Saif Ali Khan : सैफच्या पाठीत खुपसलेल्या चाकूचा उरलेला तुकडा पोलिसांच्या हाती, मुंबई पोलिसांचं एक पथक कोलकाताला रवाना
Saif Ali Khan Health Update : अभिनेता सैफ अली खान प्रकरणात पोलिसांकडून कसून तपास सुरु असून नवनवीन माहिती समोर येत आहे.
Saif Ali Khan Knife Attack : अभिनेता सैफ अली खान हल्ला प्रकरणात मुंबई पोलिसांकडून कसून तपास सुरु आहे. यासाठी मुंबई पोलिसांचं एक पथक कोलकाताला गेल्याची माहिती आहे. आरोपी मोहम्मद शहजाद याने बांगलादेशातून भारतात अवैधरित्या प्रवेश केल्यानंतर तो काही दिवस कोलकाता येथे वास्तव्यास होता. कोलकातामध्ये त्याने बनावट कागदपत्रांच्या आधारे सिमकार्ड विकत घेतल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या पार्श्वभूमीवर अधिक तपास करण्यासाठी मुंबई पोलिसांचं पथक कोलकाताला गेलं आहे.
मुंबई पोलिसांचं पथक कोलकाताला रवाना
अभिनेता सैफ अली खान प्रकरणात अन्य काही आरोपीचे पुरावे पोलिसांच्या हाती लागले आहेत. या प्रकरणाच्या तपासाच्या अनुषंगाने मुंबई पोलिसांचे एक पथक कोलकताला गेल्याची सूत्रांची महिती समोर आली आहे. आरोपी मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजादने बांगलादेशातून भारतात मेघालयात प्रवेश केल्यानंतर त्याने एका दलालाला दहा हजार रुपये दिले होते. त्या दलालाने मोहम्मदला आसामपर्यंत आणले आणि एक सिमकार्ड देखील पुरवले. ते सिमकार्ड खुकूमोनी जहांगीर शेख याच्या नावाने वापरत होता. आसाममधील दलालाने मोहम्मदला कोलकाताला जाण्यासाठी बसमध्ये बसवून दिले होते. कोलकात्यात तीन दिवस राहिल्यानंतर तो रेल्वेने मुंबईला पोहोचला.
सैफ हल्ला प्रकरणात आणखी पुरावे पोलिसांच्या हाती
सैफच्या घरी चोरी करताना आरोपीने घातलेले बुट, कपडे उर्वरित चाकूचा तुकडा, हे पुरावे पोलिसांच्या हाती आले आहेत. आरोपीच्या कपड्यांवर रक्ताचे डाग असून ते न्यायवैद्याक चाचणीसाठी पाठवण्यात आले आहेत. त्यासाठी पोलिसांनी सैफ अली खानच्या रक्ताचे पुरावे गोळा केले आहेत. सैफचं ब्लड सँपल आणि आरोपीच्या कपड्यावर रक्ताचे डाग यांची तपासणी करण्यात येणार आहे. हे ब्लड सँप एकमेकांशी जुळणे, हा पोलिसांसाठी मोठा पुरावा ठरेल. अभिनेता सैफ अली खान प्रकरणात पोलिसांकडून कसून तपास सुरु असून नवनवीन माहिती समोर येत आहे.
पोलिसांनी सैफचा जबाब नोंदवला
बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर 16 जानेवारी रोजी त्याच्या घरात चाकूने हल्ला करण्यात आला. जखमी सैफला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आलं. तिथे त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आणि 21 जानेवारीला त्याला डिस्चार्ज मिळाला. लिलावती रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर पोलिसांनी सैफचा जबाब नोंदवला आहे. तसेच, त्याच्या वैद्यकीय अहवालात अनेक खुलासे झाले आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :