Fauji : एका निडर सैनिकाचा जीवन प्रवास मांडणारा 'फौजी'; लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला
Fauji : सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा 'फौजी' हा सिनेमा आहे.
Fauji Marathi Movie : सैनिक देशाच्या रक्षणासाठी सदैव तत्पर असतात. त्यांच्यामुळे आपण आपलं आयुष्य सुखाने जगू शकतो. कधी कुठे हल्ला झाला किंवा दंगली झाल्या तर आपण खंत व्यक्त करतो. नंतर मात्र अगदी सहज विसरून जातो. आपले सैनिक हातात बंदूक घेऊन कायम आपल्या रक्षणासाठी सतत सीमेवर खंबीरपणे पहारा देत असतात, तेदेखील कोणताही स्वार्थ न ठेवता. अशाच एका निडर सैनिकाचा जीवन प्रवास मांडणारा 'फौजी' (Fauji) हा सिनेमा आहे.
'फौजी' या सिनेमाचे दिग्दर्शन घनशाम विष्णूपंत येडे यांनी केलं आहे. अभिनेता सौरभ गोखले आणि अभिनेत्री सायली संजीव ही लोकप्रिय जोडी या सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तसेच नागेश भोसले, सुनील गोडबोले, हंसराज जगताप, सिद्धेश्वर झाडबुके, रोहित चव्हाण, विवेक चाबुकस्वार, मिलिंद दास्ताने, जयंत सावरकर, मानसी मागिकर, सुहास गरगडे, विश्वजित बेलदार, संकेत तटकरी, घनशाम येडे हे कलाकारही या सिनेमात दिसणार आहेत.
भारतीय फौजी सीमेवर आपल्या देशाच्या संरक्षणासाठी प्राणाची पर्वा न कारता सदैव सज्ज असतो याची सर्वांना जाणीव व्हावी, युवा पिढीला देशासाठी सर्वस्व अर्पण करण्याची प्रेरणा मिळावी यासाठी 'फौजी' या सिनेमाची निर्मीती केल्याचं निर्माते घनशाम येडे सांगतात. आपल्या देशासाठी, समाजासाठी आपला प्राणपणाला लावणाऱ्या जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त करणे अत्यंत गरजेचे आहे. या सिनेमाच्या माध्यमातून येणाऱ्या उत्पन्नामधील काही रक्कम शहीद फौजींच्या कुटुंबांना आणि आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना देण्यात येणार आहे.
दिग्दर्शक निर्माते घनशाम येडे यांचा चंदेरी दुनियेचा प्रवासही तितकाच खडतर आहे. सामान्य शेतकऱ्याच्या घरात जन्मलेल्या घनश्याम येडे यांनी स्पॅाटबॉयचे काम करत अभिनयाचे धडे गिरवले. राष्ट्रपती पुरस्कार विजेत्या 'एलिझाबेथ एकादशी' सिनेमामधील त्यांची चहावाल्याची भूमिका सर्वांच्या लक्षात राहिली. त्यानंतर कष्टाने लेखन, दिग्दर्शन अशी जबाबदारीही सांभाळत 'बोला अलख निरंजन' हा सिनेमा केला. त्यांचे आगामी मराठी व हिंदी सिनेमे प्रदर्शनाच्या वाटेवर आहेत.
कथा, पटकथा, संवाद, गीते घनशाम येडे यांची आहेत. शान, वैशाली माडे, कविता राम यांनी सिनेमातील गीतांना स्वरसाज चढवला आहे. या सिनेमाचे पोस्टर नुकतेच प्रेक्षकांच्या भेटीला आले असून प्रेक्षक आता सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत.
संबंधित बातम्या