्ण झाली आहे. रिलीजच्या आठ वर्षानंतरही या सिनेमाची क्रेझ चाहत्यांमध्ये कायम आहे. रिंकू राजगुरू (Rinku Rajguru) आणि आकाश ठोसर (Akash Thosar) या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहेत.
Sairat : नागराज मंजुळे (Nagraj Manjule) दिग्दर्शित 'सैराट' (Sairat) हा चित्रपट आठ वर्षांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला. आज या सिनेमाच्या रिलीजला आठ वर्षे झाली आहेत. रिंकू राजगुरू (Rinku Rajguru) आणि आकाश ठोसर (Akash Thosar) या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहेत. आठ वर्षानंतर आजही चाहत्यांमध्ये या चित्रपटाची क्रेझ कायम आहे. आज या सिनेमाच्या रिलीजला आठ वर्षे पूर्ण झाली असून महाराष्ट्राच्या लाडक्या आर्चीने काही अनसीन फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. हे फोटो चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहेत. या फोटोंवर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. 'सैराट 2'ची चाहत्यांना आता उत्सुकता आहे.
मराठी मनोरंजनसृष्टीला सुगीचे दिवस दाखवणारा 'सैराट'
'सैराट' या चित्रपटाने मराठी मनोरंजनसृष्टीला सुगीचे दिवस दाखवले आहेत. सिनेमा पाहण्यासाठी प्रेक्षक पहाटे 4 वाजल्यापासून तिकीट रांगेत उभे राहत असे. थिएटरला पोलीस बंदोबस्त होता. सिनेमागृहात एखाद्या जत्रेपेक्षा जास्त दंगा पाहायला मिळाला. गावाकडची मंडळी ट्रॅक्टरवर बसून थिएटरला जाताना दिसून आली. 'सैराट' चित्रपटाने संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावलं. आर्ची-परश्याची जोडी चाहत्यांच्या पसंतीस उतरली. या सगळ्या गोष्टीला आज 8 वर्षे पूर्ण होत आहेत.
View this post on Instagram
'सैराट' चित्रपटाने अनेक समीकरण बददली. विचार दिला. चर्चा घडवून आणली. एकूणच रंग, जात, राजकारण, भाषा, संगीत ग्रामीणव्यवस्था आणि स्त्रीवाद अशा अंगाने बरीच चर्चा राज्यभर झाली. 'सैराट' नंतरच ग्रामीण प्रादेशिक भाषा मराठी डेलीसोप मध्ये आली. आणि रूढ झाली. कणखर नायिका सुद्धा सेट करून दिली. पण आता आठ वर्षानंतरही या चित्रपटाची मोठ्या प्रमाणात चर्चा होते. आता चाहत्यांना या बहुचर्चित चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची प्रतीक्षा आहे. 29 एप्रिल 2016 रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. 'सैराट'चं यश हे त्याच्या 'थेट'पणामुळे आहे. सिनेमा थेट प्रेक्षकांच्या काळजाला हात घालतो.
म्हणून 'सैराट'चं कौतुक...
कोणतीही कलाकृती आपलीच कहाणी सांगते, तेव्हा ती फार काळ स्मरणात राहते आणि जेव्हा विचार करायला भाग पाडते तेव्हा ती अमर होते. आपल्या जाणिवांना वळण दिलं कयामत से कयामत तक, रंगीला, रोजा, एक दूजे के लिये, दिलवाले दुल्हनिया, मैने प्यार किया वगैरे अनेक सिनेमांनी.पण सैराट याहून फार पुढचं काहीतरी देतो.
'सैराट' हा एक सिनेमा नाही. ते एकाच पॅकेज मध्ये दिलेले दोन सिनेमे आहेत. पहिला भाग हा टिपिकल बॉलीवूडपट, तर दुसरा अस्सल नागराज टच असलेला भाग. पहिला टिपिकल बॉलीवूडपट असला तरी ते पूर्ण सत्य नाही. बॉलीवूड छाप चित्रपटात असणाऱ्या सर्व गोष्टी आपल्यासमोर परफेक्ट स्टोरीटेलिंग करताना जरी मांडलेल्या असल्या तरी त्यात महत्त्वाचा बदल होता तो नरेटिव्ह्ज बदलल्याचा. यात नायक आहे, नायिका आहे, कॉलेज आहे. श्रीमंती आहे, संरजामी आहेत. जातवास्तव आहे. सगळं गुडीगुडी आहे.
सैराटवर खुप काही लिहीलं गेलंय, बोललं गेलंय... सैराटच्या अंगाने स्त्रीवाद, जातीयवाद, पितृसत्ता, संविधान अनेक विषयांचे नरेटिव्ह्ज बदलणारे लिखाण झाले आहे. पण यात महत्त्वाचा मुद्दा हा की या सैराट नावाच्या जहाल कवितेच्या दिग्दर्शकाच्या धाडसाशिवाय हे शक्य नव्हतं.
संबंधित बातम्या