Bharat Maza Desh Ahe : मराठी सिनेसृष्टीत सैनिकांसाठी प्रथमच चित्रपटाच्या प्रिमिअर शोचे आयोजन; जवानांनी पाहिला 'भारत माझा देश आहे'
नुकताच हा सिनेमा चित्रपटगृहात प्रदर्शित झाला असून त्याला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळत आहे.
Bharat Maza Desh Ahe : मागील अनेक दिवसांपासून चर्चेत असलेला चित्रपट म्हणजे पांडुरंग कृष्णा जाधव दिग्दर्शित 'भारत माझा देश आहे'. नुकताच हा सिनेमा चित्रपटगृहात प्रदर्शित झाला असून त्याला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. राजवीरसिंहराजे गायकवाड, देवांशी सावंत यांच्यासह या चित्रपटात मंगेश देसाई, शशांक शेंडे, छाया कदम, हेमांगी कवी आणि नम्रता साळोखे यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट प्रत्येक देशप्रेमीसाठी असला तरी हा चित्रपट सीमेवर लढणाऱ्या सैनिकांना आणि त्यांच्या कुटुंबियांना समर्पित करण्यात आला आहे. त्यामुळे या चित्रपटाचा प्रिमिअर शो बेळगाव येथे सैन्य अधिकारी, जवान आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी आयोजित करण्यात आला होता. मराठी सिनेसृष्टीत असे प्रथमच घडत आहे.
या विशेष शोबद्दल दिग्दर्शक पांडुरंग जाधव म्हणतात, '' सीमेवर तैनात असलेल्या सैनिकांवर अनेक चित्रपट आले आहेत. मात्र हा चित्रपट असा आहे, जो सैनिकांच्या कुटुंबियांवर भाष्य करणारा आहे. ज्यांची इथे एक वेगळीच लढाई सुरु असते. सीमेवर जेव्हा युद्ध सुरु असते तेव्हा प्रत्येक क्षण या कुटुंबियांसाठी आव्हानात्मक असतो. जेवढा आदर, सन्मान आपण या जवानांचा करतो तितकाच अभिमान आपल्याला या कुटुंबीयांचाही असायला हवा आणि म्हणूनच आमचा हा चित्रपट या कुटुंबियांना समर्पित करण्यात आला आहे. आज चित्रपट पाहून अनेक सैन्य अधिकाऱ्यांनी, जवानांनी, त्यांच्या कुटुंबीयांनी मला भेटून आमच्या घराचे हुबेहूब चित्रण यात पाहायला मिळाल्याचे सांगितले. त्यांच्या भावना यावेळी त्यांनी आमच्यासोबत शेअर केल्या. मनाला स्पर्शून जाणारा हा सिनेमा असल्याच्या प्रतिक्रिया त्यांनी दिल्या. त्यांच्या या प्रतिक्रिया ऐकून मी भारावलो असून आमच्या कामाची पावतीही मिळाली. प्रेक्षकांनीही हा चित्रपट आवर्जून पाहावा, असे आवाहन करतो.''
एबीसी क्रिएशन्स प्रस्तुत डॉ. आशिष अग्रवाल निर्मित या चित्रपटाची कथा पांडुरंग जाधव यांचीच असून पटकथा आणि संवाद निशांत नाथराम धापसे यांचे आहेत. या चित्रपटाला समीर सामंत यांचे गीत लाभले असून अश्विन श्रीनिवासन यांनी संगीत दिले आहे. तर निलेश गावंड यांनी संकलन केलेल्या या चित्रपटाचे छायांकन नागराज यांनी केले आहे. 'भारत माझा देश आहे' महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित झाला आहे.
हेही वाचा :
- Sonu Sood : ...जेव्हा सोनू सूद स्वत: रसवंती चालवतो! व्हिडीओ होतोय व्हायरल
- Prarthana Behere : ‘माझी तुझी रेशीमगाठ’मधून ‘नेहा’ने घेतला ब्रेक, लंडनवारीमुळे प्रार्थना बेहेरेचा शूटिंगलाही टाटा!
- Lock Upp Winner : 70 दिवसांत जेलमध्ये उलगडली अनेक रहस्य, कॉमेडियन मुनव्वर फारुकी ठरला ‘लॉक अप’चा विजेता!