राजकारण ही कोविडपेक्षा भयाण कीड; तेजस्विनी पंडितचा संताप अनावर
कोरोना काळात जिथं साऱ्या देशानं एकत्र येऊन या संकटावर मात करण्याची अपेक्षा होती, तिथंच भारतात चित्र काहीसं वेगळं असल्याचं पाहायला मिळत आहे
मुंबई : कोरोना काळात जिथं साऱ्या देशानं एकत्र येऊन या संकटावर मात करण्याची अपेक्षा होती, तिथंच भारतात चित्र काहीसं वेगळं असल्याचं पाहायला मिळत आहे. राजकीय नेते, पक्ष आपलीच पोळी भाजून घेत अनेकदा श्रेय लाटण्यासाठीच जास्त प्रयत्नशील असल्याचं पाहायला मिळत आहे. तर कुणाच कुरघोडी करण्याची वृत्ती संताप देऊन जात आहे. जनतेनं जनतेच्याच सेवेसाठी म्हणून निवडून दिलेल्या या नेतेमंडळींच्या भूमिका आणि सध्या सुरु असणारी त्यांची राजकीय खेळी पाहून अभिनेत्री तेजस्विनी पंडित हिनं सोशल मीडियाच्या माध्यमातून अत्यंत बोचरी पोस्ट लिहिली.
थेट शब्दांत राज्य, देश आणि साऱ्या विश्वात सुरु असणाऱ्या राजकारणावर तिनं तीव्र नाराजीचा सूर आळवला. राजकारण म्हणजे एक भयाण कीड, असाच उल्लेख तिनं एका पोस्टमधून केला.
'सगळ्यात मोठी कीड आपल्या देशाला, आपल्याच नाही तर सगळ्या जगाला लागली आहे, ती आहे राजकारण. ही कीड कोविडपेक्षा भयाण, घातक आणि वर्षानुवर्ष आपल्याला पोखरत जाणारी आहे. या कीडीपासून बचाव करता आला तर बघा', असं तिनं या पोस्टमध्ये लिहिलं. परिस्थिती नेमकी किती बिकट आहे हे सांगताना, 'अवघड आहे सगळंच.... काळजी घ्या' हे तिचे शब्द सर्वांनाच विचार कराय़ला भाग पाडत आहेत.
संकटसमयी धावणार ‘Oxygen Express’; पियुष गोयल यांची ग्वाही
फक्त तेजस्विनीच नव्हे तर अनेक कलाकारांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून कानावर येणाऱ्या या राजकीय घडामोडींची तीव्र शब्दांत निंदा केली आहे. नागरिकांच्या जीवावर सारंकाही बेतलेलं असताना इतक्या खालच्या पातळीवर सुरु असणारं राजकारण पाहून सध्या तेजस्विनीच नव्हे तर अनेकांचाच संताप अनावर होत आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून याचे पडसाद उमटताना दिसत असून, सर्वसामान्यांनी आता राजकीय नेतेमंडळींना धारेवर धरलं आहे.