(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Rutuja Bagwe : "आता जबाबदारी आणखी वाढली"; संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार जाहीर होताच ऋतुजा बागवेची प्रतिक्रिया
Rutuja Bagwe : युवा रंगकर्मी ऋतुजा बागवेला संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार जाहीर झाला आहे. अभिनेत्रीवर सर्वत्र शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
Rutuja Bagwe : युवा रंगकर्मी ऋतुजा बागवेला (Rutuja Bagwe) अभिनयासाठी संगीत नाटक अकादमीचा (Sangeet Natak Academy) पुरस्कार जाहीर झाला आहे. अभिनयासाठी तिला हा पुरस्कार जाहीर झाला असून सर्वत्र तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. पुरस्कार जाहीर झाल्यानंतर आता जबाबदारी आणखी वाढली असल्याची प्रतिक्रिया अभिनेत्रीने दिली आहे.
संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार जाहीर झाल्यानंतर एबीपी माझासोबत बोलताना ऋतुजा बागवे म्हणाली,"संगीत नाटक अकादमी'चा पुरस्कार जाहीर झाल्याचा आनंद आहे. एकांकिकांपासून सुरू झालेला हा प्रवास थक्क करणारा आहे. संगीत नाटक अकादमीचा मानाचा पुरस्कार आपल्याला जाहीर झालाय यावर सुरुवातीला विश्वास बसत नव्हता. पण नंतर शुभेच्छांचा वर्षाव व्हायरला सुरुवात झाली".
आता जबाबदारी आणखी वाढली : ऋतुजा बागवे
ऋतुजा म्हणते,"संगीत नाटक अकादमी'चा पुरस्कार जाहीर झाल्याने कृतज्ञनेची भावना जास्त आहे. करिअरच्या सुरुवातीला हा मानाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यामुळे आणखी जबाबदारी वाढली आहे. पुढे कोणतही काम करताना या जबाबदारीनेच मी करेल".
ऋतुजा बागवेला 'अनन्या'ने काय दिलं?
ऋतुजा बागवे अभिनीत 'अनन्या' हे नाटक चांगलच गाजलं. या भूमिकेसाठी तिने खूप मेहनत घेतली होती. त्याबद्दल बोलताना ऋतुजा म्हणाली,"अनन्याने मला खूप काही दिलं आहे. अभिनेत्री म्हणून आदर मिळवून देण्यापासून ते ओळख मिळवून देण्यापर्यंत अनेक गोष्टी अनन्याने दिल्या आहेत. आजही लोक अनन्या म्हणून मला ओळखतात. यापुढे अनेक चॅलेजिंग भूमिका साकारण्याची माझी इच्छा आहे. सध्या माझा कोणताही ड्रीम रोल नाही. खूप वैविध्यपूर्ण भूमिका मला करायच्या आहेत".
महाराष्ट्र भूषण ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ (Ashok Saraf) यांना संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार जाहीर झाला आहे. तसेच युवा रंगकर्मी ऋतुजा बागवे, ढोलकीवादक विजय चव्हाण, शास्त्रीय गायिका कलापिनी कोमकली, नंदिनी गुजर, सिद्धी उपाध्ये, महेश सातारकर, प्रमिला सूर्यवंशी, अनुजा झोकरकर, सारंग कुलकर्णी, नागेश आडगावकर आणि प्रियंका ठाकूर यांनाही हा मानाचा पुरस्कार जाहीर झाला आहे.
ऋतुजा बागवेने नाट्यक्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीसाठी तिला संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे. 25 हजार रुपये, ताम्रपत्र आणि शाल असं या पुरस्काराचं स्वरूप असणार आहे. सन्माननीय राष्ट्रपतींच्या उपस्थितीत हा पुरस्कार सोहळा पार पडेल.
संबंधित बातम्या