Atul Parchure Death : 'ते दान माझ्याच पदरात पडलं...', पुलंसमोरच 'पु.ल देशपांडे' साकारणारे अतुल परचुरे एकमेव; शेअर केली होती गोड आठवण
Atul Parchure Death :अतुल परचुरे हे पु.ल देशपांडे यांच्यासमोरच त्यांची भूमिका साकारणारे एकमेव कलावंत होते. ही गोड आठवण त्यांनी एका मुलाखतीदरम्यान शेअर केली होती.
Atul Parchure Death : अभिनेते अतुल परचुरे (Atul Parchure) यांचं सोमवार 14 ऑक्टोबर रोजी निधन झालं. अतुल परचुरे हे अनेक महिन्यांपासून कर्करोगाशी झुंजत होते. पण त्यांची ही झुंज अपयशी ठरली. त्यांच्या जाण्याने मराठी सिनेसृष्टीला मोठा धक्का बसला. मराठीची असेलली जाण आणि अभिनयाचं उत्तम टायमिंग यामुळे त्यांना अनेक अजरामर भूमिका साकारण्याची संधी मिळाली होती. इतकच नव्हे तर पु.ल देशपांडे यांच्यासमोर त्यांचीच भूमिका साकारणारे अतुल परचुरे हे एकमेव कलाकार होते.
अतुल परचुरे यांनी पु.ल देशपांडे यांचं व्यक्ती आणि वल्ली हे नाटकही अजरामर केलं. या नाटकात त्यांनी पु.ल देशपांडे यांचीच भूमिका साकारली होती. या भूमिकेची गोड आठवण त्यांनी एका मुलाखतीदरम्यान सांगितली होती. अभिनेता सिद्धार्थ चांदेकर याने सिनेमा कट्टामध्ये अतुल परचुरे यांची मुलाखत घेतली होती. त्यामध्ये त्यांनी ही आठवण शेअर केली होती.
'दान माझ्या पदरात पडलं...'
तुम्हाला ब्रँड अँबॅसिडर ऑफ पु.ल.देशपांडे असं म्हटलं जातं, हे खरं आहे का? असा प्रश्न अतुल परचुरे यांना सिद्धार्थने विचारला होता. त्यावर उत्तर देताना अतुल परचुरे यांनी म्हटलं की, अनेकदा मला लोकं हे बोलतात, आता हे कितपत खरं आहे हे मलाही नाही माहित. पण माझ्यासाठी ही भूमिका साकारणं हा सर्वोच्च बहुमान होता. जेव्हा मी 1995 मध्ये व्यक्ती आणि वल्ली हे नाटक करायचं ठरलं आहे हे मी पहिल्यांदा पेपरमध्ये वाचलं होतं. त्यावेळीच पुलंच्या अमृत महोत्सवानिमित्त जीवनगौरव पुरस्कार देण्यात येणार होता, चतुरंग तर्फे. तेव्हाच हे नाटक करण्याचं ठरलं होतं. व्यक्ती आणि वल्ली हे माझं आवडतं पुस्तक आणि या नाटकाचा आपण भाग असावा असं मला खूप मनापासून वाटत होतं. पु.ल देशपांडे यांची भूमिका कोण करणार असा सगळ्यात मोठा प्रश्न होता. आम्ही खूप मोठ-मोठ्या लोकांची नावं ऐकत होतो. पण ते दान माझ्याच पदारत पडलं आणि मुख्य म्हणजे पुलंनी माझ्या नावाला होकार देणं ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट होती.
'पुलंसमोर पु.ल साकारणारा मी एकमेव'
'दुसरी अभिमानाची गोष्ट माझ्यासाठी ही आहे की, अनेकांनी पु.ल देशपांडे सादर केले. पण पुलंसमोर पु.ल साकारणारा मी एकमेव आहे. कारण 95 साली आम्ही व्यक्ती आणि वल्ली केलं होतं, ते दोन-तीन वर्ष चालंल आणि नाटक थांबलं. त्यानंतर 2001 मध्ये दुर्दैवाने पु.ल आपल्यात नव्हते आणि मग ज्यांनी कोणी हे नाटक केलं त्यांना ते पुलंसमोर पु.ल साकारण्याची संधी मिळालीच नाही', असं अतुल परचुरे यांनी म्हटलं होतं.
'अन् मी नतमस्तक झालो...'
आमचं नाटक बसल्यानंतर पु.ल तालीम बघायला आले होते. पण त्यांच्या तिथे असण्याने मला खूप प्रेशर आलं असं झालं नाही. कारण मला व्यक्ती आणि वल्ली इतकं पाठ होतं की, त्यामुळे ते येणार हे मला माहितच होतं. त्यांना आवडणार नाही असं नव्हतचं, इतका भक्तिभाव त्यामध्ये होता... म्हणून मला खात्री होती की त्यांना हे नक्की आवडणार... त्यावेळी पु.ल मला म्हणाले की, तुला बघून मला सतीशची आठवण येते. सतीश सुभाषींची! त्यांचा चेहरा आणि माझा चेहरा मिळताजुळता आहे. नाटकामध्ये पेटी वाजवण्याचा प्रसंग होता. ती पेटी वाजवताना त्यांना बहुतेक आवाज सहन झाला नसेल म्हणून त्यांनी मला खाली बोलावलं आणि पेटी वाजवून दाखवली आणि मी नतमस्तक झालो. त्यानंतर बालगंधर्वच्या प्रयोगाला ते आले होते तेव्हा पेटीचा प्रॉब्लेम झाला होता, म्हणून मी गायलो आणि त्यानंतर ते नाटक संपल्यानंतर माझ्याकडे आले आणि म्हणाले, पेटीपेक्षा गातोस बरा, तेच कर!'