Happy Birthday Pankaj Tripathi : वडिलांसोबत शेतात राबला, कामाच्या शोधात मुंबईतील रस्त्यांवर भटकंती, हॉटेलमध्ये कूकची नोकरी; 'कालीन भैया' आज आहे कोट्यवधींचा मालक
Pankaj Tripathi Birthday : अभिनेता पंकज त्रिपाठी यांचा आज 5 सप्टेंबर रोजी वाढदिवस आहे. यानिमित्तानं त्यांच्या आतापर्यंतच्या संघर्षमय प्रवासाबद्दल जाणून घ्या.
Pankaj Tripathi Birthday Special : बॉलिवूड अभिनेता पंकज त्रिपाठी यांची गणना इंडस्ट्रीतील सर्वात अष्टपैलू आणि प्रतिभावान अभिनेत्यांमध्ये केली जाते. पंकज त्रिपाठी आपल्या व्यक्तिरेखेत जिवंतपणा आणण्यात कोणतीही कसर सोडत नाहीत आणि यामुळेच त्याची फॅन फॉलोइंग सातत्याने वाढत आहे. सध्या त्ंयाच्याकडे अनेक चित्रपटांच्या ऑफर्स आहेत. प्रत्येक निर्माता-दिग्दर्शकाची पहिली पसंती असलेले पंकज त्रिपाठी यांच्या आयुष्यात एक काळ असा होता जेव्हा ते कामाच्या शोधात मुंबईतील रस्त्यांवर फिरत होते.
वडिलांसोबत शेतात राबला अभिनेता
'मिर्झापूर'सारख्या वेब सीरिजमध्ये आपलं अभिनय कौशल्य दाखवणारा अभिनेता पंकज त्रिपाठी यांचा आज 48 वा वाढदिवस आहे आहे. सध्या पंकज त्रिपाठी स्त्री 2 चित्रपटाच्या यशाचा आनंद साजरा करत आहे. या चित्रपटाने रेकॉर्डब्रेक कामगिरी केली आहे. पण इथपर्यंत पोहोचणं त्यांच्यासाठी सोपं नव्हते. त्यांचं बालपण अत्यंत गरिबीत गेलं. अभिनेता होण्यासाठी त्यांनी बिहार ते दिल्ली आणि नंतर मुंबई असा प्रवास केला. ते अनेक वर्षे दिल्लीत राहिले. आज पंक त्रिपाठी यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या संघर्षमय प्रवासाबद्दल जाणून घ्या.
कामाच्या शोधात मुंबईतील रस्त्यांवर भटकंती
पंकज त्रिपाठी यांचा वाढदिवस दोन दिवस साजरा केला जातो. विकीपीडियावर पंकज त्रिपाठी यांची जन्मतारिख 5 सप्टेंबर आहे, पण एका मुलाखतीत त्यांनी सांगितलं होतं की, त्यांचा वाढदिवस 28 सप्टेंबरला असतो. पंकज त्रिपाठी यांचा जन्म 28 सप्टेंबर 1976 रोजी बिहारमधील गोपालगंज जिल्ह्यातील बेलसांड गावात झाला. बिहारच्या या छोट्याशा गावात जन्मलेल्या पंकज त्रिपाठीला बॉलिवूडमध्ये या प्रवासात पोहोचण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला.
'कालीन भैया' आज आहे कोट्यवधींचा मालक
आज कोट्यवधींचा मालक असलेले पंकज त्रिपाठी अशा गावात लहानाचे मोठे झाले, वीजही नव्हती. मेणबत्तीचा आधार घेत त्यांनी त्यांचं बालपण काढलं. लहानपणी सरकारी नोकरी करण्याचं त्यांचं स्वप्न होतं. त्याचे वडील एक शेतकरी होते. लहानपणापासून ते बारावीपर्यंत त्यांनी वडिलांसोबत शेतात राबण्याचं काम केलं. बारावीनंतर ते हॉटेल मॅनेजमेंटचं शिक्षण घेण्यासाठी पटनामध्ये गेले.
हॉटेलमध्ये कूकची नोकरी
पंकज त्रिपाठी यांना पटनामध्ये शिक्षण घेत असताना त्यांना तुरुंगातही जावं लागलं होतं. पटनामध्ये हॉटेल मॅनेजमेंटचं शिक्षण घेत असताना ते अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेमध्ये होते. यावेळी एका आंदोलनादरम्यान, त्यांना अटक झाली होती आणि एक आठवडा त्यांना तुरुंगात काढावा लागला होता. कॉलेजमध्ये असताना ते नाटकांमध्ये सहभागी व्हायचे. त्यानंतर पुढील शिक्षणासाठी ते दिल्लीला गेले आणि त्यांनी ड्रामा स्कूलमध्ये अॅडमिशन घेतलं.
शिक्षण पूर्ण झाल्यावर पंकज त्रिपाठी अभिनय क्षेत्रात काम मिळवण्यासाठी मुंबईत पोहोचले. पण, अभिनेता होण्याचा हा प्रवास त्यांच्यासाठी सोपा नव्हता. सुरुवातीच्या दिवसात मुंबईत काम मिळवताना खर्चासाठी पैसे मिळावे, म्हणून पंकज त्रिपाठी कूकची नोकरी करायचे.
अनेक दिग्गज स्टार्ससोबत केलं काम
प्रदीर्घ संघर्षानंतर पंकज त्रिपाठी यांना 2004 मध्ये टाटा टीच्या जाहिरातीत काम करण्याची संधी मिळाली. 2004 मध्ये 'रन' चित्रपटामध्ये छोटी भूमिका केल्यानंतर ते अनेक चित्रपटांमध्ये छोट्या-मोठ्या भूमिकांमध्ये दिसले. 2012 मध्ये अनुराग कश्यपच्या 'गँग्स ऑफ वासेपूर' या चित्रपटाने त्याचं नशीब उजळलं.
या चित्रपटामुळे पंकज त्रिपाठीचं नशीब पालटलं
'गँग्स ऑफ वासेपूर' या चित्रपटामुळे पंकज त्रिपाठी यांचं नशीब पालटलं. आज पंकज त्रिपाठी बॉलिवूडमधील कुशल कलाकारांपैकी एक आहे. अनेक दिग्दर्शक त्यांच्यासोबत काम करण्यासाठी उत्सुक असतात. त्यांच्याकडे अनेक चित्रपटांच्या ऑफर आहेत. पण, तारखा शिल्लक नसल्यामुळे त्यांनी अनेक चित्रपटांना नकार दिला आहे. त्यांनी अनेक दिग्गद स्टार्ससोबत स्क्रीन शेअर केली आहे. पंकज त्रिपाठी यांनी मिर्झापुर, सेक्रेड गेम्स, क्रिमिनल जस्टिसमध्येही महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. अलिकडे त्यांनी स्त्री 2 चित्रपटात महत्त्वाची भूमिका बजावली असून या चित्रपटाची क्रेझ अद्यापही कायम आहे.