रियाचा भायखळा जेलमधील मुक्काम वाढला, पुन्हा 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
मानसिक संतुलन, सुरक्षितता आणि कोरोनाची पार्श्वभूमी पाहता रियाला जामीन मिळावा, अशी मागणी कोर्टाकडे करण्यात आली आहे.
मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी रिया चक्रवर्तीसह एकूण सहा जणांना मुंबई सत्र न्यायालयानं न्यायालयीन कोठडी वाढवून दिली आहे. 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी संपत असल्यानं त्यांना कोर्टापुढे हजर करण्यात आलं. तेव्हा रिया चक्रवर्ती, तिचा भाऊ शौविक चक्रवर्ती, सुशांतचा मैनेजर सॅम्युअल मिरांडा, सुशांतचा नोकर दिपेश सावंत आणि ड्रग्ज पेडलर झैद विलात्रा आणि बासित परिहार यांना 6 ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. दरम्यान मंगळवारी रिया आणि शौविक चक्रवर्ती यांनी जामीनासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. लवकरच यावर सुनावणी होणार आहे. याप्रकरणात दिपेश सावंत, सॅम्युअल मिरांडाच्या याचिकेवर 29 सप्टेंबर रोजी न्यायमूर्ती सारंग कोतवाल यांच्यापुढे सुनावणी होणार आहे.
एनडीपीएस कलमाखाली या सर्वांवर विविध आरोप लावण्यात आले आहेत. रिया चक्रवर्तीची रिमांड जरी एनसीबीनं मागितली नसली तरी, 'आमचा तपास अजून संपलेला नाही' असं एनसीबीच्यावतीनं कोर्टात सांगण्यात आलं. तसेच रिया आणि तिचा भाऊ शौविक यांच्यावर ड्रग्जचा व्यवसाय केल्याचा गंभीर आरोप लावण्यात आला आहे. तसेच इतरांचा या संपूर्ण प्रकरणात सक्रिय सहभाग आहे. त्यामुळे या कलमांअंतर्गत कोर्टानं त्यांना जामीन देऊ नये असा दावा एनसीबीच्यावतीनं विशेष सरकारी वकील अतुल सरपांडे यांनी कोर्टात केला.
28 ऑगस्टला तपासासाठी मुंबईत आलेल्या अमली पदार्थविरोधी पथक(एनसीबी)च्या विशेष पथकाने शोविक, मिरांडा आणि दीपेशसह आठ आरोपींना अटक करून अंमली पदार्थ, रोकड आणि परकीय चलन जप्त केले होते. अखेर याप्रकरणात मंगळवारी एनसीबीकडून ड्रग्ज सेवन आणि इतर आरोपांखाली रियालाही अटक करण्यात आली. त्यानंतर न्यायालयानं रियाला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावत तिचा जामीन अर्जही फेटाळून लावला. त्याविरोधात रियाच्यावतीने अॅड. सतीश मानेशिंदे यांनी मुंबई सत्र न्यायालयात जामीनासाठी अर्ज दाखल केलाला अर्जही कोर्टानं फेटाळून लावला. आपण निर्दोष असून आपण कोणत्याही प्रकारचा गुन्हा केलेला नाही. यात आपल्याला गुंतवण्यात आले असून तपासयंत्रणेकडून गुन्हा कबूल करण्यास भाग पाडण्यात आल्याचंही या याचिकेतून नमूद करण्यात आलं होतं. रियाने ड्रग्सचे सेवन केले असले तरीही तिने ड्रग्स रॅकेटला आर्थिक मदत केल्याचे कोणतेही पुरावे नाहीत. ड्रग्स सेवन हा जामीन पात्र गुन्हा आहे. असा दावा या याचिकेतून करण्यात आला होता. त्याचबरोबर मागील काही दिवसांपासून रियाला लैंगिक अत्याचाराच्या तसेच जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. त्यामुळे तिला जर कोठडी मिळाली तर तिच्या जीवाला धोका संभवू शकतो असं या याचिकेतून म्हटले आहे. त्यामुळे तिचे मानसिक संतुलन, सुरक्षितता आणि कोरोनाची पार्श्वभूमी पाहता रियाला जामीन मिळावा, अशी मागणी कोर्टाकडे करण्यात आली आहे.