(Source: ECI/ABP News/ABP Majha)
द घोस्ट स्टोरीजमधल्या 'त्या' दृश्याबद्दल तक्रार, माहिती-प्रसारण मंत्रालयाच्या नव्या धोरणानुसार पहिली तक्रार दाखल
अनुराग कश्यप दिग्दर्शित द घोस्ट स्टोरीजमधल्या एका दृश्याबद्दल तक्रार दाखल झाली आहे. माहिती-प्रसारण मंत्रालयाच्या नव्या धोरणानुसार ही पहिलीच तक्रार दाखल झाली आहे.
मुंबई : अनुराग कश्यप दिग्दर्शित घोस्ट स्टोरीज ही सीरीज नेटफ्लिक्सवर 2020 मध्ये आली. या शॉर्ट स्टोरीज होत्या. त्यातल्या धीस इज द एंड या स्टोरीमधल्या एका दृश्याविरोधात पहिली तक्रार दाखल झाली आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने फेब्रुवारी 2021 मध्ये आणलेल्या नव्या कायद्यानुसार दाखल झालेली ही पहिलीच तक्रार आहे.
नेटफ्लिक्सकडे ही तक्रार दाखल झाली आहे. माहिती आणि प्रसारण खात्याने फेब्रुवारी 2021 मध्ये आणलेल्या आयटी गाईडलाईन्स फॉर इंटरमिडियारीज एंड डिजिटल मीडिया इथिक्स कोड या अंतर्गत ही तक्रार दाखल झाली आहे. ही तक्रार या शॉर्ट स्टोरीजमधल्या धीस इज द एंड या शॉर्टफिल्ममधल्या दृश्याबद्दलची आहे. यात शोबिता धुलीपात्रा या नायिकेनं रंगवलेली व्यक्तिरेखा तिचं मिसकॅरेज झाल्यानंतर तिच्या उदरात वाढणारा गर्भ खाताना दाखवला आहे. दाखल झालेल्या तक्रारीनुसार तक्रारदार म्हणतो, की या दृश्याची या गोष्टीत गरज नव्हती. या शिवाय हे दृश्य दाखवायची गरज होतीच, तर त्याबद्दल स्क्रीनवर तशी ताकीद देणं गरजेचं होतं. एका वृत्तपत्रात आलेल्या बातमीनुसार ही तक्रार दाखल झाल्यानंतर 24 तासांत त्यावरचं उत्तर येणं अपेक्षित आहे. नेटफ्लिक्सच्या म्हणण्यानुसार त्यांना ही तक्रार मिळाली आहे. द घोस्ट स्टोरीज हे प्रॉडक्शनमध्ये आणखी एक कंपनी सहभागी होती, त्यांच्याकडे ही तक्रार पाठवून देण्यात आली आहे.
अनुराग कश्यपला या तक्रारीबद्दल कळलं तेव्हा अनुरागने त्याबद्दल इन्स्टा पोस्ट केली होती. त्यात अखेर आता हे सुरू झालं. द घोस्ट स्टोरीजबद्दल नेटफ्लिक्सकडे तक्रार आली. धीस इज द एंड अशी पोस्ट केली होती. पण कालांतराने त्याने ती पोस्ट काढून टाकली. ही पोस्ट पाहिल्याचं काहींचं म्हणणं आहे.
केंद्राच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने या वर्षाच्या सुरूवातीला फेब्रुवारी महिन्यात ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर होणाऱ्या कार्यक्रमांवर अंकुश लावण्यासाठी नवे नियम आणले आहेत. वेबसीरीजवर दाखवल्या जाणाऱ्या कंटेंटबद्दल कुणाचीही काही तक्रार असेल तर त्याचं निवारण करणं आवश्यक असणार आहे. हे बिल आल्यानंतर यावर तक्रार दाखल झाली नव्हती, पण अनुराग कश्यपच्या वेबसीरीजवर तक्रार दाखल झाल्यानंतर आता वेबसीरीज बनवणाऱ्या अनेक लोकांचे धाबे दणाणले आहेत.