(Source: ECI/ABP News/ABP Majha)
अनुराग कश्यपच्या अडचणींत वाढ, पायल घोषनं दाखल केलेल्या तक्रारीवर उत्तर देण्यासाठी मुंबई पोलिसांकडून नोटीस जारी
अनुराग कश्यपनं मात्र हे सारे आरोप फेटाळून लावत, हा निव्वळ आपलं तोंड बंद करण्यासाठी केलेला प्रयत्न असल्याचं समाज माध्यमावर प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे.
मुंबई : अभिनेत्री पायल घोषच्या तक्रारीवर मुंबई पोलिसांनी अनुराग कश्यप यांना चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस पाठवली आहे. 1 ऑक्टोबर, गुरूवारी सकाळी 11 वाजता वर्सोवा पोलीस स्थानकांत हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मात्र अनुराग कश्यप लगेच पोलिसांसमोर हजर होतील याची शक्यता कमीच असल्याचं पायलचे वकील नितीन सातपुते यांनी एबीपी माझाला सांगितलं आहे. यासंदर्भात पोलिसांनी तातडीनं कश्यप यांना अटक करण्याची मागणी त्यांनी केली आहे. पोलिसांनी जर वेळेत कारवाई केली नाही तर ते हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्याची मागणी करत कोर्टात दाद मागण्याच्या तयारीत आहेत. याचसंदर्भात येत्या 6 ऑक्टोबरला पायल दिल्लीत महिला आयोगातही जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
पायल घोषनं नुकतीत रामदास आठवले यांच्यासोबत राजभवन गाठत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली होती. सुरूवातीला मुंबई पोलीस काही वर्ष जुनं असलेल्या याप्रकरणी तक्रार दाखल करून घेण्यास टाळाटाळ केली होती. मात्र त्यानंतर वकिलांची मदत घेऊन पायलनं याप्रकरणी तक्रार देताच वर्सोवा पोलीस स्थानकांत अनुराग कश्यपविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. ज्यात मुंबई पोलिसांनी आयपीसी कलम 376 (a), 354, 341,342 अंतर्गत गुन्ह्याची नोंद केली आहे. साल 2014 मध्ये अनुराग कश्यप यांच्यासोबत झालेल्या एका भेटीत त्यांनी आपल्यासोबत गैरवर्तन केल्याचा आरोप पायल घोषनं केला आहे.
अनुराग कश्यपनं मात्र हे सारे आरोप फेटाळून लावत, हा निव्वळ आपलं तोंड बंद करण्यासाठी केलेला प्रयत्न असल्याचं समाज माध्यमावर प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे. हाथसरमध्ये झालेल्या भयानक प्रकरानंही पायल घोष व्यथित झाली असून येत्या दोन-तीन दिवसांत ती गेट वे ऑफ इंडिया इथं कँडल मार्च काढणार असल्याची माहिती तिचे वकील नितीन सातपुते यांनी एबीपी माझाला दिली आहे.