अभिनेत्री प्रिया बेर्डे यांची नवी इनिंग, राष्ट्रवादी काँग्रेसच्या सांस्कृतिक विभागाची जबाबदारी
अभिनेत्री प्रिया बेर्डे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत. त्या राष्ट्रवादीच्या सांस्कृतिक विभागाची जबाबदारी सांभाळणार आहेत.
मुंबई : अभिनेत्री प्रिया बेर्डे यांनी आपल्या अभिनय कौशल्याने महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनात वेगळी ओळख मिळवली. आता एक नवी इनिंग साकारण्यासाठी त्या सज्ज झाल्या आहेत. अभिनेत्री प्रिया बेर्डे आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाणार आहेत. काही दिवसांपासून त्या पक्षप्रवेश करणार असल्याबद्दल राष्ट्रवादीच्या गोटात चर्चा होती. परंतु प्रिया यांनी मात्र यावर पुरेपूर मौन साधलं होतं. शनिवारी (4 जुलै) सकाळी मात्र एबीपी माझाशी बोलताना त्यांनी या प्रवेशाला दुजोरा दिला आहे.
लॉकडाऊन लागल्यानंतर रंगमंच कामगार आणि इतर घटकांसाठी बेर्डे यांनी स्वयंसेवी संस्थांमार्फत काम सुरु केलं. अनेकांना मदतीचा हात दिला. त्याचं कौतुकही होत होतं. ते चालू असतानाच बेर्डे यांना ही नवी संधी चालून आली. एबीपी माझाशी बोलताना त्या म्हणाल्या की, "आपण सतत काहीतरी नवं करत राहायला हवं. मी याकडे नवी संधी म्हणून पाहाते. लॉकडाऊन काळात अनेक कलाकार, रंगमंच कामगाारांवर ओढवलेलं संकट पाहून मी मदत करत होते. अनेक राजकीय मंडळींशी माझी ओळख होती. पण असा पक्ष प्रवेश करायचं काही निश्तिच नव्हतं. पण काही दिवसांपूर्वी अजित पवार आणि सुप्रिया ताई यांच्याशी बोलणं झाल्यानंतर पक्षात येण्याबद्दल बोलणं झालं. त्यांनी मला या पक्षात येण्याबद्दल सुचवलं. मलाही ही कल्पना आवडली. काहीतरी नव्यानं संघटनात्मक पातळीवर काम करता येईल. मी पक्षात प्रवेश करतेय म्हणजे राजकारणात मी उतरणार नाही. पक्षाची सांस्कृतिक विभागाची काही जबाबदारी मी सांभाळणार आहे. आता ती काय असेल कशी असेल याची घोषणा 7 जुलैला होईल."
याबाबत राष्ट्रवादीच्या सदस्यांशी बोलल्यानंतर सर्व अधिकृत घोषणा 7 जुलैला मान्यवरांच्या उपस्थितीत होईल. सध्या प्रिया यांनी या पक्ष प्रवेशाला दुजोरा दिला असला तरी सर्व माहिती मात्र आपण 7 जुलैलाच देऊ, असं त्यांनी सांगितलं.