Ashok Saraf : अशोक सराफ यांचा मोठा बहुमान, संगीत नाटक अकादमी पुरस्कार जाहीर; अभिनेत्री ऋतुजा बागवे, ढोलकीवादक विजय चव्हाण यांचाही सन्मान
Ashok Saraf : संगीत नाटक अकादमीतर्फे नृत्य, नाट्य आणि संगीत क्षेत्रात अमूल्य योगदान देणाऱ्या कलाकारांचा गौरव करण्यात येतो. ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांनादेखील हा पुरस्कार जाहीर करण्यात आला.
Ashok Saraf : संगीत, नृत्य, नाट्य क्षेत्रांत अमूल्य योगदान दिल्याबद्दल संगीत नाटक अकादमीतर्फे (Sangeet Natak Academy) दिल्या जाणाऱ्या फेलोशिप आणि पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ (Ashok Saraf) आणि विख्यात शास्त्रीय गायिका कलापिनी कोमकली (Kalapini Komkali) यांना संगीत नाटक अकादमीच्यावतीने पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
केंद्र शासनाच्या सांस्कृतिक मंत्रालयांतर्गत कार्यरत संगीत नाटक अकादमी दरवर्षी संगीत, नृत्य, नाट्य आणि लोककला क्षेत्रामध्ये मोलाचे योगदान देणाऱ्या कलाकारांना सन्मानित केले जाते. संगीत नाटक अकादमीतर्फे नृत्य, नाट्य आणि संगीत क्षेत्रात अमूल्य योगदान देणाऱ्या कलाकारांचा गौरव करण्यात येतो. मंगळवारी रात्री उशिरा पुरस्कार विजेत्यांची यादी जाहीर करण्यात आली. यामध्ये महाराष्ट्रातील कलाकारांचा समावेश आहे.
>> संगीत नाटक अकादमी पुरस्कार विजेत्यांची यादी
- अशोक सराफ, अभिनय
- विजय शामराव चव्हाण, ढोलकीवादक
- कलापिनी कोमकली, हिंदुस्तानी शास्त्रीय सगीत
- नंदिनी परब गुजर, सुगम संगीत
- सिद्धी उपाध्ये, अभिनय
- महेश सातारकर, लोकनृत्य
- प्रमिला सूर्यवंशी, लावणी
- अनुजा झोकरकर, हिंदुस्तानी शास्त्रीय गायक
- सारंग कुलकर्णी, सरोद वादक
- नागेश आडगावकर, अभंग संगीत
- ऋतुजा बागवे, अभिनय
- प्रियांका शक्ती ठाकूर, पारंपारिक कला
संगीत नाटक अकादमी पुरस्कार हा पुरस्कार संगीत नाटक अकादमी या कलाक्षेत्रातील सरकारी संस्थेतर्फे देण्यात येणारा पुरस्कार आहे. विविध कलाक्षेत्रातील कलावंतांना देण्यात येणारा हा एक सर्वोच्च भारतीय सन्मान आहे. संगीत, नृत्य अभिनय इतर पारंपरिक समूह नृत्य, आदिवासी नृत्य, संगीत, अभिनय आणि कठपुतळी यांतील योगदानांबद्दल हे पुरस्कार प्रदान केले जातात.
शास्त्रीय गायिका कलापिनी कोमकली यांचा सन्मान
विख्यात शास्त्रीय गायिका कलापिनी कोमकली (Kalapini Komkali) यांना संगीत नाटक पुरस्कार जाहीर झाला. तसेच प्रसिद्ध सतार वादक नीलाद्री कुमार यांनाही संगीत नाटक पुरस्कार जाहीर झाला आहे. संगीत नाटक अकादमीच्या वतीने 2023 या वर्षासाठी संगीत, नाटक, नृत्य क्षेत्रातील पुरस्कारांची घोषणा केली आहे. एक लाख रुपये आणि ताम्रपत्र असं या पुरस्काराचं स्वरुप आहे.
कलापिनी कोमकली या हिंदुस्तानी शास्त्रीय संगीतातील अलौकिक स्वरतपस्वी पंडित कुमार गंधर्व यांची कन्या आहेत. आपल्याकडे असलेला सुरांचा अलौकिक ठेवा जपतानाच शास्त्रीय संगीतात त्यांनी स्वत:ची गायनशैली घडवली आहे.