सैफ अली खानला रिक्षात टाकून नेणाऱ्या भजन सिंहच्या उपकाराची परतफेड, पटौदी कुटुंबाने दिले तब्बल 51000 रुपये!
Saif Ali Khan Attack : अभिनेता सैफ अली खानवर हल्ला झाला होता. त्यानंतर त्याला रिक्षात टाकून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
Saif Ali Khan Attacked: अभिनेता सैफ अली खानवर (Saif Ali Khan) 15 जानेवारीच्या रात्री त्याच्या राहत्या घरात चाकूहल्ला झाला होता. या हल्ल्यानंतर त्याला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याला पुढचे काही दिवस विश्रांती घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. दरम्यान, हल्ला झाला त्या रात्री सैफ अली खानला रुग्णालयात घेऊन जाण्याऱ्या रिक्षावाल्याला केलेल्या मदतीची परतफेड म्हणून सैफ अली खाननं पुरस्कृत केलं आहे. या रिक्षाचालकाला सैफ अली खान तसेच त्याच्या कुटुंबीयांनी तब्बल 51 हजार रुपये दिले आहेत.
भर रात्री रिक्षाचालकाने धाडस दाखवलं
सैफ अली खानवर हल्ला झाला तेव्हा त्याच्या पाठीत चाकूचा तुकडा रुतला होता. त्याला तशाच अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रात्री उशिरा हा हल्ला झाल्यामुळे त्याल गडबडीत रिक्षाने रुग्णालयात नेण्यात आले होते. घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन भजन सिंह राणा या ऑटो चालकानेही तत्काळ रिक्षा चालून करून सैफ अली खानला रुग्णालयात नेले होते. त्यानंतर या रिक्षा चालकाची सगळीकडे वाहवा झाली होती. त्याने दाखवलेल्या तत्परतेला सर्वांनीच सलाम ठोकला होता.
भजन सिंह राणाला 51 हजार रुपयांचं बक्षीस
विशेष म्हणजे सैफ अली खानला जेव्हा रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला तेव्हा खुद्द सैफने रिक्षाचालक भजन सिंह राणा यांची भेट घेतली होती. सैफने राणा यांच्या बाजूला बसून खांद्यावर हात टाकत त्याच्याशी गप्पा केल्या होत्या. त्यांच्या संवादादरम्यानचे काही फोटो सोशल मीडियावर नंतर व्हायरल झाले होते. आता याच रिक्षाचालकाला सैफ अली खानच्या कुटुंबीयांनी पुरस्कृत केले आहे. भजन सिंह राणा यांना सैफच्या कुटुंबाने तब्बल 51 हजार रुपये बक्षीस म्हणून दिले आहेत. सोबतच सैफ अली खान याच्यासह त्याची आई शर्मिला टागौर यांनीदेखील भजन सिंह राणा यांचे आभार मानले आहेत.
रोनित रॉयची कंपनी पुरवणार सुरक्षा
दुसरीकडे सैफवर हल्ला करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. तो सध्या कोठडीत असून त्याची कसून चौकशी केली जात आहे. हा आरोपी मुळचा बांगलादेशचा रहिवासी असल्याचे म्हटले जात आहे. तो भारतात अवैधरित्या घुसला होता. मुंबई पोलिसांनी सैफ अली खानच्या घरी जाऊन सर्व पाहणी केली आहे. त्याच्या घरात आरोपीच्या हातांचे ठसे सापडले आहेत. तर सैफ अली खानच्या सुरक्षेत सध्या वाढ करण्यात आली आहे. अभिनेता रोनित रॉय याची ACE Security and Protection नावाची सुरक्षा एजन्सी सैफ तसेच त्याच्या कुटुंबीयांना सुरक्षा पुरवणार आहे. रोनित रॉयची ही कंपनी बॉलिवुडमधील अनेक दिग्गजांना सुरक्षा पुरवते.
हेही वाचा :
बहिणीचा नवरा घरी येताच करिष्माचा आनंद गगनात मावेना, सैफला सुखरुप पाहून केली खास पोस्ट!
बिग बॉसमधील हिरोईनला मुंबईत घर मिळेना, घरमालकांच्या 'त्या' प्रश्नामुळे चांगलीच भडकली!