(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Shantaram Nandgaonkar : कविवर्य शांताराम नांदगावकरांचा 12 वा स्मृतीदिन सोहळा भावपूर्ण वातावरणात संपन्न
Shantaram Nandgaonkar : कविवर्य शांताराम नांदगावकरांचा 12 वा स्मृतीदिन सोहळा भावपूर्ण वातावरणात संपन्न झाला आहे.
Shantaram Nandgaonkar : शब्दांचा राजा आणि एक अजातशत्रू म्हणजेच डॅडी कविवर्य शांताराम नांदगावकर (Shantaram Nandgaonkar) यांचा 12 वा स्मृतीदिन सोहळा नुकताच भावपूर्ण वातावरणात संपन्न झाला. शांताराम नांदगावकर फाउंडेशनतर्फे मिरा रोड येथे त्यांच्या निवासस्थानी कुटुंबिय आणि मित्र परिवाराच्या उपस्थितीत या सोहळा पार पडला.
डॅडी उर्फ कविवर्य शांताराम नांदगावकर यांनी महाराष्ट्राच्या तमाम रसिकांना आपलंस केलं आहे. डॅडींचे चाहते त्यांना कधीच विसरू शकत नाहीत. डॅडींनी निर्माण केलेलं मराठमोळं साहित्य, काव्य, गाणी ही सतत रसिकांच्या कानात रुंजी घालत राहतात. अशा शब्दांचा राजा, एक अजातशत्रू कविवर्य शांताराम नांदगावकर यांचा 12 वा स्मृतीदिन सोहळा मिरा रोड मधील नांदगावकर यांच्या निवास्थानी, शांताराम नांदगावकर फाउंडेशन तर्फे साजरा करण्यात आला.
स्मृतीदिन सोहळ्यात शांताराम नांदगावकर यांचे चाहते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. कुटुंबिय आणि मित्र परिवारासह मिरा भाईंदरच्या महापौर ज्योत्स्ना हसनाळे तसेच आयुक्त दिलीप ढोले, उपायुक्त रवी पवार, दलित पॅंथरचे राष्ट्रीय अध्यक्ष सुरेश केदारे तसेच स्थानिक नगरसेविका इत्यादी मान्यवरांनी हजेरी लावली होती.
डॅडींच्या जुन्या आठवणीना उजाळा देत वाहिली श्रद्धांजली
कार्यक्रमादरम्यान कवी नांदगावकर यांची सुन सुहासनी नांदगावकर यांनी डॅडींच्या जुन्या आठवणीना उजाळा दिला. तर मुलगा प्रशांत नांदगावकर यांनीदेखील डॅडींच्या जुन्या कवितांना उजाळा दिला. त्याचबरोबर नांदगावकरांचे नातेवाईक हेमंत निकम आणि मित्र परेश पेवेकर यांनीदेखील नांदगावकरांची गीते सादर करुन शब्दपुष्पांजली वाहिली. दरम्यान उपस्थितांनी शांताराम नांदगावकरांना श्रद्धांजली वाहिली.
शांताराम नांदगावकर हे मराठी, गीतकार आणि कवी होते. त्यांनी अनेक भावगीते आणि मराठी सिनेमांसाठी गाणी लिहिली आहेत. अशी ही बनवाबनवी, गंमत जंमत, नवरी मिळे नवऱ्याला अशा अनेक मराठी सिनेमांसाठी शांताराम यांनी गीतलेखन केलं आहे. तर त्यांची अनेक गीते चाहत्यांच्या पसंतीस उतरली आहेत.
संबंधित बातम्या