Akshay Kumar : ठरलं! 'हेरा फेरी 3'मध्ये अक्षय कुमार दिसणार नाहीच; स्वतः खिलाडी कुमारच म्हणाला,"मी या सिनेमाचा भाग नाही"
Akshay Kumar : अक्षय कुमार आता 'हेरा फेरी 3' या सिनेमाचा भाग नाही. खिलाडी कुमारने स्वत: यासंदर्भात माहिती दिली आहे.
Akshay Kumar On Hera Pheri 3 : 'हेरा फेरी 3' (Hera Pheri 3) हा बहुचर्चित सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात कार्तिक आर्यन दिसणार असल्याची माहिती निर्मात्यांनी दिली आहे. दुसरीकडे कथानक न आवडल्याने अक्षय कुमारने या सिनेमातून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे खिलाडी कुमारचे चाहते नाराज झाले आहेत.
हिंदुस्तान टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत अक्षय कुमार म्हणाला," 'हेरा फेरी 3' या सिनेमाचा आता मी भाग नाही. मला या सिनेमासाठी विचारणा झाली होती. पण या सिनेमाचं कथानक मला फारसं न आवडल्याने मी या सिनेमाच्या टीममधून बाहेर पडलो आहे. प्रेक्षकांना जे पाहायला आवडेल तेच करायला मला आवडतं. त्यामुळेच मी या सिनेमातून माघार घेतली आहे".
अक्षय कुमारने चाहत्यांची मागितली माफी
अक्षय कुमार 'हेरा फेरी 3' या सिनेमात दिसणार नसल्याने त्याचे चाहते नाराज झाले आहेत. त्यामुळेच खिलाडी कुमारने चाहत्यांची माफी मागितली आहे. तो म्हणाला, 'हेरा फेरी 3' हा सिनेमा करत नसल्याचं दु:ख आहेच. पण मी तुमची फसवणूक करणार नाही. मला माफ करा".
दुसरीकडे अक्षय कुमारने 'हेरा फेरी 3' या सिनेमासाठी 90 कोटीचं मानधन मागितलं असल्याची चर्चा आहे. तर कार्तिक आर्यन मात्र 30 कोटींमध्ये हा सिनेमा करण्यासाठी तयार होता. त्यामुळे खिलाडी कुमार ऐवजी कार्तिक आर्यनला निर्मात्यांनी पसंती दर्शवली.
गेल्या अनेक दिवसांपासून 'हेरा फेरी-3' या सिनेमात बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन दिसणार असल्याची चर्चा होत होती. अखेर यासंदर्भात परेश रावलने भाष्य केलं आहे. ट्विटरवर एका चाहत्याने परेशला विचारलं,"कार्तिक आर्यन 'हेरा फेरी-3' या सिनेमात दिसेल का? यावर परेश रावतने,"होय.. हे खरं आहे". असं म्हणत चर्चांना पूर्णविराम दिला आहे.
'हेरा फेरी-3' या सिनेमाची चाहत्यांना उत्सुकता आहे. 'फिर हेरा फेरी' हा या सिनेमाचा दुसरा भाग 2006 मध्ये रिलीज झाला होता. हेरा फेरी या सिनेमात परेश रावल यांनी बाबू भाई ही भूमिका तर अक्षयनं राजू ही भूमिका साकारली. सुनीलनं श्याम ही भूमिका साकारली होती. हेरा फेरी आणि फिर हेरा फेरी या दोन्ही भागांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली आहे.
संबंधित बातम्या