जावेद अख्तर यांनी दाखल केलेल्या अब्रुनुकसानीच्या प्रकरणात कंगनाची सत्र न्यायालयात याचिका
अंधेरी दंडाधिकारी न्यायालयानं बजावलेल्या समन्सला कंगना रनौतकडून दिंडोशी कोर्टात आव्हान.
मुंबई : गीतकार जावेद अख्तर यांनी कंगनाविरोधात दाखल केलेल्या अब्रुनुकसान प्रकरणी अंधेरी महानगर दंडाधिकारी न्यायालयाकडून बजावण्यात आलेल्या समन्सला अभिनेत्री कंगना रनौतनं आता दिंडोशी सत्र न्यायालयात आव्हान दिलं आहे. त्यावर येत्या सोमवारी सुनावणी पार पडणार आहे.
अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात कंगनानं एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत एका बॉलिवूड सुपरस्टारसोबतच्या वादावरून जावेद अख्तर यांच्याबाबत काही वादग्रस्त विधानं केली. मात्र, या संवेदनशील प्रकरणाशी आपला काहीही संबंध नसताना आपल्यावर खोटे आणि आधारहीन आरोप कंगनानं केले आहेत. यामुळे माझी विनाकारण मानहानी झाली असून प्रचंड मनस्ताप झाला आहे असा आरोप करत कंगनावर फौजदारी खटला चालवावा, अशी मागणी जावेद अख्तर यांनी अंधेरी दंडाधिकारी न्यायालयाकडे केली आहे.
याप्रकरणी कंगनावर आयपीसी कलम 499 आणि 500 नुसार अब्रुनुकसानी केल्याचा फौजदारी खटला दाखल करण्याची मागणी अख्तर यांनी न्यायालयाकडे केली आहे. त्यावर अंधेरी महानगर दंडाधिकारी न्यायालयात न्यायाधीश आर. आर. खन्हद यांच्यासमोर पार पडलेल्या सुनावणीमध्ये मुंबई पोलिसांनी आपला चौकशीचा प्राथमिक अहवाल सादर केला. मात्र, कंगनाचा यासंदर्भात जबाब नोंदवणं अद्याप बाकी असल्याचं पोलिसांनी कोर्टाला सांगितले होतं. त्याची दखल घेत न्यायालयाने कंगनाला समन्सही जारी केला होता. मात्र, त्याविरोधात कंगानाने आता दिंडोशी सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला असून त्यावर 15 मार्च रोजी सुनावणी पार पडणार आहे.