Sagar Karande : विनोदवीर सागर कारंडेचा 'चला हवा येऊ द्या'ला रामराम; पोस्टमन काकांची जागा घेतली 'या' कलाकाराने
Sagar Karande : 'चला हवा येऊ द्या' या लोकप्रिय कार्यक्रमातून विनोदवीर सागर कारंडेने एक्झिट घेतली असून श्रेया बुगडेने त्याची पोस्टमन काकांची जागा घेतली आहे.
Sagar Karande Chala Hawa Yeu Dya : 'चला हवा येऊ द्या' (Chala Hawa Yeu Dya) या कार्यक्रमाच्या माध्यमातून सागर कारंडे (Sagar Karande) हे नाव घराघरांत पोहोचलं आहे. आजवर या कार्यक्रमाच्या माध्यमातून सागरने प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन केलं आहे. पण आता सागरने 'चला हवा येऊ द्या' या बहुचर्चित कार्यक्रमाला रामराम केल्याची बातमी समोर आली आहे.
'चला हवा येऊ द्या'च्या माध्यमातून सागरने कधी प्रेक्षकांना खळखळून हसवलं आहे. तर कधी पोस्टमन काका बनून रडवलं आहे. अरविंद जगताप यांनी लिहिलेली पत्रे सागर कारंडेने आपल्या भावनिक शैलीत सादर केले आहेत. त्यामुळे हास्याच्या मंचावर प्रेक्षकांच्या डोळ्यात पाणी आणण्याचं काम सागरने केलं आहे. एकाचवेळी प्रेक्षकांच्या डोळ्यात पाणी आणि चेहऱ्यावर हसू आणण्याचं काम सागरला अचूक जमलं आहे.
'त्या' व्हिडीओमुळे चर्चांना उधाण
झी मराठीने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये पोस्टमन काकांची जागा श्रेया बुगडेने (Shreya Bugde) घेतलेली दिसत आहे. एकदा किचनमध्ये बायकोसोबत उभं तर राहून बघा, असं म्हणत झी मराठीने हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये पत्राच्या रुपात कविता वाचताना श्रेया दिसत आहे. श्रेयाने खास पोस्टमनचा लुकदेखील केला आहे.
View this post on Instagram
सागरचे चाहते नाराज
पोस्टमन काकांची जागा श्रेया बुगडेने घेतल्याने सागरचे चाहते मात्र नाराज झाले आहेत. झी मराठीच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी विविध प्रश्न विचारायला सुरुवात केली आहे. सागर कारंडे वाचत असलेलं पत्र मनाला भिडायचं, कुठे आहेस सागर कारंडे?, सागर कारंडेने चला हवा येऊ द्या का सोडलं?, श्रेया तुझ्या आवाजात सागरसारखा गंभीरपणा नाही, अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहे. श्रेया बुगडे एक उत्तम अभिनेत्री असली तरी मनाला भिडणारं पत्र वाचण्यात ती कुठेतरी कमी पडली आहे. 'चला हवा येऊ द्या'सोबत 'इंडियाज लाफ्टर चॅम्पियन' या कार्यक्रमातदेखील सागरने काम केलं. त्यानंतर त्याने 'चला हवा येऊ द्या'मधून एक्झिट घेतली. पण तरीही काही भागांत तो दिसून आला. आता त्याने पूर्णपणे हा कार्यक्रम सोडला असून त्याची जागा श्रेया बुगडेने घेतली असल्याचे म्हटले जात आहे. पण मिळालेल्या माहितीनुसार, 'चला हवा येऊ द्या'मधील सर्वच विनोदवीर 'पत्र वाचन' हा सेगमेंट करणार आहेत.
सागर कारंडेबद्दल जाणून घ्या...
सागर कारंडे एक उत्कृष्ट अभिनेता आणि लेखक आहे. 'फू बाई फू' या कार्यक्रमाच्या माध्यमातून तो घराघरांत पोहोचला. त्याची आणि भारत गणेशपुरेची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. त्यानंतर 'चला हवा येऊ द्या'च्या माध्यमातून त्याने वेगवेगळ्या विनोदी भूमिका सादर करत प्रेक्षकांचं मन जिंकलं. त्यांचं हृदयस्पर्शी पत्रवाचन प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं. सागरने छोटा पडदा गाजवण्यासोबत रुपेरी पडद्यावरदेखील काम केलं आहे. जलसा, फक्त लढ म्हणा. बायोस्कोप, माय हिंदू फ्रेंड आणि एक तारा या सिनेमांत सागर महत्त्वाच्या भूमिकेत दिसला आहे.
संबंधित बातम्या