Aamir Khan : "माझी मुलं माझं ऐकत नाहीत"; कपिल शर्मा शोमध्ये आमिर खानने मांडली व्यथा
Aamir Khan : नेटफ्लिक्सवरील कपिल शर्माच्या कार्यक्रमात (The Great Indian Kapil Show) बॉलिवूड अभिनेता आमिर खानने विविध विषयांवर भाष्य केलं आहे. सतत फ्लॉप होणारे चित्रपट, मुलं, अवॉर्ड शोवरील नापसंती अशा अनेक विषयांवर आमिर खानने त्याचं मत मांडलं आहे.
Aamir Khan : बॉलिवूडचा 'मिस्टर परफेक्शनिस्ट' अर्थात आमिर खान (Aamir Khan) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतो. आमिर खानने नुकतीच विनोदवीर कपिल शर्मा (Kapil Sharma) याच्या नेटफ्लिक्सवरील (Netflix) 'द ग्रेट इंडियन कपिल शो' (The Great Indian Kapil Show) या लोकप्रिय कार्यक्रमात हजेरी लावली होती. अभिनेत्याने कार्यक्रमाची शोभा वाढवली. या कार्यक्रमाचा एक प्रोमो आता समोर आला आहे. प्रोमोवरुन एपिसोड मजेदार होणार असल्याचं कळत आहे. नेटफ्लिक्सच्या या कार्यक्रमात आमिर खानने मागचे दोन फ्लॉप चित्रपट, अवॉर्ड शोमधील अनुपस्थिती तसेच आपल्या मुलांवर भाष्य केलं.
माझी मुलं माझं अजिबात ऐकत नाहीत : आमिर खान
'द ग्रेट इंडियन कपिल शो'चा एक प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये कपिल शर्मा आमिर खानला म्हणत आहे की सुपरस्टार या कार्यक्रमात हजेरी लावतील, असा मी कधीच विचार केला नव्हता. पुढे आमिरने खुलासा केला की मुलं त्याचं अजिबात ऐकत नाहीत. आमिरची फॅशन त्याची मुलं ठरवतात असंही तो म्हणाला. कार्यक्रमात खरंतर मला शॉर्ट्सवर यायचं होतं पण मुलांनी मला जीन्स परिधान करायला लावली. "माझी मुलं माझं अजिबात ऐकत नाहीत", असं आमिर खान म्हणाला.
आमिर खान बॉलिवूडमध्ये होणाऱ्या अवॉर्ड शोमध्ये हजेरी लावत नाही. याबद्दल अर्चना पूरन सिंहने त्याला प्रश्न विचारला असता मजेशीर अंदाजात उत्तर देत आमिर खान म्हणाला,"वेळेला किंमत आहे. त्यामुळे वेळेचा विचारपूर्वक वापर करायला हवा". आमिर खानचे 'लाल सिंह चड्ढा' (Laal Singh Chaddha) आणि 'ठग्स ऑफ हिंदोस्तान' (Thugs Of Hindostan) हे चित्रपट फ्लॉप ठरले आहेत. याबद्दलही आमिरने भाष्य केलं आहे.
View this post on Instagram
आमिर खानचं रिना दत्ता आणि किरण रावसोबत लग्न झालं आहे. पण आता या दोन्ही पत्नीपासून तो विभक्त झाला आहे. आमिरने रिना आणि किरणला पत्नी या नात्याने दूर केलं असलं तरी या दोघींसोबतची त्याची मैत्री कायम आहे. नुकतचं आयराच्या लग्नसोहळ्याला आमिर, रिना आणि किरण एकत्र दिसून आले होते. जुनैद, आयरा आणि आजाद ही आमिरच्या तीन मुलांची नावे आहेत.
आमिर खानचे आगामी चित्रपट (Aamir Khan Upcoming Movies)
आमिर खानचा '1947 लाहौर' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाची तो निर्मिती करत आहे. चित्रपटात सनी देओल (Sunny Deol) मुख्य भूमिकेत झळकणार आहे राजकुमार संतोषी या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळत आहेत. सनी देओलसह या चित्रपटात शबाना आझमी, करण देओल, अली फजल आणि प्रीती जिंदा हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. आमिर खानचे चित्रपट फ्लॉप होत असले तरी त्याची चाहत्यांना उत्सुकता आहे. कपिल शर्माच्या शोमधील आमिर खानचा एपिसोड प्रेक्षकांना नेटफ्लिक्सवर शनिवारी रात्री 8 वाजता पाहायला मिळणार आहे. 'द ग्रेट इंडियन कपिल शो'मधील आमिर खानचे प्रोमो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अखेर तो आला, आता खरी मजा येणार, अशा कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत.
संबंधित बातम्या