माझे चित्रपट समीक्षकांसाठी नाहीतच, ते तर प्रेक्षकांसाठी : अक्षयकुमार
लक्ष्मी चित्रपटाला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. यावर अक्षयकुमार म्हणतो माझे चित्रपट सामान्य प्रेक्षकांसाठी आहेत.
ओटीटीवर अक्षयकुमारचा बहुचर्चित लक्ष्मी प्रदर्शित झाला. सिनेमाची उत्सुकचा आधीपासून होतीच. हा चित्रपट दक्षिणी चित्रपटावर बेतला आहे ही एक गोष्ट. पण या चित्रपटातला अक्षयचा रोल पाहता त्यात तो काय वेगळं करतो याचा विचार सातत्याने त्याचे फॅन्स करत होते. लक्ष्मी प्रदर्शित झाला आणि अक्षय कुमारला या चित्रपटाचा अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. समीक्षकांनी हा चित्रपट म्हणजे पुरेपूर अपेक्षाभंग असल्याचं म्हटलं. अनेकांनी हा फीडबॅक दिल्यावर अक्षय बोलता झाला.
अक्षयकुमारने केलेला प्रत्येक चित्रपट तिकीटबारीवर यशस्वी ठरला आहे. गेल्या पाच वर्षापासून तर अक्षय करेल तो चित्रपट यशस्वी ठरतो आहे. पण या त्याच्या घोडदौडीला लक्ष्मी या चित्रपटाने ब्रेक लावला. मूळ कंचना या दक्षिणी चित्रपटावर बेतलेल्या या चित्रपटाने रसिकांची घोर निराशा केली. यावर अक्षय म्हणाला, अनेक समीक्षकांनी चित्रपट चांगला नसल्याचं म्हटलं आहे. त्यांनी त्यांचं काम केलं. समीक्षकांचं म्हणणं मी खोडून काढत नाही. पण मी चित्रपट समीक्षकांसाठी बनवतच नाही. माझे चित्रपट सामान्य प्रेक्षकांसाठी असतात. त्यांना चित्रपट आवडणं महत्वाचं असतं. माझ्या प्रेक्षकांना हा सिनेमा आवडतो की नाही हे महत्वाचं. हे बोलता बोलता आणखी एक टिप्पणी अक्षयने केली आहे. तो म्हणतो, माझे चित्रपट समीक्षकांना कधीच आवडत नाहीत. पण ते त्यांच्यासाठी नसतात. त्याच्या या वक्तव्यानंतर मात्र समीक्षक मंडळी काहीशी नाराज झाली आहेत.
रजनीकांत बनणार धनुष? थलैवावर नव्या वर्षात बनणार चित्रपट
समीक्षक वर्गापैकी एकजण म्हणतो, अक्षयच्या यापूर्वीच्या सर्व चित्रपटांना आम्ही चांगलंच म्हटलं आहे. कारण ते चांगलेच होते. लक्ष्मी चित्रपट मात्र त्या पठडीत नाही. अक्षयचा बेबी, स्पेशल 26, हाऊसफुल आदी अनेक चित्रपटांना आम्ही चागलंच म्हटलं आहे. आता मात्र एक सिनेमा आम्ही अपेक्षाभंग असल्याचं म्हटल्यानंतर मात्र त्याने ही टिप्पणी करणं अयोग्य आहे. तर सोशल मीडियावर अक्षयच्या या टिप्पणीवर पाऊस पडला आहे. समीक्षकांनी त्यांची मतं द्यायची ती देवोत. पण सोशल मीडियावर सामान्य प्रेक्षकच व्यक्त होत असतात आणि त्यांनाच सिनेमा आवडलेला नाही. हे त्यांच्या पोस्टवरून कमेंटवर कळतं असा याचा सूर आहे.
अक्षयकुमारचा लक्ष्मी हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर ओटीटीवर तो उत्सुकतेनं पाहिला गेला. पण त्यानंतर मात्र रसिकांची निराशा झाली. हा चित्रपट कंचनावर बेतलेला असल्याने त्याची बांधणीही जुनाट असल्याचं अनेकांनी म्हटलं आहे. अक्षयकुमारचं कामही अनेक त्याच्या चाहत्यांना आवडलेलं नाही. लक्ष्मी या चित्रपटात अक्षयकुमार, कियारा आडवानी, शरद केळकर आदींच्या मुख्य भूमिका आहेत.