Kartiki Gaikwad : कार्तिकी गायकवाडच्या वडिलांचा 'या' मानाच्या पुरस्काराने सन्मान, लेकीचा आनंद गगनात मावेना; म्हणाली,"संत एकनाथ महाराजांचा आशीर्वाद"
Kartiki Gaikwad : 'सारेगमप लिटिल चॅम्पस' फेम (Sa Re Ga Ma Pa L'il Champs) गायिका कार्तिकी गायकवाडच्या वडिलांचा संगीतक्षेत्रातील मानाच्या पुरस्काराने सन्मान करण्यात आला आहे. लेकीचा आनंद गगनात मावेनासा झाला असून वडिलांसाठी तिने खास पोस्ट शेअर केली आहे.
Kartiki Gaikwad : 'सारेगमप लिटिल चॅम्पस' (Sa Re Ga Ma Pa L'il Champs) या कार्यक्रमाची विजेती ठरलेली कार्तिकी गायकवाड (Kartiki Gaikwad) सध्या चांगलीच चर्चेत आहे. कार्तिकी लवकरच आई होणार आहे. सोशल मीडियावर ओटीभरण कार्यक्रमाचे फोटो शेअर करत गायिकेने चाहत्यांना आनंदाची बातमी दिली होती. कार्तिकीच्या घरी सध्या आनंदाचं वातावरण आहे. आता या आनंदात आणखी भर पडली आहे. कार्तिकीच्या वडिलांचा संगीतक्षेत्रातील मानाच्या पुरस्काराने सन्मान करण्यात आला आहे. त्यामुळे लेकीचा आनंद गगनात मावेनासा झाला असून वडिलांसाठी तिने सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर केली आहे. त्यामुळे आता लेकीसह वडिलांवरही अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
कार्तिकी गायकवाडची पोस्ट काय आहे? (Kartiki Gaikwad Post)
कार्तिकीने इन्सा स्टोरीमध्ये वडिलांचे फोटो शेअर केले आहे. या फोटोंमध्ये कार्तिकीच्या वडिलांचा पुरस्काराने सन्मान होताना दिसून येत आहे. फोटो शेअर करत कार्तिकीने लिहिलं आहे,"श्री संत एकथाथ महाराज स्वर मार्तंड पुरस्कार 1 मार्च 2024 रोजी अयोध्येतील श्रीराम मंदिर समीतीचे कोषाध्यक्ष आचार्य गोविंद गीरी जी महाराज यांच्या शुभहस्ते पं, कल्याणजी गायकवाड यांना प्रदान करण्यात आला आहे. म्हणजे साक्षात श्री संत एकनाथ महाराज यांचेच आशीर्वाद आहेत". कार्तिकीने या पोस्टद्वारे आपला आनंद व्यक्त केला आहे.
पंडीत कल्याणजी गायकवाड यांना 'या' कारणाने मिळाला श्रीसंत एकनाथ महाराज स्वर मार्तंड पुरस्कार
पंडीत कल्याणजी गायकवाड यांनी बालवयापासूनच स्वरांची उपासना केली आहे. मोठ्या कष्टातून स्वरसाधना केली आहे. त्यामुळेच वारकरी भजन क्षेत्रात त्यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. त्यांनी संगीतबद्ध केलेल्या अभंग-गौळणीच्या चालींनी लोकांना भुरळ घातली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून त्यांनी पैठण, आळंदी व पंढरपूरच्या वारीत भजनाची सेवा केली आहे. त्यामुळेच वारकऱ्यांपासून ते प्रसिद्ध गायकांपर्यंत त्यांनी स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. श्री क्षेत्र आळंदी येथे कृष्णाई संगीत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून त्यांनी हजारो गायक घडविले आहेत. त्यामुळे त्यांना महाराष्ट्र शासनाच्या कंठ संगीत पुरस्कारासह अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. आता यात आणखी एका पुरस्काराची भर पडली आहे.
कार्तिकी गायकवाडच्या आवाजाचा मोठा चाहतावर्ग आहे. आपल्या सुमधूर आवाजाने तिने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं आहे. लहानपणापासूनच तिला गाण्याची आवड होती. वडिलांमुळे घरातूनच तिला गाण्याचं बाळकडू मिळालं आहे. कार्तिकी गायकवाडचे वडील पंडित कल्याणजी गायकवाड हे गायक आणि संगीतकार आहेत. एकीकडे आई होणार असल्याने चर्चेत असणारी कार्तिकी आता वडिलांमुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
संबंधित बातम्या