(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Bigg Boss Marathi 5 Season Update : रितेश देशमुखची एन्ट्री तर मांजरेकरांची एक्झिट, नेटकऱ्यांनी दिली कारणांची यादी, महेश मांजरेकरांच्या उत्तराची सर्वांना प्रतीक्षा
Bigg Boss Marathi 5 Season Update : अभिनेता रितेश देशमुख हा बिग बॉस मराठीच्या पाचव्या सिजनचं सूत्रसंचालन करणार आहे. पण यामध्ये आता महेश मांजरेकर का नाही या चर्चांना उधाण आलं आहे.
Bigg Boss Marathi 5 Season Update : अखेर दोन वर्षांनी पुन्हा एकदा मराठी बिग बॉसची दारं उघडणार आहेत. बिग बॉस मराठीच्या (Bigg Boss Season update) पाचव्या सिजनबाबत चॅनलकडून घोषणा करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या सरप्राईज सोबतच प्रेक्षकांना पहिल्याच प्रोमोमध्ये एक मोठं सरप्राईज मिळालं आहे. यंदाच्या पाचव्या सीजनचं सूत्रसंचालन हे अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) करणार आहे. त्यामुळे पहिल्या चार सिजनचं सूत्रसंचालन केलेल्या महेश मांजेकरांनी (Mahesh Manjarekar) या कार्यक्रमाला अलविदा केल्याचं पाहायला मिळतंय.
रितेशच्या एन्ट्रीमुळे चाहत्यांसह बिग बॉसचं घर गाजवणाऱ्या स्पर्धकांना देखील सुखद धक्का बसला आहे. यावर अनेक कलाकारांनी देखील कमेंट्स करत त्यांची उत्सुकता दाखवली आहे. पण अनेकांनी या सीजनमध्ये महेश मांजेकर नसणार याचं वाईट वाटत असल्याचंही म्हटलं आहे. पण महेश मांजरेकरांची या कार्यक्रमातून एक्झिट नेमकी का झाली याचं ठोस कारण अद्यापही समोर आलेलं नाही. तरीही सोशल मीडियावर अनेक कारणांची चर्चा होत आहे.
नेटकऱ्यांनी वर्तवला मांजरेकरांच्या एक्झिटचा अंदाज
सोशल मीडियावर कलर्स मराठीकडून शेअर करण्यात आलेल्या प्रोमोवर अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत. त्यामध्ये अनेकांनी महेश मांजरेकर या कार्यक्रमात का नाहीत याची वेगवेगळी कारणं सांगितली आहे. काहींनी म्हटलं आहे की, यामागे काही वैयक्तिक कारण असू शकतात. महेश मांजेकर हे सध्या त्यांच्या आगामी सिनेमांच्या शुटींगमध्ये आणि दिग्दर्शनात व्यस्त असल्याचं म्हटलं जातंय. त्यामुळे चित्रपटांचं प्रमोशन ते त्यांच्या आरोग्याची काळजी हे दोन्ही एकाच वेळी सांभाळणं थोडं जड जात असल्याचाही अंदाज वर्तवण्यात आलाय. त्यामुळे त्यांच्या या व्यस्त कामकाजातून त्यांना बिग बॉससाठी वेळ देता येत नसल्याचं म्हटलं जातंय.
दरम्यान या पुढे जाऊनही नेटकऱ्यांनी आणखीही काही अंदाज वर्तवले आहेत. मागील चार सीझनमध्येही महेश मांजरेकरांवर वारंवार पक्षपातीपणा करत असल्याचं म्हटलं जात होतं. त्यातच कलर्स वाहिनीची धुरा केदार शिंदेंकडे गेल्यापासून वाहिनीची बरीच गणितं बदलली असल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे बिग बॉसच्या बाबतीतही चॅलने असा निर्णय घेतला का असाही प्रश्न उपस्थित केला जातोय. पण आता यामधून मांजरेकरांनी स्वत:हून माघार घेतली की चॅनलकडून हा निर्णय घेण्यात आलाय, याविषयी अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.