Anya : अन्य 'या' दिवशी होणार रिलीज; अतुल कुलकर्णी, तेजश्री प्रधान सह प्रसिद्ध कलाकार प्रमुख भूमिकेत
'अन्य' हा चित्रपट 10 जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Anya : मागील बऱ्याच दिवसांपासून प्रदर्शनाच्या प्रतीक्षेत असलेले सर्वच चित्रपट आता प्रदर्शित होण्याच्या वाटेवर आहेत. यापैकीच एक असलेला बहुचर्चित सिनेमा म्हणजे 'अन्य' (Anya). मराठीतील दिग्गज कलाकारांसोबतच हिंदी कलाकारांच्या अभिनयानं सजलेला आणि मराठीसह हिंदी भाषेतही बनलेला 'अन्य'च्या प्रदर्शनाची तारीखही घोषित करण्यात आली आहे. हा चित्रपट 10 जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाने स्वीडनमधील अॅलव्हिसबीन फिल्म फेस्टिव्हलमध्ये बेस्ट फिल्म, लंडनमधील फॅलकॅान इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल (जून एडिशन २०२१) मध्ये बेस्ट फर्स्ट टाईम डायरेक्टर आणि बेस्ट पिक्चर असे दोन पुरस्कार पटकावले आहेत. ग्लोबल इंडियन इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल आणि टोरंटो इंडिपेन्डंट फेस्टिव्हलमध्ये या चित्रपटानं कौतुकाची थाप मिळवली आहे.
निर्माते शेलना के. आणि सिम्मी यांनी इनिशिएटीव्ह फिल्म्सच्या बॅनरखाली कॅपिटलवुडसच्या सहयोगानं 'अन्य'ची निर्मिती केली आहे. एका महत्त्वपूर्ण विषयावर भाष्य करत सर्वांचं लक्ष वेधून घेण्याची क्षमता असलेल्या या चित्रपटाचं दिग्ददर्शन सिम्मी जोसेफ यांनी केलं आहे. सिम्मी हे दक्षिणात्य सिनेसृष्टीतील नावाजलेले दिग्दर्शक आहेत. 'अन्य'च्या माध्यमातून त्यांनी प्रथमच मराठी सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. 'अन्य'मध्ये सिम्मी यांनी मानव तस्करी या अतिशय महत्त्वाचा असलेल्या विषयावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला आहे. मानव तस्करी ही मानवतेला लागलेली कीड असून, प्रगतीच्या दिशेनं वाटचाल करणाऱ्या समाजाला पोखरणारी आहे. हि कीड जर वेळीच ठेचली नाही, तर समाज अधोगतीला जायला वेळ लागणार नाही. हा विषय प्रभावीपणे मांडण्यासाठी एका डॅाक्युमेंट्रीचा आधार घेण्यात आला आहे. डॅाक्युमेंट्रीच्या आधारे समाजातील कटू वास्तव आणि भयावह सत्य सादर करण्याचा केलेला प्रयत्न म्हणजेच 'अन्य'. सध्या हिंदीमध्ये धडाकेबाज भूमिका करण्यात बिझी असणारा अतुल कुलकर्णी या चित्रपटाचं मुख्य आकर्षण असून, त्याच्या जोडीला प्रथमेश परब, तेजश्री प्रधान, भूषण प्रधान, कृतिका देव, सुनील तावडे आदी मराठमोळ्या कलाकारांच्याही भूमिका आहेत. मराठमोळ्या कलाकारांच्या साथीला हिंदीसह बंगाली सिनेसृष्टीतही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवलेली रायमा सेन, यशपाल शर्मा, गोविंद नामदेव आदी कलाकारही आहेत. त्यामुळं तगड्या स्टारकास्टच्या सहाय्यानं आशयघन कथानक 'अन्य'मध्ये पहायला मिळणार आहे.
दिग्दर्शनासोबतच या चित्रपटाचं लेखन सिम्मी यांनी केलं असून, महेंद्र पाटील यांनी संवादलेखन केलं आहे. डिओपी सज्जन कालाथील यांनी सिनेमॅटोग्राफी केली आहे. दोन भाषांमध्ये बनलेल्या चित्रपटातील हिंदी गीतरचना डॅा. सागर आणि सजीव सारथी यांनी लिहील्या असून, मराठी गीतरचना प्रशांत जामदार यांच्या आहेत. हिंदी सिनेसृष्टीत समधुर संगीतरचना देण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या संगीतकार विपीन पटवा यांच्यासह राम नाथ, रिषी एस. आणि कृष्णाराज यांनी 'अन्य'मधील गीतरचना संगीतबद्ध केल्या आहेत. पार्श्वसंगीत रोहित कुलकर्णी यांचं आहे. नंदू आचरेकर, रॅाबिन आणि राजू या चित्रपटाचे असोसिएट दिग्दर्शक आहेत, तर शेखर उज्जयीनवाल यांनी प्रोडक्शन डिझाईनर म्हणून काम पाहिलं आहे. कॅास्च्युम डिझाईन निलम शेटये यांचे असून, साभा मयूरी यांनी कोरिओग्राफी केली आहे. थनुज यानी या चित्रपटाचं संकलन केलं आहे.