Mumbai vs Jammu Kashmir : शार्दूल ठाकूर- तनुष कोटियन लढले पण जम्मू काश्मीरचा पलटवार, मुंबईच्या अडचणी वाढल्या
Mumbai vs Jammu Kashmir : मुंबई आणि जम्मू काश्मीर यांच्यातील रणजी ट्रॉफीतील सामन्याचा तिसरा दिवस आहे. मुंबईचा संघ सध्या संकटात सापडला आहे.
मुंबई : देशांतर्गत क्रिकेटमध्ये रणजी ट्रॉफीला महत्त्वाचं स्थान आहे. भारतीय क्रिकेट संघाचे वरिष्ठ खेळाडू देखील रणजी ट्रॉफीत खेळताना पाहायला मिळत आहेत. मुंबई आणि जम्मू काश्मीर यांच्यातील मॅच 23 जानेवारीपासून सुरु झाली आहे. पहिल्या दिवसावर जम्मू काश्मीरचं वर्चस्व पाहायला मिळालं. दुसऱ्या दिवशी शार्दूल ठाकूर आणि तनुष कोटियन यांच्या भागिदारीनं मुंबईचा डाव सावरला. मुंबईनं शार्दूल ठाकूरचं शतक आणि तनुष कोटियनच्या अर्धशतकाच्या जोरावर दुसऱ्या डावात 290 धावा केल्या. यामुळं जम्मू काश्मीरसमोर विजयासाठी 205 धावांचं आव्हान ठेवलं गेलं. बातमी प्रकाशित करेपर्यंत जम्मू काश्मीरनं दुसऱ्या डावात 1 बाद 76 इतक्या धावा केल्या आहेत.
मुंबईचा संघ अडचणीत
मुंबईनं टॉस जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, जम्मू काश्मीरच्या वेगवान गोलंदाजीपुढं मुंबईचा संघ 120 धावांवर बाद झाला. यानंतर जम्मू काश्मीरनं 206 धावा केल्या. दुसऱ्या डावात देखील मुंबईचा संघ अडचणीत सापडला होता. 101 वर मुंबईनं 7 विकेट गमावल्या होत्या. शार्दूल ठाकूर आणि तनुष कोटियन यांच्या खेळीच्या जोरावर मुंबईनं 290 धावांपर्यंत मजल मारली. शार्दूल ठाकूरनं 119 धावा केल्या. तर, तनुष कोटियननं 62 धावा केल्या. दोघांच्या 185 धावांच्या भागिदारीच्या जोरावर मुंबईनं जम्मू काश्मीर समोर विजयासाठी 205 धावांचं आव्हान ठेवलं आहे.
जम्मू काश्मीरची सावध सुरुवात
जम्मू काश्मीरचं पहिल्या दुसऱ्या दिवसातील दोन सत्र वगळता सामन्यावर वर्चस्व राहिलं आहे. विजयासाठी मंबईनं ठेवलेल्या धावसंख्येचा पाठलाग करताना जम्मू काश्मीरच्या आघाडीच्या फलंदाजांनी चांगली फलंदाजी सुरु केली आहे. यावेर खान 24 धावा करुन बाद झाला. सध्या शुभम खजूरिया आणि विव्रांत शर्मा हे दोघे फलंदाजी करत आहेत.
शार्दूल ठाकूर मुंबईला अडचणीतून बाहेर काढणार?
दोन्ही डावात शार्दूल ठाकूरनं फलंदाजीच्या जोरावर मुंबईला अडचणीतून बाहेर काढलं होतं. याशिवाय जम्मू काश्मीरच्या पहिल्या डावात दोन विकेट घेतल्या होत्या. आता जम्मू काश्मीरनं विजयासाठी आवश्यक असलेल्या धावसंख्येच्या दिशेनं वाटचाल सुरु केली आहे. त्यामुळं फलंदाजीच्या जोरावर मुंबईला संकटातून बाहेर काढणारा शार्दूल ठाकूर यशस्वी होतो का ते पाहावं लागेल.
दरम्यान, मुंबईचा वेगवान गोलंदाज मोहित अवस्थीनं पहिल्या डावात जम्मू काश्मीरच्या पाच विकेट घेतल्या होत्या. दुसऱ्या डावात त्यानं एक विकेट घेतली आहे. आता मोहित अवस्थी आणि शार्दूल ठाकूर मुंबईला अडचणीतून बाहेर काढण्यात यशस्वी होतात का ते पाहावं लागेल.
इतर बातम्या :