(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Kangana Ranaut : ‘हीच खरी महिला शक्ती’, कंगना रनौतने दिल्या द्रौपदी मुर्मू यांना शुभेच्छा!
Kangana Ranaut, Droupadi Murmu : राष्ट्रपतीपदावर विराजमान होणाऱ्या द्रौपदी मुर्मू या पहिल्या आदिवासी महिला असणार आहेत. या प्रसंगी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
Kangana Ranaut, Droupadi Murmu : संपूर्ण देशाचं लक्ष लागून असलेल्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत एनडीएच्या द्रौपदी मुर्मू (Droupadi Murmu) यांनी बाजी मारली आहे. त्यांनी विरोधकांचे उमेदवार यशवंत सिन्हा यांचा पराभव केला आहे. द्रौपदी मुर्मू यांना 64 टक्के मतं तर यशवंत सिन्हा यांना 36 टक्के मतं मिळाली आहेत. राष्ट्रपतीपदावर विराजमान होणाऱ्या त्या पहिल्या आदिवासी महिला असणार आहेत. या प्रसंगी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. बॉलिवूडची ‘धाकड गर्ल’ अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranauat) हिने देखील द्रौपदी मुर्मू यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
इंस्टाग्रामवर आपला आनंद व्यक्त करताना कंगनाने एक फोटो स्टोरी चाहत्यांसोबत शेअर केली आहे. या स्टोरीत कंगनाने द्रौपदी मुर्मू यांचा एक फोटो शेअर केला आहे. तसेच, विजयाबद्दल द्रौपदी मुर्मूचे अभिनंदन करताना कॅप्शनमध्ये तिने महिला शक्तीचा उल्लेख केला असून, आदिवासी पार्श्वभूमीतून या पदावर पोहोचणाऱ्या त्या पहिल्या महिला असल्याचे म्हटले आहे.
पाहा पोस्ट :
कोण आहेत द्रौपदी मुर्मू?
द्रौपदी मुर्मू या ओडिशातील आदिवासी नेत्या आहेत. ओडिशातील BJP-BJD युती सरकारमध्ये 2002 ते 2004 या काळात त्या मंत्री होत्या. त्यांनी झारखंडच्या नवव्या राज्यपाल म्हणून देखील काम केलं आहे. द्रौपदी मुर्मू या ओदिशाच्या रायरंगपुर मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आल्या होत्या.
द्रौपदी मुर्मू यांच्याबद्दल माहिती
-ओडिशाच्या आदिवासी कुटुंबात 20 जून 1958 रोजी जन्म.
-सुरुवातीला शिक्षिका म्हणून नोकरी, त्यानंतर राजकारणात प्रवेश.
-1997 मध्ये राइरंगपूर नगर पंचायतीत नगरसेवक म्हणून विजयी.
-2000 ते 2009 ओडिशा विधानसभेत आमदार, 2000 ते 2004 या काळात कॅबिनेट मंत्री.
-2015 मध्ये झारखंडच्या राज्यपाल म्हणून नियुक्ती.
देशात आतापर्यंत आदिवासी समुदायातील कोणीही व्यक्ती राष्ट्रपती बनलेला नाही. महिला, दलित, मुस्लीम आणि दक्षिण भारतातील व्यक्ती राष्ट्रपतीपदी विराजमान झाले आहेत. पण आदिवासी समाज यापासून वंचित राहिला होता. त्यामुळे आदिवासी समाजातील व्यक्तीला राष्ट्रपती होण्याचा बहुमान मिळावी अशी मागणी केली जात होती. आता द्रौपदी मुर्मू यांच्या माध्यमातून ही गोष्ट साध्य झाली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या