Kiran Mane: 'केदार मला 'या' सिनेमात एक भुमिकाही देणार होता, पण...'; किरण मानेंनी शेअर केली पोस्ट
नुकतीच किरण माने (Kiran Mane) यांनी केदार शिंदे (Kedar Shinde) यांच्या 'महाराष्ट्र शाहीर' (Maharashtra Shahir) या चित्रपटाबाबत एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे.
Kiran Mane: किरण माने (Kiran Mane) हे मराठी चित्रपट आणि मालिकांमधील प्रसिद्ध अभिनेते आहेत. बिग बॉस मराठीच्या चौथ्या (Bigg Boss Marathi 4) सिझनमध्ये किरण माने यांनी सहभाग घेतला होता. किरण माने हे विविध विषयांवरील पोस्ट सोशल मीडियावर शेअर करत असतात. नुकतीच त्यांनी केदार शिंदे (Kedar Shinde) यांच्या 'महाराष्ट्र शाहीर' (Maharashtra Shahir) या चित्रपटाबाबत एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे.
'एखादं प्रोजेक्ट तारखांच्या कारणासाठी हातातून गेल्याची चुटपूट लागून रहाते. बिगबाॅस नंतर माझ्याकडे खूप कामे चालून आली याचा आनंद आहेच... आजही, आत्ता ही पोस्ट लिहुन लगेच मी कॅमेर्यापुढेच उभा रहाणार आहे... हे साध्य झालं फक्त त्या शो मुळेच ! पण... याआधी बिगबाॅसच्या आणि शुटिंगच्या तारखा क्लॅश झाल्यानं एक छान सिनेमा सोडावा लागला होता.
'मुलगी झाली हो' चं शुटिंग करत होतो. अचानक केदार शिंदेचा फोन आला, "किरण, शाहीर साबळेंवर बायोपिक करतोय. त्यातल्या शाहिरांच्या सातारा वास्तव्यातल्या संवादांमध्ये अस्सल सातारी लहेजा, शब्द, बोली हे सगळं यावं यासाठी मला मदत करशील का? तयार असशील तर प्रतिमाताई, तू आणि मी दादरला जिप्सीमध्ये भेटूया. तुला स्क्रिनप्ले देतो." मी एका क्षणात होकार दिला. फोन ठेवला आणि मन धावत भूतकाळात गेलं... मायणीत...'
या पोस्टमध्ये किरण माने यांनी शाहीर साबळे यांच्या आठवणींना उजाळा दिला. पोस्टमध्ये त्यांनी लिहिलं, 'मी आजही अभिमानानं सांगतो की, आयुष्यातला पहिला ऑटोग्राफ मी शाहीर साबळेंचा घेतलाय! 'महाराष्ट्र शाहीर'च्या प्रोसेसमध्ये केदारनं काही काळ का होईना सहभागी करून घेणं, हे माझ्यासाठी किती आनंद देणारं असेल, किती मोलाचं असेल हे यावरून तुमच्या लक्षात आलं असेल. खरंतर केदार मला या सिनेमात एक छान भुमिकाही देणार होता, पण शुटिंगच्या तारखा आणि बिग बाॅस एकाच वेळी आल्यामुळे ती संधी हुकली. पण या निमित्तानं मी ज्यांना गुरूस्थानी मानतो अशा शाहीर साबळेंना सलाम करण्याची छोटीशी का होईना संधी मिळाली. सलाम शाहीर, त्रिवार सलाम !'
महाराष्ट्र शाहीर या चित्रपटाचं दिग्दर्शन केदार शिंदे यांनी केलं आहे. या चित्रपटात अंकुशसोबतच अतुल काळे, अमित डोलावत, सना केदार शिंदे हे कलाकार देखील प्रमुख भूमिका साकारणार आहेत. हा चित्रपट 28 एप्रिल 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
इतर महत्वाच्या बातम्या: